उतावळा नवरा...

    10-Oct-2025   
Total Views |

राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. लवकरच निवडणुका जाहीरही होतील. पण, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे युतीचे भिजत घोंगडे मात्र अजूनही कायम आहे. एकीकडे उबाठा गट-मनसे युती होणार की नाही? झालीच तर मुंबईकर जनता महापालिका त्यांच्या ताब्यात देतील की, नाही? असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. पण, त्याआधीच दोन्ही पक्षांनी महापौर पदावर दावाही ठोकला आहे.

अलीकडेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो मनसेचाच होणार, असे विधान केले. त्यावर उत्तर देताना उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच महापौर होणार हे मुंबईकरांनी ठरवले आहे, असे ठणकावून सांगितले. ठाकरे बंधूंच्या युतीचे काय होते, याचा अद्याप कुणालाच थांगपत्ता नाही. तीन महिन्यांत दोन्ही बंधूंमध्ये जवळपास पाच भेटी झाल्या. मात्र, युतीबद्दल कुणी अवाक्षरही काढत नाही. दुसरीकडे, उद्धव आणि राज या दोन्ही बंधूंमध्ये सध्या जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असून, जोवर त्यात एकमत होत नाही, तोवर युतीची घोषणा करायची नाही, असे त्यांच्यात ठरल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

युतीचे काय होणार, याची निश्चिती नसताना दोन्ही पक्ष मात्र, महापौरपदावर दावा करायला विसरले नाहीत. त्यामुळे साहाजिकच युती झाल्यानंतर या दोन्ही पक्षांची अवस्था काय असेल, याविषयी वेगळे सांगायला नको. विधानसभा निवडणुकीदरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील हेवेदावे आणि वादविवाद अख्ख्या राज्याने पाहिले. त्यात आता उबाठा गट आणि मनसे यांच्यात युती झालीच, तर या आगळ्यावेगळ्या युतीत काय काय घडते? हे पाहणे निश्चितच औत्सुक्याचे असेल. पण, युती होते की नाही? झाली तरी जागावाटपाचे गणित काय असणार? कोण कुठे तडजोड करणार? हे सगळे ठरण्याआधीच दोन्ही पक्षांनी पाहिलेले महापौरपदाचे स्वप्न उल्लेखनीय म्हणावे लागेल. ठाकरे बंधूंचा हा अतिउत्साह पाहता ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.

आणखीन एक ठाकरे नको


"महाविकास आघाडी आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही,” हे विधान आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे. महाविकास आघाडी ही विशिष्ट राजकीय पार्श्वभूमीवर तयार झाली. ‘संविधान बचाओ’च्या भूमिकेतून मविआ तयार झाली. ही भूमिका आणि पाया अद्याप दुसर्‍या कोणत्याही पक्षात दिसून येत नाही, असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले. यावरून राज ठाकरे यांना सोबत घेण्यास काँग्रेसचा नकार असल्याचे स्पष्ट झाले.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विसर्जित होणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आला, तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचा पाय मविआतून निघत नसल्याने ते मनसेलाही आघाडीत सामावून घेणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे ’‘एकमेका साहाय्य करू...’ या भूमिकेतून आता मविआ निवडणुकांना सामोरे जाणार असेही बोलले गेले. मात्र, आता या चर्चांना खुद्द काँग्रेसनेच पूर्णविराम दिल्याचे दिसते. वास्तविक, गेली कित्येक वर्षे परस्परविरोधी भूमिका आणि विचारधारा असलेले काँग्रेस आणि मनसे हे दोन्ही पक्ष सोबत येतील, ही चर्चाच मुळी तथ्यहीन वाटते. खरेतर, महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर त्यांच्याकरिता यंदाची निवडणूक सोपी असेल, असे दिसते. याउलट महाविकास आघाडीची गाडी रुळावरून पुढे सरकण्याचे नावच घेत नाही.

भाजप आणि महायुतीने विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण केले. मुंबईकरांना मुंबईच्या कुठल्याही एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत केवळ एक तासात पोहोचता यावे, हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारने मुंबईचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले. त्यात मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ या आणि अशा कित्येक विकासकामांचा समावेश आहे. या विकासकामांच्या जोरावरच महायुतीतील तिन्ही घटक पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यातील जनता महायुतीला कौल देईल, यात शंका नाही.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....