करियर ते आयुष्यातल्या चढउतारांवर एकटीने मात करताना वीणा जामकर सांगते...

    01-Oct-2025
Total Views |

मुंबई : सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लहानशा गावातून येऊन आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यातील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे वीणा जामकर. वीणाने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर नुकताच आलेला 'कुर्ला टू वेंगुर्ला' हा सिनेमासुद्धा चांगलाच गाजत आहे. दरम्यान, अभिनेत्री वीणा जामकर हिने रंगभूमीवरुन अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. नाटक, एकांकिका, दीर्घांकिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. गाभ्रीचा पाऊस, जन्म, पलतडचो मुनिस (कोकणी), लालबाग परळ, वळू, विहीर या सिनेमातून वीणा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एक रिकामी बाजू, खेळ मांडियेला, चार दिवस प्रेमाचे, जंगल में मंगल या नाटकांमधून वीणाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

नुकतीच वीणाने 'मुंबई तरुण भारत'ला खास मुलाखत दिली ज्यात तिने तिच्या आयुष्यातील बरेच पैलू उलगडले आहेत. अभिनय़ कारकिर्दीची सुरुवात, स्ट्रगल ते आयुष्य एकटीने जगण्याची हिम्मत, अशा निरनिराळ्या मुद्द्यावर तिने भाष्य केलं.
करियरच्या सुरुवातीविषयी वीणा म्हणाली, “माझा जन्म पनवेलचा तर आम्ही स्थाईक झालो उरणला. माझं १०वी पर्यंतचं शिक्षणही उरणलाच झालं. आईवडील दोघंही कलारसिक होते. आई देखील शिक्षिका असून गाण्याचे कार्यक्रम तसेच नाटकातही काम करायची. त्यामुळे अगदी बालवयातच नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली तसेच विविध स्पर्धांमध्येही भाग घ्यायचे. पुढे शिक्षणासाठी मी सांगितलं, की मला मुंबईला जायचं आहे. आणि त्यासाठी मी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. तर पुढे एकांकिका स्पर्धा आणि नाटक पुन्हा सुरु झालं. आणि पुढे आविष्कार (आविष्कार नाट्यसंस्था) सारख्या मोठ्या संस्थेशी जोडले गेले.”

अशी वीणाच्या करियरला सुरुवात झाली. प्रायोगिक नाटकातून पहिला मोठा ब्रेक मिळाल्याचंही वीणा सांगते. बालपणापासूनच नाटकात काम करणाऱ्या वीणाची कॉलेजपर्यंत चांगलीच तालिम घडली होती. जी तिला यशस्वी अभिनेत्री बनण्यासाठी खूपच उपयुक्त ठरली. पण मुंबईत येऊन स्वतःचं घर घेऊन राहणं आणि करियर करणं तितकं सोप नव्हतं. तेही त्या काळी एकट्या मुलीसाठी हा मोठा स्ट्रगल होता.

याविषयी वीणा सांगते, “हे खूपच अनिश्चित क्षेत्र असल्याने तुमची चिकाटी खूप महत्त्वाची ठरते. कारण इथे काही लवकर पैसे मिळत नाही. हळू हळू मिळतात. आता काम मिळालं तर पुढे मिळेल की नाही ते माहित नाही. त्यामुळे जर कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायला आलं आहे आणि म्हटलं की लगेच कार येईन घर येईन, ग्लॅमर येईल तर असं नाही. त्यामुळे एक काम मिळवून दुसरं काम मिळणं आणि ते टिकवून ठेवणं ही फार मोठी प्रक्रिया असते.”

अनेक वर्षे या क्षेत्रात सातत्याने काम करुन वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांचा सामना करत स्वतःला टिकवून ठेवणं तसं कठीणच. वीणा याविषयी सांगते की, “लग्न झालंय का? किंवा तुमचा जोडीदार आहे का... ही आयुष्यभर चालणारी प्रक्रीया आहे. किंवा मग ओढून ताणून तुझं इतकं वय झालं मग लग्न करा किंवा ठराविक वयात मुलं जन्माला घाला हे असं नसलं पाहिजे. हे नैसर्गिकरित्या व्हायला हवं. तसं होत असेल तर ठिकच आहे. पण जितकं एखाद्या जोडप्याकडे गांभिर्याने पाहिलं जातं तितकंच एका सिंगल व्यक्तीकडेही पाहायला हवं. त्यांच्यात काहीतरी उणीव आहे काहीतरी कमतरता आहे. किंवा बाईगं तुला एकटीला कसं जमतं... असं नाही व्हायला पाहीजे.”

तर पुढे वीणा सांगते की, “आपल्या आईवडीलांच्या काळात असं नव्हतं. कोणी लग्न न झालेली माणसं सापडायची नाहीत. आता माणसं स्वतःला प्रतिप्रश्न विचारुन सिंगल राहतात. किंवा मी लग्न कधी करायचं याची वेळ-काळ ठरलेली नाही. किंवा मला मुलं हवी की नको हा निर्णयसुद्धा आजकालची जोडपी घेतात. आणि मला वाटतं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. जगातील कित्येक लोक आज एकटेच राहतात.”

संपूर्ण मुलाखत इथे पाहा...