'विद्यादान'चे कार्य विकसित भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल : डॉ. प्राची जांभेकर
12-Oct-2025
Total Views |
मुंबई : विद्यादान सहाय्यक मंडळाचे कार्य विकसित भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरेल, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले. १६ वा केशवसृष्टी पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्था, ठाणे पश्चिम येथे संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सामाजिक संस्था चालविणाऱ्या साधारण ४० वर्ष वयाच्या आसपास असणाऱ्या युवक-युवतीची निवड करून त्यास हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा १६ वा केशवसृष्टी पुरस्कार विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापिका गीता शहा यांना डॉ. प्राची जांभेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर केशवसृष्टीच्या उपाध्यक्षा डॉ. अस्मिता हेगडे, केशवसृष्टी पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा अमेया जाधव उपस्थित होत्या.
डॉ. प्राची जांभेकर यांनी विद्यादान सहाय्यक मंडळाच्या कार्याचे कौतुक करत संस्थेचा 'मुलांचे पालकत्व घेण्याचा' भाग वाखाणण्याजोगा असल्याचे त्यांनी म्हटले. कुठलाही गाजावाजा न करता संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू असून संस्थेचे विद्यार्थी विकसित भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापिका गीता शहा यावेळी म्हणाल्या, विद्यादानाच्या प्रवासाला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजचा पुरस्कार सोहळा आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. पुरस्कार स्वीकारताना याक्षणी अनेक आठवणी मनात जमल्या आहेत. हा पुरस्कार संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी, कार्यकर्ता पालक, संस्थेशी निगडित प्रत्येकाला समर्पित आहे. आमचे मार्गदर्शक नानिवडेकर सरांमुळे आज मी इथवर पोहोचले आहे. हा सन्मान माझ्यासाठी जबाबदारीचे प्रतीक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अमेया जाधव, आभार प्रदर्शन डॉ. अस्मिता हेगडे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना वाडे यांनी केले. संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.