महापालिका आयुक्तांची अनोखी संवेदनशीलता ; पदोन्नत कर्मचाऱ्यांची त्यांच्या संमतीने पदस्थापना!

12 Oct 2025 16:03:22

कल्याण : महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने अनेक कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती दिली यामध्ये वर्ग एक ते चार मधील सर्व संवर्गांच्या समावेशक पदोन्नती द्वारे लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर,वरीष्ठ लिपिकांना अधीक्षक आणि अधिक्षकांना सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यात आली.

या सर्व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात पाचारण करून उपलब्ध रिक्त पदांची माहिती देऊन त्यांच्या स्वेच्छेनुसार पदस्थापना देण्यात आली. आयुक्त अभिनय गोयल यांनी सदर कर्मचारी सद्यस्थितीत व त्यापूर्वी कार्यरत असलेले विभाग वगळून इतर विभागातील उपलब्ध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांच्या संमतीने ,त्यांचे समुपदेशन करीत बदलीने पदस्थापना देऊन काम करण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली.

कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या विभागात काम करून तेथील कामकाज आत्मसात करून ,कार्यप्रवण होऊन अधिकाधिक चांगले काम करावे हा यामागील उद्देश असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान दिव्यांग व महिला कर्मचाऱ्यांना विभाग निवडीसाठी विशेष प्राधान्य देऊन आपली अनोखी संवेदनशीलता आयुक्तांनी जपल्याचे देखील यावेळी दिसून आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे,सहा.आयुक्त सुषमा मांडगे उपस्थित होत्या.

पदोन्नतीनंतरच्या बदलीमध्ये पारदर्शकता असावी यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपीटी स्वरूपात महापालिकेच्या आकृतीबंधानुसार रिक्त पदांचे सादरीकरण कर्मचार्‍यांसमोर केले होते. कर्मचाऱ्यांच्या पसंती क्रमानुसार ,जेष्ठता यादीनुसार त्यांना त्यांच्या आवडीचे पद निवडण्याची संधी देण्यात आली. यावेळी आयुक्तांनी महिला आणि दिव्यांग यांच्या प्रति दाखवलेल्या सहानुभूतीमुळे तसेच बदलीसाठी कर्मचारी वर्गास पसंती क्रम दर्शवण्यासाठी सांगितल्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले .



Powered By Sangraha 9.0