तथागत गौतम बुद्धांनी पावसाळ्यात तीन महिने उपासना केली. त्यानंतर ते स्वर्गात गेले. तिथे देवतांनी त्यांचे स्वागत केले. तिथे त्यांनी देवतांना उपदेश दिला. पुढे बुद्ध पृथ्वीवर परतले. तो दिवस म्यानमारचा बौद्ध समाज ‘थंडीगुट उत्सव’ म्हणून साजरा करतो. तर हा ‘थंडीगुट उत्सव’ साजरा करण्यासाठी म्यानमारच्या सागाइंग प्रदेशातील चांग उ गावी दि. ८ ऑक्टोबर रोजी बौद्ध समाज उत्साहाने एकत्रित झाला. मात्र, जुंटा सैन्याने पॅराग्लायडर्सद्वारे त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ४० लोकांचा मृत्यू झाला आणि ८० हून अधिकजण जखमी झाले.
म्यानमारमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेचे पडसाद उमटले. म्यानमार हा बौद्ध धर्माचा पाईक. मात्र, इथे बौद्ध धर्मीयांवरही सैन्य हल्ले करत आहेत. असे का? तर रखाईन प्रांत आणि बांगलादेशातील काही भूभाग एकत्रित करून बौद्धांचा वेगळा देश निर्माण व्हावा, ही मागणी घेऊन सशस्त्र कारवाया करणारी अराकान आर्मी २००९ साली स्थापन झाली. आपली मागणी पूर्ण करण्यासाठी अराकान आर्मी सातत्याने एकाचवेळी रोहिंग्यांवरही हल्ला करते आणि म्यानमारच्या जुंटा सैन्यावरही हल्ला करते.
म्यानमारचा बांगलादेशाला लागून असलेला सीमाभाग हा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त अराकान आर्मीच्याच ताब्यात. अराकान आर्मीने इथे स्वतःचे शासन-प्रशासन कायदे आणि सुरक्षा यंत्रणाच उभी केली. त्यामुळे म्यानमारचे जुंटा सैन्य हे अराकान आर्मी आणि या आर्मीच्या समर्थकांच्या विरोधात आहे. ‘थंडीगुट उत्सवा’त बौद्ध धर्मीय एकत्र येतील आणि वेगळ्या रखाईन देशाची मागणी करतील, जुंटा सैन्याविरोधात घोषणा करतील, या भीतीने म्यानमारच्या जुंटा सैन्याने ‘थंडीगुट उत्सवा’त सामील झालेल्या लोकांवर हल्ला केला.
या रखाईन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांची वस्तीही जास्त आहे. या रोहिंग्यांचे आणि रखाईन प्रांतातले स्थानिक बौद्ध धर्मीय यांच्याशी विळ्या-भोपळ्याचे नाते.त्यांचे आपसात सातत्याने संघर्ष होतात. म्यानमाराच्या रोहिंग्या मुसलमानाच्या काही हिंसात्मक कारवाया करणार्या संघटना आहेत. त्यातील प्रमुख संघटना ‘अराकान रोहिंग्या सालवेशन आर्मी.’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे, अता उल्लाह अबू आमर जुनुनी. तो मूळचा पाकिस्तानचा. त्याने शिक्षण पूर्ण केले सौदी अरेबियामध्ये. पुढे तो म्यानमारच्या रखाईन प्रांतामध्ये रोहिंग्यासाठी लढाई करण्यासाठी आला. त्याने ‘अराकन रोहिंग्या सालवेशन आर्मी’ची स्थापना केली.
या संघटनेच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सर्व प्रकारचे सहकार्य मिळते, असे म्हटले जाते. तसेच, या संघटनेच्या मुख्य दहशतवाद्यांचे पाकिस्तानमध्ये उद्योग, व्यवसायही आहेत, तर या संघटनेने २०१६ साली म्यानमारच्या जुंटा सैन्यावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून जुंटाने हल्ला केला. हा हल्ला इतका प्रखर होता की, ७५ हजारांपेक्षा जास्त रोहिंग्यांनी अराकान प्रांतातून पलायन केले. या संघटनेसोबतच ‘रोहिंग्या सॉलिडीटरी ऑर्गनायझेशन’, ‘रोहिंग्या नॅशनल आर्मी’, ‘अराकान रोहिंग्या नॅशनल ऑर्गनायझेशन’ वगैरे संघटनाही रखाईन प्रांतातील बौद्धांविरोधात आणि म्यानमारच्या सैन्याविरोधात कारवाया करत असतात.
गेल्या आठवड्यातच समाजमाध्यमांवर बातमी आली की, ‘अराकान रोहिंग्या सॉलवेशन आर्मी’ आणि ‘रोहिंग्या सॉलिडीटरी ऑर्गनायझेशन’चे शेकडो रोहिंग्या मुसलमान अराकान प्रांतात घुसले आणि त्यांनी तिथे अराकान आर्मीवर हल्ला केला. त्यांच्या सैनिकी चौक्यांवर कब्जा केला. मात्र, ही केवळ अफवाच निघाली. सत्य होते की, रोहिंग्या मुसलमान अराकान प्रांतामध्ये घुसले. त्यांनी बौद्ध वस्तीवर हल्ला करून एका बौद्ध भिक्खूंचीही हत्या केली होती. मात्र, बौद्धांचा सहभाग असलेल्या अराकान आर्मीने तो हल्ला यशस्वीरित्या परतवून लावला.
थोडक्यात, म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमेलगतच्या भागात रोहिंग्या मुसलमान आणि बौद्ध यांच्यात संघर्ष सुरूच आहे. त्यात आता जुंटा सैन्याने बौद्ध उत्सवामध्ये लोकांवर हल्ला केला. मात्र, ‘थंडीगुट उत्सव’मध्ये जुंटाने केलेल्या हल्ल्यामुळे इथल्या बौद्धांच्या अस्मिता आणखी तीव्र झाल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या रखाईन आणि बांगलादेशाचा भाग मिळून स्वतःचा देश निर्माण करण्याच्या कारवायासुद्धा तीव्र होतील, यात शंका नाही. बांगलादेशला कट्टर मुस्लीम देश बनवण्याचे प्रयत्न करणार्या मोहम्मद युनूस सरकारला बांगलादेश आणि म्यानमारमधून फुटून निर्माण होणारा नवा बौद्ध देश पाहण्याचे सौभाग्य लाभेल का?