सुगंधाचा राजदूत...

13 Oct 2025 12:00:35

सध्याच्या व्यस्त जीवनात एकत्र येण्याची संधी दुर्मीळ झाली आहे. अशावेळी फुलांच्या माध्यमातून कुटुंबांना आणि समाजाला एकत्र आणणार्‍या तरुण उद्योजक आशुतोष दिघे यांच्याविषयी...

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एकत्र बसून जेवण करणे, कधीतरीच सणासुदीच्या दिवशीच केवळ शक्य होते. घरातील सदस्य आपापल्या कामात, अभ्यासात किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्येच हरवलेले आढळून येतात. अशावेळी कोणीतरी आपल्याला एकत्र येण्याची सुंदर आठवण करून देतो, तेही फुलांच्या माध्यमातून! पुण्यातील आशुतोष दिघे हे नाव आता अशाच प्रेरणादायी कार्याशी जोडले गेले आहे.

फुलं म्हणजे केवळ सजावट नाही, तर ती आनंदाची, एकतेची आणि सकारात्मक ऊर्जेची भाषा आहे, असे आशुतोष यांचे म्हणणे आहे. लहानपणापासूनच बागेत रमणारा आणि फुलांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारा हा तरुण आज फुलांना जीवनाच्या अर्थाशी जोडतो आहे. आशुतोषचे बालपण पुण्यातच गेले. प्रभात रस्ता, डेक्कन, भंडारकर रस्ता हे परिसर त्याला तोंडपाठ आहेत. अभिनव विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर, वाणिज्य शाखेत पदवी आणि नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार विषयात पदव्युत्तर शिक्षण आशुतोषने पूर्ण केलं. मात्र, त्याचे मन मात्र नेहमीच सर्जनशीलतेकडे झुकलेले होते. बागेत वेळ घालवणं, झाडांशी बोलणं आणि त्यातून सुंदर फुलांचे गुच्छ तयार करणे हा त्याचा नित्यनेमच. या छंदानेच त्याच्या पुढील वाटचालीचा पाया घातला गेला.

आशुतोषचा याच छंदाने हळूहळू व्यवसायाचे रूप घेतले. फुलांची आकर्षक आरास, सण-समारंभांसाठी सजावट आणि विविध प्रसंगांसाठी फुलांचे प्रयोग यामधूनच ‘फ्लॉवर आर्ट डेकोर’ या संकल्पनेचा जन्म झाला. सुरुवातीला मित्रपरिवारात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या सजावटी लवकरच संपूर्ण पुण्यात आणि नंतर महाराष्ट्रभर चर्चेत आल्या. फुलांची सजावट हा केवळ सौंदर्याचा भाग नाही, तर रोजगाराचे साधनही ठरू शकते, हेच आशुतोषने सिद्ध करून दाखवले. सजावट करण्यासाठी लागणारे लोक, फुलांची निवड, आराखडा तयार करणे आणि सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये वेळेत काम पूर्ण करणे, या सगळ्यांमध्ये अनेक हात कामाला लागतात. त्यामुळे आजमितीला आशुतोषच्या या उपक्रमातून अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे.

‘जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या न्यायाने आशुतोष फुलांची सजावट कशी करावी, कोणती फुलं टिकतात आणि आराखडा कसा तयार करावा, यावर नियमितपणे कार्यशाळाही घेतो. अनेक वेळा हे प्रशिक्षण तो विनामूल्यच देतो. अनेक तरुण-तरुणींनी या प्रशिक्षणातूनच स्वतःचा छोटा व्यवसाय आज उभा केला आहे. फुलांच्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पुरवठा साखळी! पुण्याच्या आसपासच्या गावांमध्ये फुलांची शेती मोठ्या प्रमाणात होते. परंतु, व्यावसायिक बहुधा बाहेरच्या बाजारातूनच फुले मागवतात. जिथे पिकते तिथे विकले जात नाही, ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते. या विसंगतीकडे लक्ष वेधतानाच, आशुतोष स्थानिक शेतकर्‍यांकडून थेट फुलं घेण्याचेही आवाहन करतो. त्याच्या पुढाकारामुळेच काही शेतकर्‍यांना चांगला दर आणि स्थिर बाजार मिळू लागला आहे.

‘फुलं जी जोडतात नाती’ ही एक अद्भुत संकल्पना! आशुतोषच्या उपक्रमाचा सर्वांत सुंदर भाग म्हणजे, ‘फुलं जी जोडतात नाती’ ही संकल्पना. आज अनेक कुटुंबांना एकत्र वेळ घालवण्यास अवकाश मिळत नाही. म्हणून त्याने खास वीकेंड फ्लॉवर किट सुरू केले आहे. आठवड्याच्या शेवटी घरपोच पोहोचणार्‍या या किटमध्ये सुंदर फुले, सजावटीच्या सूचना आणि लहान साहित्य दिले जाते. संपूर्ण कुटुंब मग दोन तास तरी एकत्र बसून फुलांची आरास करते, हसते, बोलते आणि एकमेकांसोबत छान वेळ घालवते. या छोट्या उपक्रमामुळे आज कित्येक घरात पुन्हा संवाद सुरू होऊन आनंद फुलला आहे.

याच धर्तीवर कॉर्पोरेट जगतातील कर्मचार्‍यांसाठीही आशुतोषने ‘ऑफिस फ्लॉवर किट’ ही संकल्पना सुरू केली आहे. प्रत्येक सोमवारी हे फुलांचे किट ऑफिसमध्ये पोहोचते. कर्मचारी एकत्र बसून सजावट करतात, त्यामुळे ‘टीमवर्क’ आणि ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होते. अनेक कंपन्यांनीही हे उपक्रम नियमितपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. आशुतोषचे फुलांवरील प्रयोग आता देशोदेशी पोहोचले आहेत. विविध देशांना भेट देताना, तो भारतीय फुलांचा प्रसारही करतो. सध्या तो कॅनडामध्ये फुलांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आहे.

प्रत्येक फुलात एक भावना असते; त्यातून माणसं जोडली जातात असे तो ठामपणे सांगतो. कोणाचा वाढदिवस असो, लग्नसमारंभ असो की, कॉर्पोरेट कार्यक्रम आशुतोषच्या हातची फुलांची सजावट आता ‘स्पेशल टच’ मानली जाते. त्याच्या फुलांनी केवळ जागा सुशोभित होत नाही, तर माणसांच्या नात्यांनाही नवी उमेद मिळते. आशुतोष दिघेचा प्रवास हेच दाखवतो की, सर्जनशीलतेला दिशा दिली, तर ती समाजात सकारात्मक बदल घडवू शकते. फुलांचा सुगंध पसरवत तो आज अनेकांच्या जीवनात हसू, रंग आणि एकत्रतेचा आनंद फुलवत आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून या प्रेरणादायी तरुणाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0