म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५,३५४ सदनिका व ७७ भूखंडांच्या सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    12-Oct-2025
Total Views |

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून पुढील पाच वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, कामकाजी महिला आणि सर्वसामान्यांसाठी वसतिगृहे, भाडेतत्त्वावरील घरे आणि पुनर्विकास प्रकल्पांची अंमलबजावणी ही सरकारची प्रमुख दिशा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे पश्चिम येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५,३५४ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या संगणकीय सोडतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या सोडतीत तब्बल १,५८,४२४ अर्जदारांनी सहभाग घेतला, ज्यातून म्हाडावर नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित झाला.

या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्र हे गृहनिर्माण धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना नवी गती मिळावी यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका या संस्था युद्धपातळीवर कार्यरत आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पुढील पाच वर्षांत गृहनिर्माण क्षेत्रात सुमारे ५० लाख कोटींची गुंतवणूक होणार असून ३५ लाख घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे.” केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा कर कपातीमुळे घरांच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

एमएमआर ग्रोथ हब अंतर्गत २०३० पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात ३० लाख घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आठ लाख घरे म्हाडामार्फत उपलब्ध होणार आहेत.

म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “कोकण मंडळाच्या या चौथ्या संगणकीय सोडतीतून गेल्या तीन वर्षांत एकूण १३,५०० घरे उपलब्ध झाली आहेत. पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या मंडळांमार्फत म्हाडाने तब्बल ४१,५०० घरे सोडतीद्वारे दिली आहेत.”

त्यांनी पुढे म्हटले की, “पुढील काळात बीडीडी चाळी, सायन कोळीवाडा, कामाठीपुरा, गोरेगाव, वरळी आणि जोगेश्वरीतील विविध समूह पुनर्विकास प्रकल्पांद्वारे सुमारे दोन लाख नवीन घरे निर्माण होतील. तसेच गिरणी कामगारांसाठी एक लाख पात्र कुटुंबांची निवड पूर्ण झाली असून त्यांना घरे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हाडाचे उपअभियंता अभय कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी केले.