हंबरडा मोर्चा काढून उद्धव ठाकरेंची नौटंकी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

12 Oct 2025 16:16:01

मुंबई : हंबरडा मोर्चा काढून उद्धव ठाकरे नौटंकी करत आहेत. त्यांनी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजचा अभ्यास केला पाहिजे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना पॅकेज आणि इन्शूरन्समधील अर्थ कळत नाही यापेक्षा हास्यास्पद काय आहे? त्यांनी कधी आम्ही दिलेल्या पॅकेजचा अभ्यास केला का? १०० तालुके का वाढवले म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करत आहात. मुख्यमंत्र्यांनी मदतीपासून सुटलेले तालुके पुन्हा जोडले. हंबरडा मोर्चा काढून तुम्ही नौटंकी करत आहात. उद्धव ठाकरेंनी पॅकेजचा अभ्यास केला पाहिजे.”

मविआच्या नेत्यांनी मतदार याद्या तपासाव्या

“मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणूकीत जाणूनबुजून संभ्रम तयार केला होता. आता संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांनी चार चार वॉर्डमध्ये जाऊन याद्या बरोबर आहेत की, नाही त्या बघाव्या. आता त्यांना आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. तुमचे बुथ पातळीवरील एजेंट काय करतात? पण त्यांना मतदार यादीवर लक्ष द्यायचे नाही. निवडणूक हरल्यावर तर मतचोरी झाली असे ओरडतात. पण हा खोटारडेपणा चालणार नाही. आम्ही ५१ टक्के मते घेऊन सत्तेत आलो असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही महायूती जिंकेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये महायूतीची चाचपणी करा, असे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहे. जिथे शक्य आहे तिथे सगळीकडे महायूती करा. महायूती आपला धर्म आहे. एखाद्या ठिकाणी यूती झाली नाही तर मनभेद तयार होतील अशी टीका महायूतीतील पक्षावर करू नका. आपल्याला मोठे भाऊ म्हणून काम करायचे आहे. मोठे भाऊ म्हणून आपण राज्य चालवतो आहोत. त्यामुळे मित्रपक्षांवर जहरी टीका करू नका,” अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0