आपल्या असमान्य अभिनयाने मराठी रंगभूमीवर तसेच सिनेसृष्टीमध्ये स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे अशोक समेळ, तितकेच सशक्त लेखक म्हणून वाचकांच्या भेटीला आले आहेत. दि. 12 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या टिळक रोड येथील ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ येथे सायंकाळी 5.30 वाजता, ‘द्रौपदी : काल आज उद्या’ या महाकादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आडकर फाऊंडेशन’ तथा ‘डिंपल पब्लिकेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने, हा प्रकाशन सोहळा होणार आहे. या कादंबरीचे प्रकाशन वैशाली माशेलकर यांच्या शुभ हस्ते होणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘पद्मविभूषण’ डॉ. रघुनाथ माशेलकर भूषवणार आहेत. त्याचबरोबर या प्रकाशनासोबत ‘द्रौपदी : काल आज उद्या’ या कादंबरीचे अभिवाचनसुद्धा पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने अशोक समेळ यांच्याशी दै. ’मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
‘मी अश्वत्थामा चिरंजीव’, ते ‘आभाळ भीष्माचं होतं’ या तुमच्या दोन महाकादंबऱ्यांनंतर तुमची द्रौपदीवरची तिसरी महाकादंबरी प्रकाशित होत आहे, काय भावना आहेत आपल्या?
आजच्या आधुनिक युगामध्ये आधुनिक मूल्यांचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये झालेला आहे, असे आपल्याला दिसून येते. याच पार्श्वभूमीवर आपण स्त्रीशक्तीचा विचार करतो. भारतीय परिप्रेक्षात बघायाचे झाल्यास, सीता आणि द्रौपदी या आदर्श म्हणून आपल्यासमोर उभ्या राहतात. द्रौपदी सीतेपेक्षा जास्त पतिव्रता होती, असं मला वाटतं. मागची काही वर्षे महाभारताच्या खंडांचा अभ्यास मी करत आहे, त्यासाठी मी खूप संशोधन केलं. जवळपास 18 हजार पाने मी वाचली आहेत. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ साकारताना मी महाभारताचा शेवट सांगितला, द्रौपदीच्या माध्यमातून मला महाभारत उलगडायचं होतं. द्रौपदी ही विद्वान स्त्री होती. नव्या युगातील स्त्रियांनी त्या द्रौपदीचा तत्त्वविचार समजून घेणे आवश्यक आहे, असं मला वाटतं. आपण आज एका बाजूला स्त्री-पुरुष समानता आदी मूल्यांवर बोलत असतो, मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या सनातन संस्कृतीच्या मूल्यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसून येत आहे. ही मूल्यं नेमकी कोणती होती, ती समाजामध्ये कशी रुजली, हा विचार मला मांडायचा असल्यानेच मी कादंबरीलेखन केले.
द्रौपदी ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून लेखन करण्यामागचे नेमके कारण काय?
स्त्रीशक्तीचं रुप कसं असतं, हे सांगण्यासाठी मी या कादंबरीचे लेखन केले आहे. स्वामी विवेकानंदांनी जसं म्हटलं होतं की, आपण पाश्चिमात्य संस्कृती नक्कीच स्वीकारावी, मात्र आपला आत्मा भारतीयच असायला हवा. हिंदुस्थानचा आत्मा हा हिंदूच आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीमधील स्त्रीत्व नेमकं कसं आहे, हे सांगण्यासाठीच मी द्रौपदी ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून लेखन केले.
आजच्या काळात महाकादंबऱ्या वाचल्या जातात का? लोक छापील साहित्याचे स्वागत कशा प्रकारे करतात?
माझ्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीची नववी आवृत्ती बाजारत सध्या उपलब्ध आहे, तर ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली आहे. त्यामुळे साहित्याची विक्री, ग्रंथांचे वाचन होतं, असे आपण निश्चित म्हणू शकतो. परंतु, आताच्या घडीला त्या त्या प्रकारे वाचकांपर्यंत पोहोचणे जास्त गरजेचे आहे. आमच्या काळात करमणुकीची साधनं नव्हती, म्हणून आम्ही वाचनाला सुरुवात केली. बघता बघता अर्नाळकरांपासून ते दातार आणि फडके यांच्या कादंबऱ्या आम्ही वाचत गेलो आणि त्यातूनच साहित्यविश्व कळत गेलं. आताच्या घडीला वेगवेगळ्या माध्यमांतून वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. उदाहरणार्थ, मी अभिवाचनाच्या माध्यमातून माझ्या वाचकांशी जोडला जातो. असे वेगवेगळे प्रयोग करून वाचकांनी आणि लेखकांनी एकत्र आलं पाहिजे.
महाभारत आणि रामायण म्हटलं की, आपसूकच दाजी पणशीकरांची आठवण येते. तुम्हाला त्यांचा सहवास लाभला होता, त्यांच्या सोबतच्या विशेष आठवणी काय सांगाल?
दाजींची आठवण तर निश्चितपणे येते. मी, कुमार सोहोनी आणि आणखी काही सहकाऱ्यांनी मिळून, नुकतंच दाजींच्या निबंधांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम केला. दाजी जाण्याच्या एक महिना आधी मी त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना घट्ट मिठीसुद्धा मारली होती. आमचा स्नेह खूप जुना होता. ‘नाट्यसंपदा’च्या दिवसापासूनच आम्ही एकमेकांशी जोडले गेलो होतो. दाजींना त्यांच्या वडिलांकडून ज्ञानसंचिताचा समृद्ध वारसा लाभला. ‘नाट्यसंपदा’ या संस्थेची व्यावहारिक बाजू दाजींना सांभाळली. दाजींच्या लिखाणातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या भाषेची धार! याची आम्हाला वेळोवेळी प्रचिती येते.
महाभारत असो किंवा रामायण, इतक्या शतकांनंतरदेखील भारतीय जनमानसांतून या महाकाव्यांचं गारुड कमी झालेलं नाही, एक लेखक म्हणून साहित्यविश्वातील या प्रभावाकडे तुम्ही कसे बघता?
महाभारत आणि रामायण हे केवळ महाकाव्यं आणि गोष्टी नाहीत, हे आपलं जगणं आहे. आणि केवळ आपलंच जगणं नसून, संपूर्ण विश्वाचं जगणं यामध्ये समावलेलं आहे. असं म्हणतात की जे व्यासांच्या लिखाणामध्ये नाही, ते जगामध्ये कुठेच नाही. इतका समग्र विचार व्यासांनी, वाल्मिकींनी त्या काळी केला होता. आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर आपल्याला या गोष्टी लक्षात येतील. भारतीय उपखंडाला पूव आर्यवर्त म्हटलं जात असे. आपल्या संस्कृतीचा, प्रसार विश्वामध्ये झाला होता. हा विचार आज समजून घेणे गरजेचे आहे.
मराठी भाषेला अभिजेत भाषेचा दर्जा मिळाला, वर्षपूतचा कार्यक्रम ठिकठिकाणी साजरा झाला, समाज म्हणून आता पुढची दिशा काय असायला हवी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही निश्चितपणे गौरवास्पद गोष्ट आहे. मात्र, आता यापुढे अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. मराठीमध्ये ज्या सकस साहित्याची निर्मिती होते, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर मराठीमध्ये आपण सुयोग्य पद्धतीने संवाद साधतो का? याचादेखील विचार करणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आज ज्या प्रकारची मराठी लिहिताना, बोलताना वापरली जाते, तिथे सुधारणेला वाव आहे असं मला वाटतं. शिक्षणाच्या पातळीवर मुलांमध्ये मराठीचे संस्कार योग्यरित्या बिंबवले जात आहेत की नाही, हासुद्धा विचार व्हायला हवा. एक चांगला शिक्षक संपूर्ण पिढी घडवत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याकडे आपण भर द्यायला हवा.
‘द्रौपदी’ या महाकादंबरीनंतर वाचकांच्या हाती कुठली साहित्यकृती देणार आहात?
मागच्या 15 वर्षांपासून मी भगवान परशुराम यांच्या जीवनाचा शोध घेत होतो. मागच्या काही दिवसांमध्ये मला त्यांच्या कार्याचा बोध झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, मी वाचकांसमोर भगवान परशुराम मांडणार आहे.