नवी मुंबई : 'सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटना, सीवूड्स' यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 'आजी केअर सेवक फाऊंडेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) . प्रकाश बोरगांवकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना आनंदी आणि उत्साही जीवन जगण्याचा संदेश दिला.
बोरगांवकर यांनी आपल्या व्याख्यानात वाढलेल्या सरासरी वयोमानामुळे देशात ज्येष्ठांची संख्या मोठी असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. मात्र, या समस्यांचा फार बाऊ न करता समाजामध्ये मिसळून, हसत-खेळत जीवन जगल्यास हे जीवन सुंदर वाटेल, असा मोलाचा सल्ला त्यांनी ज्येष्ठांना दिला. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन ज्येष्ठांनी आनंदी कसे रहावे, याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष . सुधाकर पाटील होते. याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या. सुनील बंदरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, संस्थेतर्फे आयोजित कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन आणि नियोजन संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पोटे यांनी केले. संस्थेचे सचिव . नामदेव इंदुलकर यांनी प्रमुख वक्ते प्रकाश बोरगांवकर आणि त्यांच्या पत्नी यांचा सत्कार करून, उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले. संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ या समारंभासाठी उपस्थित होते.