वकिली क्षेत्रात राहून अध्यात्माची बैठक आणि त्याचा उपयोग समाजाला जोडण्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार्या अॅड. श्रीकांत पाटील यांच्याविषयी...
पुण्यातील वकिली क्षेत्रात अॅड. श्रीकांत पाटील हे ‘आध्यात्मिक वकील’ म्हणून प्रसिद्ध. ‘अवघे धरू सुपंथ’नुसार कार्य करणारा हा माणूस आपल्या बुद्धिमत्तेचा समाजासाठी कसा उपयोग होईल, यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. ज्यांना कायद्यातले काहीएक कळत नाही किंवा जे अक्षरशः ‘ढ’ आहेत, ते चक्क न्यायव्यवस्थेवर बेभान आणि बेतालपणे भाष्य करताना आपण पाहतो. अशा वातावरणात श्रीकांत यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व गोंधळलेल्या समाजाला सन्मार्गी लावण्यासाठी पुढे येत आहेत, ही नक्कीच आश्वासक अशी बाब आहे.
त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर समाजासाठी, देशासाठी आणि मानवतेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प अढळ निष्ठेने आजवर जपला आहे.
श्रीकांत पाटील यांचा जन्म दि. १४ एप्रिल १९५५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील रामपूर या छोट्याशा खेडेगावात एका गरीब पण कष्टकरी, शेतकरी कुटुंबात झाला. हा दिवस हनुमान जयंतीचा आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृती हनुमंताच्या सेवाभावी व निष्ठावंत स्वभावाशी सुसंगत आहे. प्राथमिक शिक्षण त्यांनी रामपूर येथे पूर्ण केले.
बालपणापासूनच अभ्यासातील तेज आणि सामाजिक जाणिवांची पखरण त्यांच्यात दिसून येत होती. पुढील शिक्षण सोलापूर येथे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुण्यातील ‘बीएमसीसी’ महाविद्यालयामधून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर अजून आपण शिकायला पाहिजे, यासाठी पुण्याच्या ‘आयएलएस लॉ कॉलेज’मधून कायद्याची पदवी घेत, त्यांनी वकिलीची कारकीर्द सुरू केली. खरे तर याच क्षेत्रात पाटील यांना शिक्षणानंतर रमायचे होते. मात्र, पाटील यांनी विमा सल्लागार म्हणून राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली.
पुणे विभागाचे सचिव म्हणून पाच वर्षांची सेवा ही त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारी आहे. अनेक बँकांच्या सल्लागार मंडळात त्यांचा सक्रिय सहभाग असून, त्यांनी आर्थिक साक्षरता आणि विमा क्षेत्रातील जनजागृतीसाठी अनेक व्याख्याने दिली. तथापि, शिक्षणातील ज्ञानदेखील उपयोगात यावे म्हणून, कायदा क्षेत्रातदेखील रमले. शिवाय, ते केवळ कायदेतज्ज्ञ आणि सल्लागार नव्हे, तर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले व्याख्याते म्हणून लोकप्रिय ठरले.
पशुवैद्यकीय अधिकारी, पोलीस खाते व विविध शासकीय संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या शब्दांत स्पष्टता, अनुभवाचे अधिष्ठान आणि प्रेरणादायी ऊर्जेची साथ असते, असे त्यांची व्याख्याने ऐकलेल्या अनेक श्रोत्यांनी सांगितले. समाजमाध्यमांवरदेखील अनेकजण श्रीकांत पाटील यांच्या अभ्यासू व्याख्यानांवर व्यक्त झाले आहेत, हे येथे आवर्जून नमूद करावे लागेल.
आध्यात्मिक कार्य फक्त समजावून आणि व्याख्यान देऊन करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर वर्ष २००१ साली त्यांनी ‘श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली.
या संस्थेमार्फत गेल्या २५ वर्षांपासून विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, योग प्रशिक्षण, परिषद व परिसंवाद, सहली, पाठांतर स्पर्धा या उपक्रमांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे.
पुढची पिढी आध्यात्मिक साक्षर होणे खूप महत्त्वाचे. संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील नामांकित आणि उच्चपदस्थ व्यक्तींना बोलावून नवीन पिढीसमोर नागरिकांमध्ये आध्यात्मिक जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने लिखाण करतात. या लेखनातून त्यांनी सामाजिक समस्यांवर, आध्यात्मिक उन्नतीवर आणि राष्ट्रीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख सादर केले आहेत.
जगाच्या कानाकोपर्यात आपल्या संतांचे विचार पोहोचले पाहिजेत, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत अनेक देशांत त्यांनी तिथल्या महाराष्ट्र मंडळात आध्यात्मिक जागृतीचे कामही केले आहे. त्यांनी फ्रान्स स्वित्झर्लंड, नेदरलॅण्ड्स, अॅमस्टरडॅम या देशांतदेखील अध्यात्माचा प्रचार केला असून, आता त्यांनी आपला मोर्चा जर्मनीकडे वळवला आहे. तेथे त्यांनी भारतीय अध्यात्म आणि संस्कृती परंपरेवर आपल्या अनुभवातून याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ठरविले आहे.
पा
टील हे केवळ एक वकील किंवा सल्लागार नाहीत, तर ते समाजासाठी समर्पित झपाटलेले कार्यकर्ते आहेत. त्यांचा स्वभाव सौम्य, नम्र आणि लोकाभिमुख असून, प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना सन्मानाने मार्गदर्शन करणे, हीच त्यांची ओळख आहे. समाजोपयोगी विचारांची सखोल समज, आध्यात्मिक चिंतन आणि आधुनिकतेचा समतोल असा सज्जन, प्रगल्भ व सर्वस्पर्शी दृष्टिकोन त्यांनी अंगीकारलेला आहे. आध्यात्मिक कार्यात त्यांनी केलेल्या कार्याची दखलदेखील अनेक संस्थांनी घेतली असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
“भारतीय अध्यात्माची गोडी लागणे हे आजच्या काळात किती उपयुक्त आहे, जसे योग केल्याने आरोग्याची काळजी मिटण्याचे संकेत मिळतात. तसेच, अध्यात्मामुळे नैराश्यातून दूर जाण्याचा मार्ग सापडतो,” असे श्रीकांत पाटील यांना वाटते.
अशा बहुआयामी, सुसंस्कृत, दूरदर्शी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्वाचे दर्शन श्रीकांत पाटील यांच्या रूपाने आपल्याला घडते. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९३७१०२०६३२)