आश्विन : प्रासंगिक खेळांचा महिना...

13 Oct 2025 12:13:01

आश्विन महिना हा नवरात्रासाठी जसा परिचित तसाच त्याचा परिचय कोजागरी पौर्णिमेमुळेही आहे. या पौर्णिमेच्या रात्री चंद्र १६ कलांनी भरलेला असल्याने, तो अधिकच मोहक दिसतो. या रात्री विविध खेळ खेळत मसाला दूधाचा आस्वाद निश्चितच आनंदात वृद्धी करणारा ठरतो. या कोजागरीच्या रात्री आयोजित मेजवानी आणि क्रीडा संस्कृतीचा हा आढावा...

आश्विन महिना हा हिंदू कालगणनेतील सातवा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र अश्विनी नक्षत्राच्या आसपास असतो, म्हणूनच या महिन्याचे नाव आश्विन पडले. आश्विन महिन्याला इष, अश्वयुज किंवा शारद हीसुद्धा नावे आहेत. चंद्र हा पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. चंद्राचे शीतल चांदणे, त्याच्या कला, त्याचे मोहक स्वरूप वगैरे गुणांमुळे, चंद्राबद्दल मानवाला पूर्वीपासूनच आकर्षण वाटत आले आहे. सर्व धर्मांत चंद्राबद्दल काहीतरी संकेत रूढ झालेले दिसतातच.

ईदच्या चंद्राबद्दल मुस्लिमांना वाटणारे महत्त्व, अमावास्या-पौर्णिमेला असणारे हिंदूंमधील विशेष स्थान सर्वश्रुतच आहे. संकष्टी चतुर्थीचे उपवास सोडताना, चंद्रोदयाची वाट पाहिली जाते. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन न करण्याबाबतही पुराणात सांगितले आहे. अशा धार्मिक महत्त्वांबरोबरच, फलज्योतिषातही चंद्राला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. याच चंद्राशी निगडीत असलेली कोजागरी पौर्णिमा, आपण सगळ्यांनी सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी साजरी केली. आश्विन महिना, त्यातल्या त्यात कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी मला क्रीडाप्रकारांची, त्यातही प्रासंगिक खेळांची आवर्जून आठवण येतेच.

खेळांचा विषय काढताना चंद्र म्हटले की, क्रीडाप्रेमींच्या मुखी असणारे ध्यानचंद हे नाव आणि चंद्रमा याचा असलेला संबंध अनेक क्रीडाप्रेमींना लगेच स्मरतो. ध्यानचंद यांचे मूळ नाव खरंतर ध्यान सिंग पण, हॉकीचा सराव ते रात्री चंद्रप्रकाशात करायचे. शेजारील मोकळ्या जागेत चंद्रप्रकाशात हॉकीचा सराव करताना त्यांनी चंद्राच्या विविध कला कित्येकदा अनुभवल्या असतील, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात त्यांना हॉकीचा सराव करायला विशेष हुरूप येत असेल, असे माझ्यासारख्यांच्या मनात येते.

आश्विन महिन्यातील कोजागरी पौर्णिमादेखील त्यांनी, मैदानावर सराव करत नक्कीच घालवली असेल. कारण, संपूर्ण वर्षात याच पौर्णिमेला चंद्र १६ कलांनी भरलेला असतो. ध्यानचंद यांच्याविषयी असे विचार, माझ्या मनात लगेच तरळून जातात. त्यांच्या चंद्राशी असलेल्या विशेष नात्यामुळेच त्यांच्या गुरूंनी, भावांनी आणि मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा दिली. त्यानंतर त्यांचे ध्यानचंद हे नाव पुढे जगप्रसिद्ध झाल्याचे सर्वश्रुत आहे. आपण कोजागरी पौर्णिमेला मोकळ्या जागेत स्नेहजनांसमवेत, प्रासंगिक खेळांचा आनंद लुटतो. कोजागरीच्या दिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा व आराधना करण्याला, विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते.

मसाला दूध चंद्रप्रकाशात ठेवून, त्याचा नैवेद्य चंद्राला अर्पण केला जातो आणि त्यानंतरच ते दूध सगळेच जण प्राशन करतात. अशा चंद्र किरणांतले दुग्धप्राशन केल्याने, सगळ्यांनाच त्याचा शारीरिक लाभ मिळतो. दूध मुळातच पित्तशामक असते. त्यात साखर, केशर वगैरे घालून ते चंद्रप्रकाशात ते ठेवले जाते. वर्षांत एकूण १२ पौर्णिमा येतात. त्यातील कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी, चंद्रातून सर्वांत अधिक अमृतस्राव होत असतो. शरद ऋतूत पित्त वाढलेले असताना, त्याला शमवण्यासाठी हे अमृतासमान असलेले दूध लाभकारी ठरते.

कोजागरीच्या दिवशी लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून ‘को जागरती?’ असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळेच या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. एरवी रात्रीचे जागरण करू नये, रात्री खाऊपिऊ नये, हे आपण शारीरिक दृष्टिकोनातून पाळतो. तथापि, ही कोजागरीची रात्र याला अपवाद असते. प्रासंगिक खेळांचा आनंद लुटण्यासाठी मिळणारा उत्साह, या विशेष दुधातून आबालवृद्धांना मिळतो. मला वाटते की, ध्यानचंद यांनी रात्री उशिरापर्यंत जागत हॉकीचा लुटलेला आनंद वेगळा, त्यांनी चंद्रप्रकाशात सराव करत कमावलेली हॉकीची जादू वेगळी, त्यांच्या अनेक कोजागरीला केलेले जागरण वेगळे आणि आपण करत असलेली जागरणे वेगळी.

असाच एखाद्या कोजागरीच्या रात्री सराव करताना लक्ष्मी माता ध्यानसिंग यांच्यावर नक्कीच प्रसन्न झाली असेल. तिने ध्यानसिंगला आशीर्वाद देत ध्यानसिंगच्या गुरूंकडून त्याचे ध्यानचंद हे नामकरण करण्याबाबत त्यांच्या स्नेह्यांना प्रेरणा दिली असेल. तसेच या भारतमातेच्या सुपुत्रास क्रीडाक्षेत्रात ‘तू जगद्विख्यात होशील,’ असा आशीर्वाद एखाद्या शरदपौर्णिमेच्या दिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीनेही देऊ केला असेल, असे माझ्या मनात चटकन येऊन जाते.

तर आपल्यापैकी काहींनी कोजागरी पौर्णिमेला मोकळ्यावर स्नेहजनांसमवेत प्रासंगिक खेळांचा आनंद लुटला असेल, तर काहींनी चालू आठवड्यात कोजागरीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची सवडीनुसार निमंत्रणे स्वीकारली असतील. कारण धकाधकीच्या कालखंडात, सगळ्यांनाच एकाच दिवशी कोजागरीनिमित्त एकत्र येणे शक्य होत नाही. अशांनी त्या दिवशी कौटुंबिक एकत्रीकरणानंतर, आपल्या स्पोर्ट्स क्लबच्या मोकळ्या मैदानावरील कोजागरीचा कार्यक्रमही चुकवायचा नसतो.

नाते कोजागरी व प्रासंगिक खेळाचे

विशिष्ट प्रसंगाच्यानिमित्ताने खेळले जाणारे खेळ, इंग्रजीतील ‘पार्टी गेम्स’ या संज्ञेचा हा मराठी पर्याय आहे. ज्या प्रसंगानिमित्ताने प्रासंगिक खेळ खेळले जातात, ते प्रसंग अनेक प्रकारचे असू शकतात. सण आणि उत्सव, विवाहकार्ये आणि वाढदिवस, स्नेहसंमेलने, संस्था व व्यवसाय इत्यादींचे वर्धापन दिन यांसारख्या अनेकविध प्रसंगांच्यानिमित्ताने, कौटुंबिक व इतर सामाजिक गट मेजवानीचे कार्यक्रमांचे आयोजन करतात. कोजागरीनिमित्त एकत्र जमणे हा त्याचाच एक भाग.

प्रासंगिक खेळ या कार्यक्रमाचाच एक भाग असतो. या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे, कार्यक्रमास आलेले लहानथोर, सर्व स्त्रीपुरुष त्यात सहभागी होतात. असे खेळ मेजवानीच्या आधी वा नंतर खेळले जातात. प्राचीन काळापासूनच सुसंघटित समाजात अशा प्रकारचे खेळ रूढ झाले असावेत. व्यक्तीच्या सहज व उत्स्फूर्त आत्माविष्काराला अगदी मोकळेपणाने वाव मिळावा, हाच या खेळांमधील अंतस्थ हेतू. इतरांपासून अलिप्त राहणार्‍या भिडस्त व लाजर्‍याबुजर्‍या व्यक्तींनाही, अशा खेळांत सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे अशा व्यक्तींना समूहात मिसळण्याची संधीही उपलब्ध होते.

मेजवान्यांचे सामान्यपणे तीन प्रकार दिसतात; १) लहान मुलांचे वाढदिवस, बारसे वगैरे प्रसंगी आयोजित मेजवानी २) तरुण मुलामुलींसाठी आयोजित मेजवानी. यानिमित्ताने तरुण वर्गाला एकत्र येण्याची, एकमेकांशी ओळख करून घ्यायची संधी उपलब्ध होते. ३) गृहस्थाश्रमी व प्रौढ यांच्यासाठी आयोजित मेजवानी. या विविध मेजवान्यांच्या प्रसंगी, त्या त्या वयोगटांस अनुरूप अशा खेळांची योजना करतात. प्रासंगिक खेळ हे निव्वळ करमणुकीसाठी असले तरी, त्यांतील काही खेळ बुद्धिकौशल्य, स्मरणशक्ती, अभिनय यांच्या चाचणीसाठी खेळले जातात.

काही खेळ समूहगीतांचे, तसेच त्या गीतांवरील सोप्या नृत्यप्रकारांचेही असतात. यजमानाने जशी मेजवानीच्या पदार्थांची निवड कुशलतेने करावयाची असते, तसेच याप्रसंगी घेतल्या जाणार्‍या खेळांची व त्यासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या साहित्याची जुळणी व आखणीही आवश्यक ते पूर्वनियोजन करूनच करावी लागते. मेजवानी सुरू होण्यापूर्वी कोणते खेळ खेळावे, मेजवानी चालू असताना काय करता येणे शक्य आहे, मेजवानीनंतर कोणते खेळ खेळावे यांचा क्रमही ठरवून घ्यावा लागतो. यासाठी लागणारे साहित्य सहजगत्या उपलब्ध होईल, असे पाहिले जाते.

योजलेले खेळ भोजनगृहाजवळच्या एखाद्या दालनामध्ये, काही घराशेजारील हिरवळीवर, तर काही घराच्या गच्चीवर खेळता येतात. मेजवान्या व त्याप्रसंगी आयोजित केलेल्या प्रासंगिक खेळांचा मुख्य हेतू, निमंत्रित लोकांनी एकमेकांच्या व यजमानांच्या संगतीत आनंदात वेळ घालवावा, हाच असतो. हा आनंद निर्माण करण्यासाठी व लुटण्यासाठी, अशा खेळांचा चांगलाच उपयोग होतो. खेळात विजयी होणार्‍यांना किंवा विशेष नैपुण्य दाखविणार्‍यांना, छोटी बक्षिसे देण्याचाही एखादा गंमतीचा समारंभ ठेवला जातो. त्यासाठी निमंत्रितांतील एखाद्याला अध्यक्ष करून, त्याच्या हस्ते छोटी व मजेशीर अशी बक्षिसे हास्यनिर्मिती होईल अशा रीतीने वाटण्यात येतात.

या खेळांचे आयोजनच असे असावे की, सर्व लोक त्यात सहजपणे सहभागी होऊ शकतील. प्रासंगिक खेळांचे इतके विविध प्रकार आहेत की, त्यांची वर्गवारी करणे अवघड आहे. तरी पुढीलप्रमाणे सामान्यतः वर्गवारी करता येईल; १) ओळख घडवून आणणारे खेळ, २) गाण्यांचे अथवा भेंड्यांसारखे खेळ, ३) संगीत खुर्चीसारखे खेळ, ४) स्मरणशक्तीचे व निरीक्षणाचे खेळ, ५) स्पर्शाने वा वासाने वस्तू ओळखण्याचे खेळ, ६) चित्रकलेवर आधारलेले खेळ आणि ७) अभिनयावर आधारलेले खेळ जसे की, डम्ब शराड्स (र्ऊीाल उहरीरवशी) अर्थात मराठीत मूकाभिनय. या खेळात एक खेळाडू शब्द किंवा वाक्य निवडतो, आणि न बोलता केवळ हावभाव, शारीरिक हालचाली व चेहर्‍यावरील भावनांच्या साहाय्याने त्याचा अर्थ इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

दुसर्‍या संघाला दिलेल्या वेळेत तो शब्द ओळखायचा असतो. गाण्यांचे वा भेंड्यांचे खेळ, संगीत खुर्ची, उखाणा घेणे इत्यादी खेळही प्रासंगिक खेळांत लोकप्रिय आहेत. सहलींमध्येही असे काही खेळ मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. आनंद मेळा वा गंमतजंमत जत्रा (फन फेअर) या नावाने ओळखले जाणारे कार्यक्रम तर, हल्ली फारच लोकप्रिय ठरले आहेत. प्रासंगिक खेळांमध्ये सर्वांना स्वतःचे वय, अधिकाराचा हुद्दा प्रतिष्ठा वगैरे विसरायला लावून सहभागी होता येईल व खेळाचा आनंद मनसोक्त लुटता येईल, अशाच खेळांचा अंतर्भाव असावा लागतो.खेळातील आनंद नष्ट होण्यापूर्वीच ते संपवणे केव्हाही उचित ठरते. तसेच, गुजरातमध्ये रास, गरबा यांसारखे नृत्यप्रकाराचे खेळ, अनेक स्त्री-पुरुष एकत्र येऊन खेळतात. अशा प्रकारे विविध प्रसंगी तर्‍हेतर्‍हेचे प्रासंगिक खेळ खेळण्याची पद्धत भारतात सर्वत्रच आढळते.

प्रत्येकाच्या घरावर गच्ची असेलच असे नाही, म्हणून बागेत किंवा टेकड्यांवर सर्वांनी एकत्र जाऊन असे खेळ खेळायचे आणि दूध प्यायचे असा प्रघात अनेक ठिकाणी दिसतो. पण, काही लोक या नावाखाली धुडगूस घालणे, जोरजोरात गाणी लावणे, डीजेच्या आहारी जाणे, बीभत्स नाचणे, अपेयपान करणे, प्रासंगिक खेळांतून आनंद लुटण्याऐवजी भिन्नप्रकारे कोजागरी साजरी करणे याकडे आकृष्ट होतानाही दिसतात. अशांनी खेळात आपल्याला रममाण करत, अमृतासमान दुधाचा आस्वाद घेत ही कोजागरी एकदातरी साजरी करून बघावी. कोजागरीनिमित्त असे कोणाला शक्य झाले नसेल, त्यांनी अजूनही अशा प्रासंगिक खेळांची मजा जरूर आजमावावी. प्रासंगिक खेळाने त्याला नक्कीच ऑडियन्स मिळेल आणि सगळेच असा आश्विन मास स्मरणात ठेवतील हे नक्की.


श्रीपाद पेंडसे

(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
Powered By Sangraha 9.0