धर्मांधांची 'सर तन से जुदा' ची मानसिकता देशासाठी घातक

    12-Oct-2025
Total Views |

मुंबई : भारतात राहून इथल्या हिंदूंना सर तन से जुदा अशा धमक्या दिल्या जातात. संविधानाने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला असताना देखील असे बोलले जाते. अशी विधाने करणाऱ्यांची मानसिकता देशासाठी घातक आहे. असे मत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले की, सर तन से जुदा असं जर कोणी म्हणत असेल तर मग मोठी अडचण आहे. इथल्या हिंदूना छेडण्याची हिंमत करू नये. कुणी विनाकारण छेडले तर मग सोडणार नाही, हिंदू युवतींना जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतरण केले जाते. त्यामुळेच संपूर्ण भारतातला लव्ह जिहाद बंद व्हावा अशी मागणी आहे.

ते पुढे म्हणाले की, ७ ते १६ नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा काढणार आहे. देश हिंदू राष्ट्र व्हावा यासाठी आज सिद्धी विनायकाकडे प्रार्थना केली आहे. हिंदू म्हणून एक होण्याची ईश्वराने सर्व हिंदूंना सद्बुद्धी द्यावी. तसेच भारतीय राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला कुठेही जाण्याची परवानगी दिली आहे. लवकरच पश्चिम बंगालमध्ये कथा-किर्तन करणार आहे.

यावेळी लंडन येथील एका कार्यक्रमातली आठवण सांगताना ते म्हणाले की, लंडनमधील कार्यक्रमात एक खान नावाची व्यक्ती आली होती. ते पाकिस्तानमध्ये महापौर पदावर होते. पण पुढे ते सनातनी झाले. त्यांनी गीता वाचली आहे. पण त्यांनी नाव बदलले नाही. आपण नावात बदल करावा का अशी विचारणा त्यांनी केली. त्यांना सांगितले की, तुम्हाला तुमचे मूळ स्थान सापडले आहे त्यामुळे नावासारख्या वरवरच्या गोष्टींनी फरक पडत नाही. अनेकांना तर स्वत: ची खरी ओळखच लक्षात येत नाही.