कातकरी समाजाचा धर्मांतरणविरोधी कायद्याची मागणी ; कर्जत येथे जनजागरण सभेत तरुणांचा ठाम निर्धार
12-Oct-2025
Total Views |
रायगड : महाराष्ट्रात वाढत्या धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी ‘धर्मांतरण बंदी कायदा’ अस्तित्वात आणावा, अशी मागणी कातकरी समाजाच्या जनजागरण सभेत करण्यात आली. कर्जत येथे जनजाती-कातकरी समाजातील जागृत तरुण व महिलांनी आयोजित केलेल्या या सभेत धर्मांतरणाच्या वाढत्या घटनांबाबत चर्चा करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
सभेत बोलताना समाजातील तरुणांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील काही वाड्या-वस्त्यांवर इसाई मिशनरी संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असून, गरीब व अज्ञान कुटुंबांना आर्थिक आणि वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाकडे प्रवृत्त करत आहेत. यामुळे समाजात फूट पडत असून, गावागावात दोन विचारधारा निर्माण झाल्या आहेत, अशी खंत सभेत व्यक्त करण्यात आली.
समाजातील काही बांधवांनी प्रशासकीय नोंदींमध्ये हिंदू म्हणून लाभ घेत असतानाच, धार्मिक आचरणात मात्र इसाई पद्धती स्वीकारल्याचे उदाहरणही सभेत मांडण्यात आले. अशा प्रकारे समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखीवर आघात होत असल्याचे सभेत वक्त्यांनी स्पष्ट केले.
सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी इतिहासातील धर्माधारित फाळणीचे उदाहरण देत हिंदू समाजाच्या लोकसंख्येत घट झाल्यास सामाजिक असंतुलन वाढते, असे सांगितले. ईशान्येकडील काही राज्यांतील परिस्थितीचा उल्लेख करत महाराष्ट्रातही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने कायदा करणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर धर्मवीर नाग्या कातकरी प्रतिष्ठान आणि जनजाती समुदाय, रायगड जिल्हा यांच्या वतीने राज्य सरकारने लवकरात लवकर ‘अवैध धर्मांतरण बंदी कायदा’ लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.