
मुंबई : भारतात केशकर्तनातील जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एसके हेअरड्रेसिंग स्कूलने आपले दुसरे प्रशिक्षण केंद्र आज मुंबईत सुरू केले. भारतीय सलून क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची कमतरता दूर करणे आणि शिक्षणाचा दर्जा वाढवणे हा एसके ब्यूटी रिसोर्सेस या कंपनीच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश आहे. मुंबईतील नवे केंद्र महालक्ष्मी येथील टंटिया जोगानी इस्टेट या मध्यवर्ती परिसरात उघडण्यात आले आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला गुरगाव येथे सलून सुरू केल्यानंतर या स्कूलचे हे दुसरे सलून आहे. कंपनी सध्या काम करत असलेल्या आणि नवोदित केशकर्तनकारांना केशकर्तनाचे अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण आणि व्यवसायाचेही प्रशिक्षण देते. कुशल व्यावसायिकांची संख्या वाढवून या क्षेत्रातील उत्तम कारागिरांची कमतरता दूर करण्यावर कंपनीचा भर आहे.
एसके ब्यूटी रिसोर्सेसचे संचालक शुभम विरमानी म्हणाले, “एसके हेअरड्रेसिंग स्कूल हे व्यावसायिकांना त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर सक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. जे सलून मालक आपल्या कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊ इच्छितात, त्यांच्यासह नवोदित विद्यार्थ्यांपासून ते आपले कौशल्य वाढवू इच्छिणाऱ्या अनुभवी हेअरड्रेसरपर्यंत सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण अधिक सुलभ व प्रभावीपणे देण्याचा आमचा उद्देश आहे. एसके हेअरड्रेसिंग स्कूल मुंबईत सुरू करून आम्ही कुशल सलून व्यावसायिकांचा भक्कम समुदाय तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.”
एसके ब्यूटी रिसोर्सेसचे संचालक अंकित विरमानी म्हणाले, “व्यावसायिक शिक्षण हा सलून उद्योगाच्या यशस्वी वाटचालीचा आधारस्तंभ आहे, असे आमचे मत आहे. आधुनिक आणि सर्वंकष प्रशिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही सलून व्यावसायिकांना नवीन कौशल्ये आणि उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि माहितीने सुसज्ज करत आहोत. देशातील सौंदर्यनिगा उद्योगातील कौशल्य आणि मापदंड उंचावणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
देशातील संघटित सलून क्षेत्रातील व्यापक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा विस्तार होत आहे. सलून व्यावसायिकांना नेहमीच प्रशिक्षित केशभूषाकार आणि स्टायलिस्टची भरती करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे या आव्हानांना सामोरे जावे लागते. यामागे मुख्य कारण मर्यादित औपचारिक प्रशिक्षण सुविधा आणि इतर सेवा क्षेत्रांमधील स्पर्धा हे आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. एसके हेअरड्रेसिंग स्कूलच्या अभ्यासक्रमात केशभूषा तंत्रासह व्यवसाय करण्याच्या कौशल्याचाही समावेश आहे. हे अभ्यासक्रम केवळ तांत्रिक कौशल्येच शिकवत नाही, तर सलून व्यवसायाच्या व्यवस्थापनाचे शिक्षणही देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीसाठीच नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही तयार केले जाते.