मुंबई : (Chhath Puja festival) मुंबई परिसरात छट पूजा उत्सवादरम्यान, शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी दि. २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छट पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त प्रशांत सकपाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतकुमार दहिया, उत्तर भारतीय जनता परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांच्यासह छट पूजा उत्सव समित्यांचे ५५ प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील सण आणि उत्सव जल्लोषात साजरे व्हावेत, भाविकांना आवश्यक त्या सुविधा प्रशासनाने पुरवाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी आग्रही असतात. याच अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. छट पूजा उत्सवाच्या काळात भाविकांच्या सुविधेसाठी शहरातील वाहतूक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार, छट पूजा उत्सवाच्या काळात मेट्रो, बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यासंदर्भात पालिकेकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी स्पष्ट केले.
एक खिडकी योजना सुरु करून परवानगी द्यावी - आमदार अमित साटम
त्याचबरोबर आणखी काही छट पूजा मंडळांना पूजा स्थळांची परवानगी हवी असल्यास तत्काळ एक खिडकी योजना सुरु करून मंडळांना परवानगी द्यावी आणि ही परवानगी गणेशोत्सवाप्रमाणेच पुढील पाच वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात यावी, अशा सूचना आमदार अमित साटम यांनी दिल्या.
सर्व पूजा स्थळांवर चोख पोलीस बंदोबस्त असणार
यावेळी मुंबईतील पूजा स्थळे निश्चित करून त्याठिकाणी पिण्याचे पाणी, प्रकाश झोत, पूजेसाठी टेबल, वाहतूक नियंत्रण, शौचालये आणि महिला भाविकांना पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त प्रशांत सकपाळे यांनी दिली. शहर आणि उपनगरातील एकूण ४० पूजा स्थळे निश्चित करण्यात आली असून हा आकडा ६० पूजा स्थळापर्यंत वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार सर्व पूजा स्थळांवर चोख पोलीस बंदोबस्त यासह सुरक्षेकरिता सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतकुमार दहिया यांनी स्पष्ट केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....