नवी मुंबई : सिडको महामंडळाने संपादित केलेल्या आणि संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडांवर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांविरुद्ध सिडकोने आपली मोहीम तीव्र केली आहे. मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला धोकादायक असलेले हे डेब्रिज टाकल्याप्रकरणी खारघर येथे एका डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि नवी मुंबई पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. १०/१०/२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास, खारघर सेक्टर-११, सुवर्णगंगा चौक ते कोपरा, खारघर, नवी मुंबई येथे डंपर क्रमांक MH-46-CU-7870 चा चालक व्यंकटेश बाबुराव भोसले (वय ३४ वर्षे, रा. साई ज्वेलस को-ऑप हौसिंग सोसायटी, नावडे कॉलनी, फेज-२ नावडे, पनवेल, जिल्हा रायगड) हा आपल्या डंपरमधून मानवी आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रिज टाकताना रंगेहाथ पकडला गेला.
या घटनेनंतर, वर नमूद डंपर चालकाविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४२०/२०२५, भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ चे कलम २७१ प्रमाणे १०/१०/२०२५ रोजी ११:१५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सिडकोने पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित पोलीस ठाण्यात कळवावे. सिडको आपल्या कार्यक्षेत्राचे सुनियोजित स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी अनधिकृत कृत्ये करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.