
"सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले
ध्येय महासागर में सरित रूप हम मिले
लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभय गान है
सेवारत व्यक्ति व्यक्ति कार्य का ही प्राण है"कधीकधी काही व्यक्तिमत्वं शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता आपल्या कार्यातून असा ठसा उमटवतात की त्यांच्या जाण्यानंतर जाणवतं अरे, आपण एका युगपुरुषासोबतच चालत होतो! कै. अशोक अनंत ढापरे हे असंच एक तेजस्वी नाव.१९३१ साली खत्तलवाड, संजाण (गुजरात) या गावात जन्मलेल्या अशोकजींचं बालपण राजकीय घडामोडींच्या आणि राष्ट्रीयतेच्या सुरस कथा ऐकत गेले. घरातील वातावरण काँग्रेसप्रणीत होतं, वडील स्वतः काँग्रेस कार्यकर्ते. पण हृदय मात्र संघाच्या विचारांकडे झुककेलं. अशोक हे वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी, वडिलांच्या नकळत ते शाखेत जाऊ लागले आणि सुरू झाला आयुष्यभरासाठीचा प्रवास.
उंबरगावला शिक्षणासाठी स्थलांतर झाल्यावरही शाखा सोडली नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. दूध विक्रीपासून ते शेतीपर्यंत जे काही करता येईल ते त्यांनी केलं, पण शाखा आणि संघकार्य यावरचा विश्वास ढळला नाही. वयाच्या पंचविसाव्या वर्षी वडिलांचं निधन झालं, दोन लहान भावंडं, घर, जबाबदाऱ्या पण अशोकजींनी कर्तव्यासाठीचा हात मागे घेतला नाही. सरकारी नोकरी टेलिफोन खात्यात, तीनही शिफ्टमध्ये काम करतानाही, कधी प्रभात शाखा, कधी सायं शाखा, तर कधी रात्र शाखा, त्यांची हजेरी कायम राहिली.
१९६८ साली विरारमध्ये स्थायिक झाल्यावर वर्मा यांच्यासोबत संघ विस्तार सुरू केला. विरार पूर्व-पश्चिम, अर्नाळा, उमराळे, भुईगाव, खानिवडे,चांदीप, संघाच्या शाखा रुजत गेल्या. मित्र कारुळकर व इतर कुटुंबांची साथ लाभली. कार्य वाढत असतानाच १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाली. संघावर बंदी आली. एक रात्री पोस्टर्स लावताना अटक झाली. सहा महिन्यांचा तुरुंगवास पत्करूनही मनोबल ढळले नाही. गुप्तपणे शाखा सुरू ठेवणं, भूमिगत कार्य करत राहणं हे सोपं नव्हतं, पण ते अशोकजींसाठी आदर्श होतं. रामजन्मभूमी आंदोलनात ही त्यांचा सहभाग होता. १९९२ मध्ये झालेल्या कारसेवेत त्यांनी विरार-वसईतील कार्यकर्त्यांसोबत सक्रिय भाग घेतला. रामकृष्ण मिशन, विश्व हिंदू परिषद, साप्ताहिक विवेक, वनवासी कल्याण आश्रम, मराठी शाळा स्थापन ,अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा प्रभावी सहभाग राहिला.
विशेष म्हणजे, संघ शिक्षा वर्गात, बैठकीत, छोट्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणं, निकालानंतर अभिनंदन करणं, पत्र पाठवणं, ही लहान गोष्टी ज्या आपुलकीने ते करत, त्यातून त्यांचं माणुसकीचं, नात्यांचं मूल्य दिसून यायचं. ते नेहमी सांगायचे, "विरोध हा व्यक्तीविषयक नसतो, तो वैचारिक असतो. म्हणून मतभेद असले तरी आपलेपण हरवू नका."
कार्यक्रमांच्या निमंत्रणात नेहमी त्या मंडळींचाही समावेश असायचा, ज्यांच्याशी मतभिन्नता होती. त्यांचा विश्वास होता, “प्रयत्न सुरू ठेवले, की कधी ना कधी मतपरिवर्तन होईल.” १९७७ साली पालघर येथे झालेल्या वर्गात त्यांनी एका लाडू विक्रेत्याची गोष्ट सांगितली होती व रोज विक्री न केल्यामुळे लाडू खराब होऊन आर्थिक नुकसान झाल्याने लाडू विक्रेत्यांची दुकानही बंद झाले म्हणून सातत्य महत्वाचे. “स्वयंसेवक हे संघाचं भांडवल आहे. त्यांच्यावर दुर्लक्ष झालं तर शाखाच बंद पडू शकते.”
आजही ती शिकवण अनेक कार्यकर्त्यांच्या मनात घर करून आहे. सेवानिवृत्तीनंतर हृदयविकाराने त्रास झाला, पण त्यानंतरही ते शाखेची उपस्थिती, मार्गदर्शन, समाजप्रबोधन यातून मागे हटले नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत ते संघाशी जोडलेले राहिले. अशोक ढापरे यांचं जीवन म्हणजे जणू ध्येयाच्या यज्ञात समिधा बनून झिजलेले एक तेजोमय अस्तित्व.त्यांचा त्याग, निष्ठा, संयम, आणि सातत्य हे आजही नव्या पिढीला स्फूर्ती देतात. संघाची मशाल त्यांनी नेहमीच प्रज्वलित ठेवली.
संघाच्या कार्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन वैचारिक पेरणी केली आणि आज विरार परिसरात जे कार्यकर्ते तयार झाले, त्यामध्ये कै. दिनेश सकपाळ, ज्यांनी अनेक वर्षे विश्व हिंदू परिषदेचे निष्ठेने काम केले, उदय कडीकर, दिपक वर्मा, शाम सामंत आणि त्यांचे स्वतःचे चिरंजीव निलेश ढापरे अशी अनेक नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. संघाचा विचार, सेवाभाव आणि संघटनकौशल्य यांचे मूर्त स्वरूप त्यांनी आपल्या जीवनातून दाखवले. वसई जनता सहकारी बँकेच्या स्थापनामध्ये आणि विरारमधील संजीवनी रुग्णालयाच्या उभारणीमध्ये त्यांचे योगदान हे केवळ उल्लेखनीयच नाही, तर प्रेरणादायी आहे.
आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अनघा ढापरे, दोन मुले अमित आणि निलेश, दोन सुना आणि नातवंडे असा कुटुंबीयांचा मोठा आणि एकसंघ परिवार त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेतो आहे. अशोक ढापरे यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.