मुंबई : राज्यात अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले असून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, “अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. तसेच आपत्तीग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी तसेच पुरामुळे बाधित २५१ पूर्णतः आणि ३१ अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर तर सप्टेंबरमध्ये जवळ जवळ ३९ लाख हेक्टर अशा सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले,” असेही त्यांनी सांगितले.
मदतीचे स्वरूप काय?
आर्थिक मदतीमध्ये आपतीग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये, ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये, ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार, जखमी व्यक्ती रूग्णालयात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दाखल झाला असल्यास १६ हजार, एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास ५ हजार ४०० रुपये.
पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी सपाट भागातील प्रती घर १ लाख २० हजार रुपये, तर डोंगराळ भागातील घरांसाठी १ लाख ३० हजार, अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी (किमान १५ टक्के) पक्क्या घरांसाठी प्रती घर ६ हजार ५०० रुपये, कच्च्या घरांसाठी प्रती घर ४ हजार रुपये, प्रती झोपडी ८ हजार रुपये, प्रती गोठा ३ हजार रुपये. दुधाळ जनावरांसाठी प्रती जनावर ३७ हजार ५०० रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी प्रती जनावर ३२ हजार रूपये, लहान जनावरासाठी प्रती जनावर २० हजार रूपये, शेळी मेंढी प्रती जनावर ४ हजार रुपये आणि प्रती कोंबडी १०० रुपये.
प्रति हेक्टर ८ हजार ५०० रुपये (तीन हेक्टर मर्यादेत), आश्वासित सिंचनाखालील (बागायत) पिकासाठी प्रती हेक्टर १७ हजार, आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रती हेक्टर २२ हजार ५०० रुपये. शेतजमीन नुकसानीसाठी, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे प्रती हेक्टर १८ हजार रुपये आणि दरड कोसळणे/ जमीन जमीन खरडणे, खचणे आणि नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ४७ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय - मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती, जाळी यासाठी बोटींची अंशतः दुरुस्ती ६ हजार रुपये, पूर्णतः नष्ट झालेल्या बोटींसाठी १५ हजार, अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी ३ हजार रुपये आणि पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी ४ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
इतर सवलतींमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी सवलती लागू केल्या असून यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी तसेच १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी या सवलतींचा समावेश करण्यात आला आहे. या सवलतीबाबत योजनेचे स्वरूप आणि त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना किंवा आदेश संबधित प्रशासकीय विभागामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत.