‘जैश-ए-मोहम्मद’ने ‘जमात-उल-मुमिनात’ ही महिला आत्मघातकी दहशतवादी संघटना स्थापन केली आहे. कट्टर इस्लामी असणार्या ‘जैश-ए-मोहम्मद’ने, आतापर्यंत महिलांची भरती करणे आणि त्यांना शस्त्र प्रशिक्षण देणे टाळले होते. ही भूमिका पूर्णपणे बदलून महिलांना शस्त्र प्रशिक्षण देऊन, प्रसंगी स्वत:ला ठार मारून संघटनेचे कार्य पुढे चालवण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. यामागे त्यांचे ध्येय आहे, काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करणे आणि पाकिस्तानमध्ये विलीन करणे!
‘जैश-ए-मोहम्मद’ या सुन्नी इस्लामी दहशतवादी संघटनेने नुकतेच दि. ८ ऑक्टोबर रोजीपासून, आत्मघातकी महिलांची दहशतवादी संघटना ‘जमात-उल-मुमिनात’ सुरू केली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अजहर (मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघटनेने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.) याची बहीण सादिया अजहर, ‘जमात-उल-मुमिनात’ या आत्मघातकी महिला दहशतवादी संघटनेची प्रमुख आहे. तिचा पती युसुफ अजहर ‘ऑपरेशन सिंदूर’ (दि. ७ मे)दरम्यान, भारतीय वायुदलाने मरकज सुबहान अल्लाह येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात ठार झाला होता. सिंदूरचा घाव किती खोलवर जिव्हारी लागला आहे, याची कल्पना यातून करावी!
‘जैश-ए-मोहम्मद’ने ‘जमात-उल-मुमिनात’ या नावाने महिलांची दहशतवादी संघटना सुरू केली आणि आपली भूमिकासुद्धा बदलली. मसूद अजहरच्या नेतृत्वाखालील या संघटनेने, याआधी इस्लामी महिलांना सशस्त्र किंवा लढाऊ भूमिकांपासून दूर ठेवले होते. आता इस्लामी महिलांची भरती, शस्त्र प्रशिक्षणच नव्हे, तर या इस्लामी महिलांना आत्मघातकी दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षणही देण्याची घोषणा केली.
केवळ घोषणाच नव्हे तर, याची भरती प्रक्रियाही पाकिस्तानातील बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ -अली येथे सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या ‘जमात-उल-मुमिनात’ने शहरी आणि सुशिक्षित महिलांना हेरून त्यांना भरती करण्यासाठी सोशल मीडियाचा म्हणजे, व्हॉट्सअॅप इत्यादीचा वापर करणे चालू केले आहे. ‘जमात-उल-मुमिनात’ या संघटनेचे नेतृत्व सादिया अजहरकडे देणे यातूनसुद्धा अनेक गर्भित अर्थ निघतात. या संघटनेने ‘जैश-ए-मोहम्मद’शी जोडलेल्या, ठार झालेल्या सैनिकांच्या पत्नीची यादी करायला घेतली आहे. शिवाय, बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरीपूर आणि मानसेहरा या ठिकाणच्या अभ्यास केंद्रातील महिलांनासुद्धा, यात सहभागी करून घेण्यावर भर दिला आहे.
वास्तविक महिलांचा आत्मघातकी दहशतवादी म्हणून वापर, ‘एलटीटीई’ आणि ‘बोको हराम’ या कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनांनी यापूर्वी केला आहे. आतापर्यंत ‘जैश-ए-मोहमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांनी तसे केले नव्हते. पण आता, मसूद अजहर आणि त्याचा भाऊ ताल्हा अल सैफ यांनी, महिलांची भरती आणि त्यांना आत्मघातकी दहशतवादी बनण्यासाठीचे प्रशिक्षण देण्याची तयारी चालवली आहे.
म्हणूनच ‘जमात-उल-मुमिनात’ची स्थापना, ही ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची मोठी घटना मानली जाते. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात, सुमारे १०० किमी आत असलेल्या जैशच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि त्याचे चार निकटवर्ती सहकारी ठार झाले. त्यात त्याची मोठी बहीण, तिचा पती, एक भाचा आणि त्याची पत्नी, एक भाची तसेच, पाच इतर नातेवाईकांचाही समावेश होता.
याचा प्रतिशोध घेणे ही भावना तर आहेच; पण काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देणे हे ‘जमात-उल-मुमिनात’चे मुख्य ध्येय आहे. या संघटनेने फिदायीन म्हणजेच, आत्मघातकी दहशतवादी तयार करणे आणि त्यांचा साधन म्हणून वापर करणे अशी योजना आहे.
‘जैश-ए-मोहम्मद’ ही देवबंदी सुन्नी इस्लामी दहशतवादी संघटना असून, त्यांचे ध्येयसुद्धा जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडून त्याला पाकिस्तानला जोडणे हे आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे अनेक महिलांचे प्राण घेण्यात आले, असा अपप्रचार त्यांनी चालवलेला आहे. जैशने त्यांचे प्रशिक्षण केंद्र आता पाकव्याप्त काश्मीरवरून, खैबर पख्तूनख्वा येथे हलवले आहे. कारण, हा भाग तुलनेने भारतीय सीमेपासून दूर आहे.
‘जमात-उल-मुमिनात’ ही नवीन महिला संघटना, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मानिसक युद्ध आणि स्थानिक स्तरावरील भरती या बदलत्या धोरणाचा भाग आहे. ती जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील शिक्षित, शहरी मुस्लीम महिलांना लक्ष करीत आहे. तिथे त्यांचे जाळे ऑनलाईन पसरवले जात आहे. ही संघटना स्वतःला ‘इस्लामी सुधार चळवळ’ मानते. जैशच्या संरचनेप्रमाणे ही संघटना सेलआधारित गुप्त रचना वापरते. या महिला गटांना भरती, संदेश पोहोचविणे आणि निधी गोळा करणे यासाठी तयार केले जात आहे. पुरुष सहकार्यांना त्या लॉजिस्टिक साहाय्य देतात आणि कुणाच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे कार्य करतात. ‘जमात-उल-मुमिनात’चे साहित्य, डिझाईन आणि धार्मिक भाषाशैली या सर्व गोष्टी, पाकिस्तानातील अल-मुहाजीरात आणि बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ-अली यांच्या प्रकाशनांशी साधर्म्य साधतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, सिंदूर लष्करी कारवायांच्या दरम्यान उद्ध्वस्त झालेली ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा बांधणे चालू केले असून फंड जमवणे, ईझीपैसा (एरीूझरळीर)द्वारे ऑनलाईन पैसासुद्धा मिळवायला सुरुवात केली आहे. ३१३ नवे मरकझ तयार करण्यासाठी ३.९१ अब्ज उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एकूणच, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जिव्हारी लागलेला घाव किती खोलवर गेला होता, याची आपल्याला कल्पना येते.
‘जैश-ए-मोहम्मद’च्या भारतविरोधी कारवाया
मानवी बॉम्ब तयार करणे जैशला नवे नाही. त्यांनी भारतविरोधी अनेक कारवाया केलेल्या आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. दि. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलाची वाहने, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४वरून जम्मूपासून श्रीनगर येथे निघाल्या होत्या. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराजवळच्या लेथपोरा येथे, स्फोटकांनी भरलेली चारचाकी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलाच्या एका मोठ्या गाडीवर जोरात आदळवण्यात आली. त्यामुळे झालेल्या स्फोटात ४० जवान ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’ने घेतली.
हा हल्ला घडवणार्या २२ वर्षीय काश्मिरी तरुण आदिल अहमद दरचा व्हिडिओ नंतर प्रसिद्ध केला गेला. त्याच्या चारचाकीमध्ये ८० किलो ‘आरडीएक्स’सह, ३०० किलो स्फोटके होती. आदिल अहमद दर याला २०१६ ते २०१८ दरम्यान, सहा वेळा भारतीय अधिकार्यांनी अटक केली होती. त्याचा राग मनात ठेवून, आदिल दर हा मार्च २०१८ सालापासून घर सोडून निघून गेला होता. त्याला दहशतवाद्यांनी आपल्या या हल्ल्यासाठी वापरले, यात शंका नाही. आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यासाठी लागणारा ‘मानवी बॉम्ब’, आदिल दरच्या रूपात ‘जैश-ए-मोहम्मद’ला सहजपणे मिळाला.
या हल्ल्याच्या आधी २०१५ सालापासूनच, भारतीय सुरक्षा रक्षकांवर दहशतवादी भ्याड हल्ले सुरू झाले. कारण थेट युद्धात भारताला नमवणे शक्य नाही, हे पाकिस्तानला कळून चुकले आहे. जुलै २०१५ साली, तीन दहशतवाद्यांनी एका बसवर आणि पंजाबच्या गुरुदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी २०१६ साली पठाणकोट येथील हवाई दलाच्या विमानतळावर आणि काश्मीरच्या पाम्पोर येथील सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला होता. सप्टेंबर २०१६ साली चार दहशतवाद्यांनी उरी येथील भारतीय लष्करी मुख्यालयावर हल्ला केल्याने, त्यात १९ सैनिकांना हौतात्म्य आले होते.
तसेच, दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी लेथपोरा येथील कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यातूनही भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचा हेतू स्पष्ट दिसतो.
काश्मीरला भारतापासून तोडून पाकिस्तानमध्ये विलीन करणे हेच उद्दिष्ट असणारी ही दहशतवादी संघटना असून, या संघटनेचे तालिबान आणि अल कैदा यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. संदर्भ: मोज, देवबंद मदरसा मुव्हमेंट, २०१५, पान-९८
काश्मीर हा केवळ एक मार्ग आहे. त्यानंतर भारताच्या अन्य भागात जिहाद घडवून आणणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. संदर्भ: गुणरत्न अॅण्ड काम, हॅण्डबुक ऑफ टेररीझम,२०१६, पृष्ठ-२२९
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सच्या मदतीने, या संघटनेची स्थापना झाल्याचे तज्ज्ञ मानतात. ‘हरकत-उल-मुजाहीद्दीन’च्या दहशतवाद्यांनी डिसेंबर १९९९ साली, ‘इंडियन एअर लाईन्स फ्लाईट-८१४’ या काठमांडूहून दिल्लीला जाणार्या प्रवासी विमानाचे अपहरण केले
आणि त्याला कंदहारला नेले होते. प्रवाशांच्या सुटकेसाठी भारत सरकारने दहशतवाद्यांशी वाटाघाटी केल्या, त्यामध्ये भारताच्या तुरुंगातील मौलाना मसूद अजहर; अहमद ओमर सईद शेख ज्याने नंतर अमेरिकेचा पत्रकार डॅनियल पर्लची हत्या केली; मुश्ताक अहमद झारगर या तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. त्यातील सोडण्यात आलेला मौलाना मसूद अजहर हा ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख आहे. याने ३०० आत्मघातकी दहशतवादी तयार असल्याचा दावा केला होता आणि २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आल्यास त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली होती.
संदर्भ : १) मायकेल कुगेलमन, फाईव्ह पाकिस्तानी मिलीटंट वी शुड बी पेइंग मोअर अटेन्शन टू, वॉर ऑन दी रॉक्स, रीत्रीव्ह दि. ७ ऑक्टोबर २०१६
२) ब्रूस रीडेल, ब्लेम पाकिस्तानी स्पाय सर्व्हिस फॉर अटॅक ऑन इंडियन एअर फोर्स बेस’, दि डेली बीस्ट, रीत्रीव्ह दि. ७ ऑक्टोबर २०१६
याच मसूद अजहरने कराचीमध्ये म्हटले होते की जोपर्यंत अमेरिका आणि भारताचा क्रूरपणा संपत नाही, तोपर्यंत जिहादसाठी विवाह करा, जिहादसाठी मुलांना जन्म द्या आणि फक्त जिहादसाठीच पैसा कमवा. संदर्भ: रशीद, डीसेंट इन टू केऑस, २०१२, प्रकरण-सहा आणि इंस, इन साईड ब्रिटिश इस्लाम, २०१४, प्रकरण-१. म्हणजेच भारतद्वेष सतत पसरवत ठेवून, देशाची अखंडता धोक्यात आणणे हेच त्यांना हवे असते. धार्मिक आधार घेत, छुपे युद्ध चालू ठेवण्याचा हा पाकिस्तानचा कट आहे.
ही साखळी अशी एकात एक गुंतलेली आहे. याची एकेक कडी आपल्याला एकेका दाहक वास्तवाशी जोडते. एकेक थरकाप उडवणारा प्रसंग, यातील प्रत्येक कडीशी जोडला गेलेला आहे. ही साखळी भारतापासून काश्मीरला कायमचे तोडण्यासाठी सातत्याने आवळली जात आहे. वेगवेगळ्या मार्गांनी पण सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याची पाळेमुळे इतिहासात शोधली, तर ती जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटपर्यंत जातात. त्याची पाळेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वर्षे ज्यांनी राज्य केले, त्या शेख अब्दुल्लांच्या धोरणांपर्यंत जातात. पेरलेली विषवल्ली पिढ्यानपिढ्या फुटीरतावादाचे विष पसरवते आहे.
‘जैश-ए-मोहम्मद’ने आतापर्यंत केलेले हल्ले :
१) काश्मीरमध्ये भारतीय लष्करी जवानांच्या बरॅकवर हल्ला-२०००
२) जम्मू आणि काश्मीरच्या विधान सभेवरचा हल्ला-२००१
३) भारताच्या संसदेवरचा हल्ला-२००१
४) पठाणकोट हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला-२०१६
५) मझार-ए-शरीफ या अफगाणिस्तानमधील शहरात, भारतीय दुतावासावर हल्ला-२०१६
६) उरीवर हल्ला-२०१६
७) पुलवामा हल्ला-२०१९
विशेष म्हणजे यात ‘फिदायीन’ म्हणजेच, आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यांचा समावेश आहे. याचा अर्थ हे हल्ले करताना, मरणासाठी कुणीतरी तयार झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची पुन्हा २०२१ साली राजवट आल्यानंतर, तालिबान आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ यांच्यात पुन्हा घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाल्याचे वृत्त आहे. “जैश-ए-मोहम्मद’ प्लॅनिंग अटॅक इन इंडिया, सेज रिपोर्टस, दि हिंदू, न्यू दिल्ली.” दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजी, जैशचा प्रमुख मसूद अजहरने ऑगस्ट २०२१ साली तालिबानच्या मुल्लाह बारादर याला कंदाहार येथे भेटून, काश्मीरबाबतीत मदत मागितल्याची बातमी होती. ‘जैश-ए-मोहम्मद’ पुन्हा नव्याने सक्रिय होणार यात शंका नाही. ज्या राहुल गांधींना भारत हे एक राष्ट्र नाही असे वाटते, त्यांच्याच अपहरणाचा कट २००७ साली याच ‘जैश-ए-मोहम्मद’ने रचून, त्यासाठी तीन फिदायीन दहशतवादी पाठवले होते. पण, उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना पकडून, हा कट उद्ध्वस्त केला होता. संदर्भ: ‘जैश-ए-मोहम्मद’ प्लॉट टू अबडक्ट राहुल गांधी फॉईल्ड, हिंदुस्थान टाइम्स, दि. १६ नोव्हेंबर २००७
‘जमात-उल-मुमिनात’ची स्थापना आणि विवेचन
या संघटनेपुढे कट्टर इस्लामी स्त्रियांना भरती करून घेण्याचे आव्हान असले, तरी त्यांना ते फारसे कठीण नाही. जैशचा इतिहास पाहता, त्यांना मनुष्यबळ उपलब्ध होण्यास फारशी अडचण येणार नाही. जे दहशतवादी जैशसाठी ठार झाले आहेत, त्यांच्या पत्नी, बहिणी, मुली हेच त्यांचे पहिले लक्ष्य आहेत. कारण, त्यांची प्रतिशोधाची आग प्रज्वलित करणे सोपे असते. संघटनेसाठी हौतात्म्य पत्करणे त्यांनी जवळून अनुभवलेले असते आणि त्याचा त्यांना अभिमानही असतो. जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडणे हेच त्यांच्यासाठी एकमेव ध्येय आहे. त्यासाठी वाटेल ते करायला तयार होणार्या स्त्रिया त्यांना हव्या आहेत.
दहशतवादी संघटनेला महिलांना भरती करून घेणे आवश्यक वाटते, यामागे अनेक मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय कारणे आहेत. पूर्वी ‘एलटीटीई’ तसेच ‘पॅलेस्टिनी संघटना’, ‘बोको हराम’, ‘इसिस’, रशियातील ‘ब्लक विडो’ अशा अनेक आत्मघातकी महिला संघटना सक्रिय आहेत. दहशतवादी संघटना महिलांना भरती करून घेतात कारण, महिलांवर लगेच कुणी संशय घेत नाही, त्या सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीतून सहज सुटू शकतात, शस्त्रे पोहोचवणे, पुरुष दहशतवाद्यांसाठी स्वयंपाक, देखभाल आणि वासना शमवणे (सेक्स स्लेव्ह) अशा अनेक कारणांनी महिलांची भरती जगभर केली जाते.
महिला या जास्त संवेदनशील असल्याने, त्यांचा भावनिकदृष्ट्या गैरफायदा घेणे सोपे असते. शिवाय आपल्या पती, पिता, भाऊ, मुलगा यांच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी त्यांना भडकवून, दहशतवादी संघटना आपले स्वार्थ पूर्ण करतात याची अनेक उदाहरणे आहते. शहीद झालेल्या महिला दहशतवाद्याला शहादत प्राप्त झाले म्हणून, त्याचे मोठे उदात्तीकरण केले जाते. त्यांचे पोस्टर्स, ध्वज, टी-शर्ट, वेबसाईटवर फोटो टाकून, त्यांना आदर्श म्हणून प्रोजेक्ट केले जाते. हे त्यांचे एकप्रकारे मार्केटिंगसुद्धा असते.
समारोप
‘जमात-उल-मुमिनात’ची स्थापना होणे हे भारतीयांसाठी आव्हान आहे. आपला देश तोडण्यासाठी ही संघटना स्थापन झाली आहे. अनेक प्रकारे प्रपोगंडा वॉर, मानसशास्त्रीय युद्ध, सोशल मीडियावर तसा कंटेट, समाजात जातीवरून वादविवाद अशा सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जाऊ शकतात. म्हणूनच, एकेकाळी अखंड असणारा भारत हे ऐतिहासिक वास्तव होते, आज ते आपले स्वप्न झाले आहे! देश तुटत नाही, तोडला जातो. त्यासाठी शत्रू राष्ट्र दहशतवादी संघटना पाळतात. भारतीय नागरिक म्हणून आपण किती काळजी घेणे आवश्यक आहे, हेच यातून अधोरेखित होते.
रुपाली कुलकर्णी -भुसारी
(लेखिका एकता मासिकाच्या संपादिका आहेत.)