मुंबई : मतांचे राजकारण करायचेच असेल तर तेथील ‘बिबीका मकबरा’ला सलाम करून मोर्चा काढण्याची हिंमत दाखवा आणि मागे वळून पाहा. आपल्या पाठीशी कुणीच नाही हे लक्षात येईल, आणि शिवाजी पार्कवरील फसलेल्या ‘हसरा मेळाव्या’सारखे तोंडघशी पडाल, असे आव्हान भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
शनिवारी उबाठा गटाच्या वतीने मराठवाड्यात काढण्यात आलेल्या हंबरडा मोर्चावर त्यांनी टीका केली. केशव उपाध्ये म्हणाले की, "उद्धवराव, राजकारण करण्यासाठी कृपया छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचे पाप करू नका. मतांचे राजकारण करायचेच असेल तर तेथील ‘बिबीका मकबरा’ला सलाम करून मोर्चा काढण्याची हिंमत दाखवा, आणि मागे वळून पाहा. आपल्या पाठीशी कुणीच नाही हे लक्षात येईल, आणि शिवाजी पार्कवरील फसलेल्या ‘हसरा मेळाव्या’सारखे तोंडघशी पडाल."
शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार
"सत्तेवर असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले आणि आता सत्ता गेली, पक्ष संपला तरी तेच राजकारण करून शेतकऱ्यांना वेठीला धरण्याचा हा प्रकार आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला समाजकारणाचे भान होते. जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी कधी राजकारण केले नाही, म्हणून त्यांचा आवाज ‘डरकाळी’सारखा घुमला. उबाठा गटाच्या बेटकुळीत ती ताकद नाही, म्हणून आता डरकाळी नव्हे, तर हंबरडा मोर्चे काढून राजकारण करावे लागते. शेतकऱ्यांचा मोर्चा असेल तर शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करून, तयारीनिशी जा. नाहीतर, मला शेतीतले काही कळत नाही, उसाचे राजकारण मला माहीत नाही, साखरेचा संबंध चहापुरताच, भुईमूगाच्या झाडाला शेंगा लागतात’ असे तारे तोडायला जाल आणि हसे करून घ्याल.” असा टोलाही केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच उरला मुद्दा शेतकऱ्यांच्या मदतीचा तर देवाभाऊंनी तो केव्हाच सोडवला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा हात पोहोचला आहे, हेही लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.