जगामध्ये आज महिला सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, यशस्वितेची उत्तुंग भरारी घेत आहेत. असे असताना, ‘जैश-ए-मोहम्मद’ने ‘जमात-उल-मुमिनात’ या नावाने महिला दहशतवादी संघटनेची स्थापना केली आहे. सर्वच क्षेत्रांत महिलांचा सहभाग असावा हे सत्य असले, तरीही जिहादी धर्मांधतेसाठीचा हा ‘असला’ महिला सहभाग जगाला परवडणारा नाहीच...
जगाला वेठीस धरण्याच्या घटनाक्रमांमध्ये एक खळबळजनक वळण आले आहे. ते वळण म्हणजे, धर्मांध मुस्लीम महिलांचा दहशतवादी कारवायांमधला सहभाग. 1999 साली स्थापन झालेली ‘जैश-ए-मोहम्मद’ ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना, सध्या याच कारणासाठी चर्चेत आली आहे. भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणे आणि भारताविरुद्ध ‘जिहाद’ पसरवणे, हेच या संघटनेचे मुख्य कार्य. परंतु, या संघटनेत महिलांचा थेट सहभाग जवळजवळ नव्हताच. महिलांना फक्त घरगुती, धार्मिक प्रचार किंवा साहाय्यक भूमिकांपुरते मर्यादित ठेवले जात असे. स्त्रियांकडे ‘संघर्षाच्या मागे राहणारे साहाय्यक आधार’ म्हणूनच पाहिले जाई. मात्र, अलीकडे ‘जैश-ए-मोहम्मद’ने पहिल्यांदाच ‘जमात-उल-मुमिनात’ म्हणजेच, निष्ठावान महिलांचा समुदाय असलेली संघटना तयार केली आहे. या संघटनेतल्या महिलांचे कार्य काय तर शिक्षित मुस्लीम युवती, मदरशांमधील विद्यार्थिनी, धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील महिलांना लक्ष्य करून, त्यांची इस्लाममधील कट्टरतेच्या पालनाविषयी मनधरणी करणे.
धार्मिक भाषणे, कुराणातील संदर्भ देऊन आणि धर्मरक्षणाच्या नावाखाली महिलांना भावनिकरित्या गुंतवण्याचा प्रयत्न केला की, त्या महिला जिहादी सापळ्यात अलगद अडकतात. ‘इस्लाह-ए-उम्मा’ किंवा ‘गरीब मदरशांसाठी देणगी’ यांच्या नावाने पैसा गोळा करण्यासाठी, या महिलांचा सर्रास वापर केला जातो. याच पैशाचा वापर पुढे दहशतवादी कारवायांसाठी केला जातो. महिला तुलनेने कमी संशयास्पद वाटत असल्याने त्या गुप्त संदेश, दस्तऐवज आणि पैसा सहजपणे पोहोचवू शकतात. समाजमाध्यमावरून जिहादी विचार पसरवण्यासाठीही त्यांचा वापर सहजरित्या केला जाऊ शकतो.
आजवर असे अनेक अहवाल प्रकाशित झाले आहेत, ज्यात महिला दहशतवाद्यांच्या भूमिकेचे, त्यांच्या वापराचे आणि महिला-भरती, प्रचार, मानसिक युद्ध इत्यादींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. ‘Women Involvement in Terrorism : - Critical Look at their Roles in Some Selected Terrorist Organizations’ हा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला लेख; यात ‘हमास’, ‘अल-कायदा’, ‘आयएसआयएस’, ‘बोको हराम’ यांसारख्या दहशतवादी संघटनांमधील महिलांच्या भूमिकेबाबत भाष्य केले आहे. ‘Women and Extremism’ नामक युके सरकारच्या एकका केस स्टडी मध्ये, काही देशांमधील महिला-गट व जिहादी संघटनांशी त्यांचा संबंध आणि प्रतिबंधात्मक धोरणांची गरज यांचा तपशील आहे. ‘Evolving Role of Women in Terror Groups' Progression or Regression? - एस. वी. राघवन आणि वी. बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या हा लेखामध्ये, 1970 नंतर महिलांचा दहशतवादी गटांमध्ये वाढता सहभाग, विशेषतः आत्मघाती हल्ले व पुढे येण्याची भूमिका यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जिहादी संघटनांमध्ये महिलांचा वापर वाढण्यामागची कारणे आणि तो वाढण्याचे मार्ग याचा धोरणात्मक अभ्यास, तसेच लिंग आधारित धार्मिक भाषेचा वापर करून महिलांना जिहादच्या विचारपद्धतीत कसे सहभागी केले जाते, यावर खोलातून अभ्यास करणारे अहवाल, केस स्टडीज आज उपलब्ध आहेत. या गोष्टी नुसत्या चाळल्या तरी लक्षात येईल की, दहशतवादी गटांत महिलांचा वाढता सहभाग हा काही परवडणारा नाही.
‘जमात-उल-मुमिनात’ ही संघटना जरी काल-परवा उदयास आली असली, तरी जगात इतर काही संघटनांमध्ये यापूवपासूनच महिलांचा सक्रिय सहभाग आहे. आजवर त्यांनी भारताला कधी लक्ष्य केल्याची माहिती नाही परंतु, भारताबाहेरील इतर देशांत त्यांची सक्रियता हा चिंतेचाच विषय आहे. रशियाच्या ‘चेचन्या’ या मुस्लीमबहुल प्रदेशातील, ‘ब्लॅक विडोज’ नावाचा धर्मांध महिलांचा इस्लामी गट 2000च्या दशकाच्या सुरुवातीला उदयास आला. या गटातील महिलांचा पती किंवा भाऊ रशियन सैन्य कारवाईत मारला गेला होता. 2002चा ‘मॉस्को थिएटर हल्ला’ आणि 2004चे ‘बेझलान स्कूल सीज’ प्रकरण, या दोन्ही ठिकाणच्या हल्ल्यात ‘ब्लॅक विडोज’ गटाचाच हात होता.
लेबेनॉनची ‘दलाल मुग़रबी’ या पॅलेस्टिनी दहशतवादी महिलेचा 1978च्या इस्रायलमधील कोस्टल रोड हत्याकांडात हात होता. या हल्ल्यात 13 मुलांसह 38 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. पॅलेस्टिनी लोकांमध्ये तिला ‘शहीद’ आणि ‘राष्ट्रीय नायिका’ म्हणून गौरवण्यात येत असले, तरी इस्रायल आणि संयुक्त राष्ट्रांनी तिचे ‘दहशतवादी’ म्हणून वर्णन केले आहे. श्रीलंकातील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’, नायजेरियातील ‘बोको हराम’, जपानमधील ‘रेड आम’ अशा कित्येक गटांत, महिलांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केला गेला. ‘जमात उल मुमिनात’ आज जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये, ऑनलाईन नेटवर्कद्वारे सक्रिय असल्याचे लक्षात येते आहे.
याविषयी पुरोगामी शांत का? साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना दहशतवादी ठरवण्याचा उताविळेपणा करणारे काँग्रेस आणि पुरोगामी राजकारणी, आता या षड्यंत्राविषयी बोलणार का? ओवेसीसारखे मुस्लीम नेते महिलांना यापासून परावृत्त करण्यासाठी भूमिका घेतील का? मुस्लीम महिलांंच्या मानवाधिकारासाठी एरव्ही गळे काढणारे, आता या नव्या जिहादी धोक्यापासून मुस्लीम महिलांचे कसे संरक्षण करणार? हा सवालच आहे. इटलीमध्ये नुकतीच बुरख्यावर बंदी आणली. ही वेळ का आली? कारण, बुरख्याच्या आडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिन्हे दिसू लागली होती. आता तर या महिलांची माथी भडकावून, त्यांना दहशतवादी घडवण्याचेच कारस्थान रचले जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदांमध्ये भारतीय सैन्याकडून कमान सांभाळली. भारताचा, मोदी सरकारचा मुस्लीम महिलांकडे बघायचा दृष्टिकोन हा उदारमतवादी आहे. पण धर्मांधांना मात्र मुस्लीम महिलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करायचा आहे. हाच काय तो फरक!