'हॉट हार्ट’हा फिनलंडच्या समुद्र किनाऱ्यालगत उभा राहिलेला एक अद्भुत, भविष्यकालीन प्रकल्प आज जागतिक स्तरावर चर्चेत आहे. हा केवळ एक तांत्रिक प्रकल्प नसून मानवी कल्पकतेचा, हरित ऊर्जा तत्त्वज्ञानाचा आणि शाश्वत शहरी विकासाचा संगम आहे. या प्रकल्पामागे ऊर्जा क्षेत्रातील फिनलंडमधील तीन अग्रगण्य कंपन्या स्चनेइडेर इलेक्ट्रिक, रॅम्बोल, डॅन्फोस लिनहिट यांनी मिळून एक असे प्रारूप साकारले आहे, जे भविष्यातील शहरांसमोर ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबनासाठीचा आदर्श ठरेल.
या प्रकल्पाची संकल्प्ना इटलीमधील सुप्रसिद्ध डिझाईन ‘फर्म कार्लो रट्टी असोसिएशन’ यांनी साकार केली आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या दहा गोलाकार जलाशये अर्थात सिलिंड्रिकल बेसिन्स स्वरूपात तयार केलेली ही रचना, एका छोट्या द्वीपसमूहासारखी दिसते. या दहा सिलिंड्रिकल बेसिन्सचा व्यास प्रत्येकी 225 मीटर असून, एकत्रितपणे दहा दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची त्यांची क्षमता आहे. या रचनेचा आकार, त्यातील प्रकाशयोजना आणि तंत्रज्ञान पाहता, ते जणू एखाद्या विज्ञानावर आधारित काल्पनिक चित्रपटातील दृश्यासम वाटते. परंतु प्रत्यक्षात या कल्पनेने फिनलंडसारख्या थंड देशासाठी ऊर्जेच्या व्यवस्थापनात मोठा बदल घडवून आणण्याचे काम केले आहे.
‘हॉट हार्ट’ प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, हा प्रकल्प थर्मल एनज स्टोरेज सिस्टम म्हणून कार्य करेल. म्हणजेच, समुद्राच्या पाण्यात साठवलेली उष्णता ऊर्जा, गरजेनुसार शहराच्या उष्णता पुरवठा यंत्रणेत वापरली जाणार आहे. या प्रणालीचे नियंत्रण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधाराने होणार आहे. ‘एआय’ आधारित सॉफ्टवेअर ऊर्जा उत्पादन आणि वापर यांच्यातील समतोल राखते. यामुळे अपव्यय कमी होतो आणि कार्यक्षमतेतही वाढ होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून फिनलंडची राजधानी हेलसिंकी शहर, आपली हीटिंग सिस्टम 2030 पर्यंत पूर्णपणे कार्बन-न्युट्रल करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे. ‘हॉट हार्ट’ ही त्याच दिशेने घेतलेली एक मोठी झेप मानली जात आहे.
या तरंगत्या रचनेचे दुसरे महत्त्वाचे त्याचे बाह्यरंग म्हणजे, तिचा दुहेरी उपयोग. एका बाजूने ती शहरासाठी ऊर्जा साठवणूक केंद्र म्हणून काम करते, तर दुसऱ्या बाजूला ती नागरिकांसाठीचे मनोरंजन आणि विश्रांतीचे केंद्र आहे. या बेसिन्सभोवती नजीकच्या भविष््यात सार्वजनिक जागा, बगीचे, जलतरण क्षेत्रे आणि सामुदायिक उपक्रमांसाठीच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही रचना फक्त तांत्रिकच नाही, तर मानवी संवाद आणि शहरी जीवनशैलीचाही एक अविभाज्य भाग असेल. ‘हॉट हार्ट’ या संकल्पनेने हेलसिंकी एनज चॅलेंज या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट हेलसिंकीच्या पारंपरिक उष्णता पुरवठा प्रणालीला कार्बनमुक्त बनवण्यासाठी, नावीन्यपूर्ण उपाय शोधणे हेच होते. जगभरातील 250 हून अधिक प्रस्तावांमधून ‘हॉट हार्ट’ची निवड झाली. ही निवडच या प्रकल्पाच्या गुणवत्तेचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
हवामानबदल, ऊर्जेची वाढती मागणी आणि कार्बन उत्सर्जन या जागतिक समस्यांवर उत्तर देणारे हे प्रारुप, अनेक देशांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. समुद्रकिनारी वसलेल्या महानगरांसाठी अशा तरंगत्या ऊर्जाद्वीपांची संकल्पना, शाश्वत भविष्याचा मार्ग दाखवणारी ठरते. ‘हॉट हार्ट’ म्हणजे फक्त उष्णता साठवणारे केंद्रच नसून, तर मानव, निसर्ग आणि तंत्रज्ञान यांच्यातील समतोलाचेही प्रतीक आहे. हा एक असा विचार आहे, जो भविष्यातील शहरे अधिक हरित, अधिक संतुलित आणि अधिक जिवंत बनवू शकतो.
मात्र, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रगती याबाबतचा कोणताही अधिकृत अहवाल समाजमाध्यमात उपलब्ध नाही. सल्लागार कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ‘हॉट हार्ट’ प्रकल्पाने 2021 मध्ये मास्टर प्लॅनिंग टप्प्यात प्रवेश केला असून, 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. आज जगातील बहुतेक शहरे हवामानबदल, ऊर्जावापर आणि शहरी विस्तार यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरी जात आहेत. अशा परिस्थितीत ‘हॉट हार्ट’सारखे प्रकल्प त्यावरचाअ उपाय दाखवणारे सिद्ध होतात. शाश्वतता म्हणजे केवळ बचत किंवा मर्यादा नव्हे, तर नवीन शक्यता आणि जीवनगुणवत्तेतील वाढ आहे. तंत्रज्ञान, पर्यावरण आणि समाज या तिन्ही क्षेत्रांना एकत्र आणून, ‘हॉट हार्ट’ हे भविष्याच्या शहरांचे नवे तंत्रज्ञानप्रेरित प्रारुप ठरू शकते.