दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे मंदिर स्वच्छता महाअभियान राबवण्यात येणार

01 Oct 2025 20:21:39

मुंबई : दिपावलीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतातर्फे भव्य मंदिर स्वच्छता महाअभियान राबवण्यात येणार आहे. ५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत “गाभाऱ्यात अंगण” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडेल. भाविकांना आपल्या सोयीच्या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन स्वयंसेवा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा किमान ११,००० मंदिरांमध्ये स्वच्छता उपक्रम पार पाडण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून “माझे मंदिर, माझी जबाबदारी” हा यामागचा प्रमुख संदेश आहे.

दिपावलीप्रमाणे मंदिरांचीही रोषणाई करून ती प्रकाशमान व आकर्षक करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. तसेच, मंदिरांमध्ये भगवा ध्वज बदलून नवीन व भव्य भगवा ध्वजाची स्थापना केली जाईल. विशेष म्हणजे ध्वजपूजनाचे आयोजन तरुण जोडप्यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यातून समरसतेचा व एकतेचा संदेश दिला जाणार आहे. मागील वर्षी ५६४० मंदिरांमध्ये एकाच दिवशी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला होता. अनेक मंदिरांमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता गटही सक्रिय झाले आहेत. महिलांचा व युवकांचा मोठा सहभाग या उपक्रमात असतो.

या अभियानाचे उद्दिष्ट मंदिर केवळ दर्शनाचे केंद्र न राहता ते स्वच्छता व सेवेचे केंद्र व्हावे, अशी भावना आहे. “स्वच्छ, सुंदर, पवित्र मंदिर, प्रसन्न ईश्वर” हा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोकण प्रांतमंत्री मोहन सालेकर, प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे, प्रांत संपर्क प्रमुख राजकुमार भारद्वाज, प्रांत सह संपर्क प्रमुख राजेश मुढोळकर व जगन्नाथ सुर्वे यांनी सर्व भाविक, भक्त, मंदिर विश्वस्त, पुजारी व सामाजिक कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.


Powered By Sangraha 9.0