अमेरिकेत यहुदी आणि हिंदू समाजाचा शांती, संवाद आणि एकतेचा संदेश

    12-Oct-2025
Total Views |

मुंबई : इस्रायलवरील ७ ऑक्टोबर २०२३ च्या हमास हल्ल्यानंतर जगभरात तणाव निर्माण झाला असताना, अमेरिकेतील ह्यूस्टन शहरात स्थानिक हिंदू आणि यहुदी बांधवांनी धार्मिक ऐक्य आणि परस्पर सहकार्याचे उदाहरण घालून दिले. दोन समाजांनी हातात हात घालून एकमेकांना पाठिंबा देत आंतरधर्मीय भागीदारीची नवी परंपरा निर्माण केली.

मिळालेल्या माहीतीनुसार, ह्यूस्टनमधील हिंदू आणि यहुदी समुदायांनी एकत्र येऊन शांती, संवाद आणि एकतेचा संदेश देणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले. दोन्ही समुदायांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांनी 'इंटरफेथ सॉलिडॅरीटी इनिशिएटिव्ह' अंतर्गत सहकार्य करत परस्पर भेटी, प्रार्थना सभा आणि सार्वजनिक चर्चासत्रांचे आयोजन केले.

या उपक्रमांबद्दल बोलताना स्थानिक हिंदू नेता डॉ. सुरेश पटेल म्हणाले, "संकटाच्या काळात एकमेकांच्या बाजूने उभे राहणे हेच खरे श्रद्धा आणि मानवतेचे लक्षण आहे. यहुदी समाजाने सदैव हिंदूंसोबत सांस्कृतिक सहकार्य केलं आहे, आणि आता हिंदूंचे कर्तव्य आहे की त्यांच्या दुःखात आपण सहभागी व्हावे.”

ह्यूस्टनमधील यहुदी संघटनांच्या प्रतिनिधी सारा गोल्डमन यांनी सांगितले की, “या काळात हिंदू बांधवांनी दाखवलेले सहकार्य आमच्यासाठी भावनिक आधार ठरले. आपण कायमच एकमेकांचा सन्मान करत सर्व परंपरा एकत्रित साजऱ्या करूयात.”

ह्यूस्टन शहर हे अमेरिकेतील सर्वाधिक विविधतेने नटलेले धार्मिक केंद्र मानले जाते. येथे हिंदू मंदिरे आणि यहुदी सिनेगॉग शांततेत उत्सव साजरे करतात. हिंदू आणि यहुदी समुदायांनी एकत्र येऊन शांती आणि एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम केल्यामुळे अमेरिकेतील इतर शहरांमध्येही आंतरधर्मीय संवाद वाढण्यास प्रेरणा मिळेल असे सांगितले जाते.