गीता शहा यांना 16वा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर झाला. आज दि. 11 ऑक्टोबर रोजी सायं 4 ते 6 या वेळेत ठाणे पश्चिम येथील श्रीराम व्यायामशाळा सेवासंस्था येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समारंभाच्या मुख्य अतिथी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर या आहेत, तर कार्यक्रमाचे निमंत्रक ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष डॉ. सतिश मोढ आहेत. त्यानिमित्ताने गीता शहा यांच्या कार्यविचारांचा घेतलेला आढावा..
तो विद्यार्थी दहावीला संपूर्ण गावात पहिला आला, पण त्याला कळलेही नाही की, आई रुग्णालयात उपचार घेत होती. घरची कुटुंबाची सगळी जबाबदारी या मुलावरच होती. घरात वीजही नाही की, अभ्यासासाठी विशेष पुस्तकही नाहीत. तीन पेपर त्याने पेन नसलेल्या रिफिलने लिहिले. अशा परिस्थीतही तो मुलगा गावात पहिला आला. या मुलाबाबतची बातमी गीता शहा यांनी वाचली. ती बातमी वाचून त्यांना सखेद आश्चर्यही वाटले. मुंबईपासून काही अंतरावरच असलेल्या शहापूरमध्ये अशी अवस्था? त्या प्रशांतच्या घरी गेल्या. हुशार, मेहनती विद्यार्थ्याचे पुढे काय होणार होते? गीता यांना माहीत होते की,
विद्यां ददाति विनयं विनयात् याति पात्रताम्|
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मं ततः सुखम्॥ म्हणजेच, विद्येने विनय प्राप्त होतो, विनयाने योग्यता प्राप्त होते आणि योग्यतेने धन, तर धनाने धर्म आणि धर्माने सुख प्राप्त होते. त्यामुळे या हुशार मुलाला शिक्षणासाठी सर्व पातळीचे सहकार्य, मार्गदर्शन करायलाच हवे असे त्यांनी ठरवले. मनातला हा निश्वय त्यांनी पुढे पूर्णही केला. प्रशांतच्या घरात वीज नव्हती. काही वर्षांपूव वीजशुल्क न भरल्याने वीजजोडणी तोडण्यात आली होती. गीता यांनी प्रशांतच्या घरी वीज यावी, त्याला व्यवस्थित अभ्यास करता यावा, म्हणून जंगजंग पछाडले. प्रशांत विशे व त्याच्या कुटुंबाला सर्व प्रकारचे दाखले व कागदपत्रे मिळवून देणे, विड्याच्या पानांच्या व्यवसायासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज मिळवून देणे, कर्जाची हमी घेणे याद्वारे त्यांनी प्रशांतला खऱ्या अर्थाने उच्चशिक्षण देत समाजाच्या मूळ प्रवाहात आणले. गरजू विद्यार्थ्यांना किंवा मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना सहकार्य केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, हा विचार नेहमीच त्यांच्या मते गौण होता. त्यांच्या मनात एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे, शिक्षणाची गंगा गरजूंना उपलब्ध व्हावी! प्रशांत विशेसारखे कित्येक विद्याथ असतील की ज्यांना शिकायचे आहे, पण आर्थिक समस्यांमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. अनेकांना तर शिक्षणाच्या संधीबाबत माहितीही नसतेे. या सगळ्यांनाच शिक्षणाच्या प्रवाहात आणून, समाज आणि राष्ट्रहिताशी कसे जोडता येईल अशी तळमळ गीता यांना कायमच वाटे. तसे त्या ठाण्यातील ‘आनंदवन स्नेही मंडळा’सोबतही जोडल्या गेल्या होत्या. या संस्थेचे समन्वयक भाऊ नानिवडेकर यांचे सेवाकार्यही त्यांनी पाहिले होते. भाऊ यांनी गीता यांना मार्गदर्शन केले. त्यातूनच मग गीता यांनी गरजू, गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांचा शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने, काही सहकाऱ्यांच्या मदतीने दि. 15 ऑगस्ट 2008 रोजी ‘विद्यादान साहाय्यक मंडळ’ (ठाणे) या सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्या या संस्थेच्या संस्थापिका आणि विश्वस्त आहेत. ‘सक्षम विद्याथ, सक्षम राष्ट्र’ हे ब्रीदवाक्य, तर ‘स्वप्न आमुचे, कार्य आमुचे विद्यादान’ या संकल्पनेवर, ’विद्यादान साहाय्यक मंडळा’चे सेवाकार्य सुरू झाले.
या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेतल्यानंतर जाणवले की, आज या संस्थचे आजी-माजी विद्याथ आणि पालक कार्यकर्ते असे चार हजारांपेक्षा अधिक सदस्य आहेत. पाच-सहा कार्यकर्ते व अगदी तुटपुंजा निधी या संसाधनांवर सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ, आज सात कोटी रुपयांवर पोहोचला. संस्थेशी संबंधित 925 पेक्षा जास्त विद्याथ, विविध शाखांमधून उच्चशिक्षण घेत आहेत. 600च्या वर उच्च विद्याविभूषित पालक कार्यकर्ते आहेत. समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, अकाऊंट्स, देणगी संकलन, बी फ्रँक, ॲडमिशन या व असे अनेक विभाग आहेत. तसेच 1100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात याच संस्थेमुळे स्थैर्य आले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांतील अनेकजण अभियंते, डॉक्टर्स, परिचारिका, सनदी लेखापाल, सामाजिक कार्यकर्ते अशा समाजातीअल विविध क्षेत्रांत आपले योगदान देत आहेत. या मुलांसाठी इंग्रजी भाषा संभाषण कला, संगणक प्रविणता, मुलाखत प्राविण्य, सरकारी पदपरीक्षा, आर्थिक जागृती, मार्गदर्शन असे अनेक उपक्रम या संस्थेमार्फत आयोजित केले जातात. सध्या संस्थेच्या ठाणे, शहापूर, बोरिवली, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर अशा सहा शाखा आहेत.
आपण पाहतो की, अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत की जिथे विद्यार्थ्यांना मदत केली जाते. विद्याथ उच्च विद्याभूषित होतात. चांगल्या नोकरीला लागतात किंवा व्यवसायात स्थिरावतात. पण, हे सगळे झाल्यावर त्यांच्ाी संस्थेशी नाळ तुटलेली असते. मात्र ’विद्यादान साहाय्यक मंडळ’ संस्थेचे वैशिष्ट्य हेच की, या संस्थेच्या सहकार्याने जे विद्याथ शिकले, ते संस्थेशी कायमचे जोडले गेले. त्यांनी भविष्यात सामाजिक बांधिलकीही जपली. आपलेही काही सामाजिक दायित्व आहे, हेच संस्कार त्यांच्यावर झाले. त्यामुळेच या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचाही संघ स्थापन झाला आहे. या संघाच्या सदस्यांनाही गीता यांचे कायम मार्गदर्शन असते. या सज्जनशक्तीच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत, सहकार्य करता येईल का? याचे नियोजनही त्या करतात. या संघाच्या माध्यमातून शाश्वत निधी संकलन, विद्यादानाचे भविष्यातील शिलेदार, त्यांच्यातील कार्यकर्ते पालक घडवणे अशा अनेक कल्पक मोहिमा त्या आखतात. विद्यादानाच्या वाढत्या कामाचा आवाका सांभाळण्यासाठी, त्या रोज 15 ते 18 तास काम करतात. संस्थेचा कारभार पारदर्शक, अचूक, झटपट, योग्य निर्णयक्षमतेने व्हावा म्हणून त्या झटतात. तसेच शिक्षण घेताना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध झाली नाही, अशा पाच सहा मुलांना गीता यांनी प्रसंगी स्वत:च्या घरातही निवारा उपलब्ध करूनही दिला. प्रशांत विशे हा सुद्धा गीता यांच्या घरी एक वर्ष शिक्षणासाठी राहिला होता. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आणि अर्थातच संस्थेलाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
गीता शहा यांच्या जिवनाचा मागोवा घेऊ. प्रविण शहा आणि सुरेखा शहा हे मूळचे गुजरातचे कुटुंब, पण कामानिमित्त कुर्ला, येथे स्थायिक झाले. उभयंतांना तीन अपत्ये त्यांपैकीच एक गीता. घरचे वातावरण अत्यंत सामाजिक बांधिलकी असलेले. इतके की घरकामाला येणाऱ्या सविता आणि मालती या दोघींना ‘गृहसखी’ म्हटले जायचे. सुरेखाबाईंनी स्वयंपाक केला की, पहिले या दोघींना त्या पान वाढत. दोघींना म्हणत, “या गं, गरम गरम खाऊन घ्या. नंतर काम तर करायचेच आहे.” साधारणत: पहिला आंबा देवाला अर्पण करून, मगच घरातील सदस्य खातात. मात्र, शहा कुटुंबात पहिला आंबा सविता, मालती यांना देऊन, मग देवाला अर्पण केला जाई आणि मग घरचे सदस्य आंबा खात. आईचा स्वभाव असा, तर बाबाही सामाजिक बांधिलकीचे पुरस्कर्ते. कामाहून सुटले की ते वॉचमन कॉलनीत जात. तिथे आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या बांधवांना बँकेचे खाते खोलून दे, त्यांना पत्र लिहून दे, त्यांना इतर बाबतीत मदत कर अशी कामे ते करीत असत. पण ही सगळी कामे करताना त्यांचा भाव असे की, घरच्या लहान भावाचे काम करत आहे. या सगळ्या सेवाभावी श्रीमंत संस्कारांत गीता यांचे बालपण गेले. पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर, त्यांचा विवाह सत्यजित शहा यांच्याशी झाला. सासरही असेच सुसंस्कृत. विवाहानंतर सासरच्यांनी गीता यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी सहकार्य केले. गीता यांनी ’वेलिंगकर इन्स्टिट्यूट’मधून व्यवस्थापकीय शिक्षण घेतले. पुढे त्या नामवंत बहुराष्ट्रीय औषध कंपनीत जबाबदारीच्या पदावर रूजू झाल्या. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्याही स्थिरता आली होती. पण मनात समाजकार्याची ओढ होती. वर्तमानपत्रात समाजाच्या विविध समस्यांवरच्या बातम्या, लेख वाचताना, त्या अस्वस्थ होत. त्यातच 2005 साली त्यांनी प्रशांत विशेविषयी बातमी वाचली आणि पुढे त्या त्याच्या घरी गेल्या. मग आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्या अनुषंगाने येणारे सामाजिक प्रश्न पाहून त्याना प्रश्न पडे, हे सगळे होत असताना आपण काय करतो? आपले आजी-आजोबा, आई-बाबा यांनी त्यांच्यापरीने समाजासाठी कार्य केले. ते सामाजिक कार्य आपली जबाबदारी आहे, असे समजून त्यांनी काम केले. आपण काय करत आहेात?
बुडतां हे जन न देखवे डोळां|
येतो कळवळा म्हणउनि॥संतानी म्हटले आहे, अगदी तशीच अवस्था गीता यांची झाली. त्यातूनच पुढे मग ‘विद्यादान संस्थे’ची स्थापना आणि कार्य सुरू झाले. पण हे सगळे करत असताना, त्यांनी त्यांची कौटुंबिक जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडली. त्यांनी डेव्हलपमेंट मॅनेजमेंटमध्ये ‘एमबीए’ शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मानसशास्त्रातही ‘एमए’ केले. हे सगळे का, तर शिक्षणाचा उपयोग संस्थेशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करता यावे म्हणून. संस्थेला दहा वर्षे पूर्ण झाल्यावर ’टूल बॉक्स’ व यावष ’आयआयटी मुंबई’ या सामाजिक ऑडिट करणाऱ्या संस्थेकडून, त्यांनी विद्यादानचे प्रभावी मूल्यांकन करून घेतले. त्यातील शिफारसीनुसार कार्यकर्त्यांच्या मदतीने, पुढील योजनांचा आराखडा बनवला आणि आजही त्यावर काम सुरु आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, ’आयुष्यात एक लक्ष्य ठेवा आणि त्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी सातत्याने काम करा. उठा, जागृत व्हा आणि ध्येयप्राप्त होण्यासाठी कार्य करा.’ या सुत्रानुसारच की काय, गीता यांचे कार्य सुरू आहे. त्यांचे आणि त्यांच्या ‘विद्यादान साहाय्यक मंडळा’चे काम म्हणजे, ‘सक्षम विद्याथ सक्षम राष्ट्रा’साठीचे अमूल्य कार्य आहे. दै ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांना शुभेच्छा आणि केशवसृष्टी पुरस्कार प्राप्त झाला म्हणून त्यांचे अभिनंदनही.
केशवसृष्टी पुरस्कार जाहीर होणे, ही अत्यंत अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझा नाही, तर संस्थेच्या कार्याचा आहे. या पुरस्कारामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिकच वाढली आहे. ‘सक्षम विद्याथ, सक्षम राष्ट्र’ यासाठी सुरु असलेले कार्य यापुढेही सुरुच राहणार आहे. संस्थेचे कार्य महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांत पोहोचले. आता या 36 जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात पोहोचावे आणि महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील प्रत्येक होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचावी, त्यांनी उच्चशिक्षित व्हावे, त्यायोगे त्यांचे कुटुंब समाज आणि देश सक्षम व्हावा, हीच इच्छा.
गीता शहा, संस्थापक, विद्यादान साहाय्यक मंडळ