राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई; कर चुकवून विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्य साठा जप्त

11 Oct 2025 17:51:06

कल्याण: महाराष्ट्रात दारूच्या किंमतीमध्ये भाव वाढ झाल्यानंतर आता दारू तस्करांनी दादरा नगर हवेली, दीव -दमण सह इतर परराज्यातून महाराष्ट्रात कर चुकवून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची तस्करी सुरू केली आहे. याची एक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली. या पथकाने शहापूर येथील विहिगाव खोडाळा रोड परिसरात सापळा रचत २०० बॉक्स विदेशी मद्याचा साठा आणि एक पिकअप टेम्पो असा एकूण २३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मद्यसाठा दादरा नगर हवेली दिव दमण येथून महाराष्ट्रात कर चुकून आणण्यात आला असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब यांनी दिली आहे.

कल्याण भरारी पथकाचे निरीक्षक परब यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने शहापूर तालुक्यातील विहिगाव खोडाळा रोड येथे सापळा रचला .याच दरम्यान या रस्त्यावरून एक महेंद्र बुलेरो पिकप टेम्पो येताना दिसला. भरारी पथकाला संशय आल्याने त्यांनी हा टेम्पो थांबवून झडती घेतली असता त्यांना या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळला. अधिक चौकशी केली असता हा साठा दादरा नगर हवेली, दीव दमण येथून महाराष्ट्रात कर चुकवून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले. भरारी पथकाने पकडताच टेम्पोचा चालकाने त्याठिकाणी पळ काढला. राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परब हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Powered By Sangraha 9.0