भारतीय रागदारीवर आणि सुरावटींवर आधारलेला संघाचा घोष समाजासाठी नेहमीच आकर्षण ठरतो. संघाच्या संचलनात, शारीरिक कार्यक्रमात रसरसते चैतन्य निर्माण करण्याची ताकद या घोषामध्ये आहे. प्रांगणीय संगीताची परंपरा भारतातून लुप्त झाली होती. या प्रांगणीय किंवा मैदानी संगीताचे पुनरुज्जीवन हीदेखील संघाच्या घोषाची विशेषता. शताब्दी वर्षानिमित्ताने संघाच्या घोषप्रवासाचा हा धावता आढावा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यांतील एक वैशिष्ट्य म्हणजे संघाचे पथसंचलन. संचलन हा समाजाच्या कुतूहलाचा विषय आहे. संघाच्या पूर्ण गणवेशामध्ये घोषाच्या (बॅण्ड) तालावर होणारी संचलने किंवा घोषवादनाची प्रात्यक्षिके समाजाला संघाचे दर्शन घडवतात. संचलनाशिवाय संघाची शिबिरे, संघशिक्षावर्ग अशा प्रसंगीदेखील घोषवादन, घोषप्रशिक्षण यांचे आयोजन होत असते. संघाच्या घोषाची एक वेगळी ओळख आहे. घोषाची शिस्तबद्धता, वाद्यवादन करणाऱ्या स्वयंसेवकांचे वादनातील कौशल्य आणि वादनातील तसेच एकूण सर्व कामांमधील सांघिक कृती या सर्वांचा एकत्रित परिणाम घोष पाहणाऱ्यांवर होतो आणि लोक प्रभावित होतात. घोष म्हणजे समाजजीवनात ज्याला ‘बॅण्ड’ म्हटले जाते. घोषाच्या तालावर चालणारे शिस्तबद्ध स्वयंसेवकांचे संचलन पाहताना साऱ्यांनाच अचंबा वाटतो, कौतुक वाटते आणि प्रेरणाही मिळते. संचलनात जेव्हा चालणाऱ्यांच्या पावलांना पावले मिळतात, तेव्हा स्वाभाविकच मनालाही मने मिळतात आणि त्यातूनच सांघिक पद्धतीने संघाचे कार्य उभे राहते.
घोषवादकांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते वादक म्हणून घोषपथकात सहभागी होत असले, तरी ते लौकिकार्थाने तसे गायन वा वादनकलेच्या क्षेत्रातील नसतात. त्यातील कोणी महाविद्यालयीन विद्याथ, कोणी नोकरदार, कोणी व्यवसायी, कोणी उद्योजक, शेतकरी, व्यापारी असतात. परंतु, स्वतंत्ररितीने आणि थोडे अधिक शिक्षण घेऊन, परिश्रम घेऊन त्यांनी हे कौशल्य आत्मसात केलेले असते. संघातील सर्वच स्वयंसेवकांचा घोषपथकात सहभाग नसतो. ज्यांना वाद्यवादनाची थोडी आवड आहे, असे स्वयंसेवक वादनाचे प्रशिक्षण घेतात आणि ते घोषपथकांमध्ये सहभागी होतात. घोष हा थोडे अधिक कष्ट घेऊन, अधिक सराव करून कौशल्य संपादन करण्याचा विषय आहे.
वाद्यांचे प्रकार
संघाच्या घोषामध्ये प्रामुख्याने वंशी किंवा वेणू (फ्लूट), स्वरद (क्लॅरोनेट), तार स्वरद, नागांग (सेक्साफोन), तारतर नागांग (सोप्रानो), तूर्य (ट्रंपेट), प्रतान प्रतूर्य (स्लायडिंग ट्रोम्बोन), शंख (बिगुल), आनक (ड्रम), शृंग (कोरोनेट), मुखसंवादिनी (पियानिका), त्रिभुज (ट्रँगल), पणव (बासड्रम), झल्लरी, झांज (सिम्बल) ही वाद्ये वाजवली जातात. तसेच या दलाचा प्रमुख घोषदंडाच्या (स्टाफ) साहाय्याने दलाचे संचालन करतो. घोषामध्ये प्रारंभी पाश्चात्य सुरावटीवर आधारित अशा रचना वाजवल्या जात. प्रारंभीच्या काळात घोषातील वाद्यांची बिगुल, साईड ड्रम, बासड्रम अशी सर्व नावे इंग्रजीतच होती. मात्र नंतर त्यात बदल करून हळूहळू भारतीय संगीतावर आधारित रचना बांधणीला काही स्वयंसेवकांनी सुरुवात केली. त्यानंतर त्याच रचना वाजवल्या जाऊ लागल्या. या अत्यंत अवघड कामात पुण्याचे हरि विनायक ऊर्फ बापूराव दात्ये आणि कर्नाटकमधील सुब्बु श्रीनिवास ऊर्फ सुब्बुजी यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.
घोष प्रमुखाचे कौशल्य
घोषदलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या दलाचे संपूर्ण संचालन जो घोषप्रमुख करत असतो, तो कोणतीही आज्ञा तोंडी देत नाही. त्याच्या हातातील घोषदंडाच्या इशाऱ्यानुसार सारे वादक वादन करतात. चालण्यास प्रारंभ करणे, थांबणे, डावीकडे वा उजवीकडे वळणे याचे संकेत ठरलेले आहेत. वाद्यांतील बदल तसेच एखादे वाद्यवादन होत असताना त्यातील रचना बदलण्याचेही संकेत घोषप्रमुख घोषदंडाच्या आधारे देतो. घोषदंड स्वतःभोवती लयबद्ध पद्धतीने डावी-उजवीकडे फिरवण्याचे, एका हातातून दुसऱ्या हातात घेण्याचे, चालत असतानाच तो आकाशात उंच उडविण्याचे आणि दोन-तीन पावले पुढे जाऊन अगदी सहजरित्या झेलण्याचे काम घोषप्रमुख करत असतो. त्याची ही कृती पाहताना सारेजण दंग होऊन जातात.
संघाच्या शिस्तीचा विलक्षण प्रभाव
संघाचा प्रारंभ नागपुरात 1925 मध्ये झाल्यानंतर नवीन स्वयंसेवक संघात मोठ्या संख्येने भरती होऊ लागले होते. त्यामुळे जेथे शाखा चालत असे ते पटांगण अपुरे पडू लागले. तेव्हा नागपुरातील मोहिते वाड्यात संघस्थान बनवावे, असा विचार झाला आणि संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यासह सर्वांनी तेथे श्रमदान केले. त्यातून खेळण्यायोग्य जागा तयार करण्यात आली. मोठे संघस्थान तयार झाल्यामुळे संचलनासाठी जागेची अडचण उरली नाही. त्यातूनच दर रविवारी सकाळी स्वयंसेवकांना सैनिकी शिक्षण देण्याचा प्रारंभ झाला. डॉक्टर गणवेशाचाही आग्रह धरू लागले. कधीकधी रस्त्यानेही संचलन सुरू झाले. पहिल्या संचलनात 30 ते 40 स्वयंसेवक गणवेशात शिस्तीने, शिट्टीच्या तालावर जाऊ लागताच स्वाभाविकच लोकांना खूप आश्चर्य वाटले. काही बाल, किशोर त्यांच्या मागून पाय जुळवत घोळक्याने चालत चालत संचलनाबरोबर गेले. अशी पहिली काही संचलने शाखेची संख्या वाढवायला उपयुक्त ठरली. संचलनातील त्या शिस्तीचा विलक्षण प्रभाव लोकांवर पडत होता.
पहिले सघोष संचलन
संघाचे कार्य सर्वत्र विस्तारत होते. संघस्थापनेनंतर साधारण तीन वर्षांनी संघटनेतील वाढता उत्साह लक्षात घेऊन त्याला साजेशा साधनांची उभारणी डॉक्टरांनी सुरू केली होती. शाखांवर मोठी संख्या असे आणि संचलनाचा कार्यक्रमही मोठ्या शिस्तीत होत असे. पण या संचलनाला घोष नव्हता. ही मोठीच उणीव होती. तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत स्वयंसेवकांनी ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न चालवला होता. तरीही साधने समाधानकारक नव्हती. त्यावष म्हणजे 1928 मध्ये डॉक्टरांनी पैशांची जमवाजमव केली आणि घोषाचे साहित्य विकत घेतले. घोषपथक उभे करण्यासाठी तरुणांची निवड करून त्यांना एका वादनपटू शिक्षकाकडून शिक्षण देण्याची व्यवस्था केली. संघाचे पहिले सघोष संचलन विजयादशमीच्या दिवशी दि. 23 ऑक्टोबर 1928 या दिवशी झाले. नागपुरात सैनिकी थाटाची मिरवणूक काढावी, अशी डॉक्टरांची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी घोषविभाग उभारण्यात पुढाकार घेतला, असे म्हणता येईल. त्या संचलनात 500 स्वयंसेवकांचा सहभाग होता. तो एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ठरला. त्यात काही संघप्रेमी नागरिक साध्या वेशात सहभागी झाले होते.
डॉक्टरांची नेमकी भावना
संघाच्या घोषासंबंधीची डॉक्टरांची भावना नेमकी काय होती, ते एका घटनेतून अगदी सहजच लक्षात येते. नाना पालकर लिखित डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात ही घटना वाचायला मिळते. ही घटना साधारण 1930 मधील असेल. संघाचा घोष आता लोकांचे लक्ष वेधून घेण्याएवढा वादनकलेत निष्णात झाला होता. त्यामुळे संघावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींकडून त्यांच्याकडे ‘होणाऱ्या समारंभात संघाचा घोष पाहिजे,’ अशी मागणी डॉक्टरांकडे होऊ लागली. मागणी करणारी आपलीच मंडळी. त्यांना नकार देणेही अवघड आणि होकार देणेही अवघड, अशी डॉक्टरांची अवस्था झाली. पैसे मिळत असले, तर घोष का देऊ नये, असाही सूर उमटला. पण केवळ पैशांच्या मागे लागून घोष वाजविणाऱ्या स्वयंसेवकांच्या मनोवृत्तीला कमीपणा आणणे, डॉक्टरांना संमत नव्हते. संघाचा घोष हा स्वातंत्र्याच्या आणि वैभवाच्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या तरुणांना साथ देण्यासाठी गर्जत असला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती.
एका मित्राने घरगुती समारंभासाठी घोष देण्याची डॉक्टरांना गळ घातली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले, “तुमचा मुलगा देशासाठी दिग्विजय करून आला असता, तर त्याच्या स्वागतासाठी मी संघाचा घोष आपणहून नेला असता आणि देशाच्या गौरवात भर घालणाऱ्या त्या सुपुत्राच्या आगमनाचा आनंद दाही दिशांना घुमविला असता. पण त्याच्या लग्नासाठी तुम्ही वाटेल तितके पैसे देऊ केलेत, तरी हा घोष देता येणार नाही.” अशा रितीने पैशाची दृष्टी ही लोकसंग्रहाला बाधक ठरणारी आहे, हे ओळखून डॉक्टरांनी संघाचा घोष हा केवळ राष्ट्रीय कार्यासाठीच वाजविला जाईल, असे निश्चित केले.
घोषाचा बहुमान
संघकार्याचा विस्तार साऱ्या प्रांतांमध्ये झाला. त्याबरोबरच घोषपथकेही तयार होऊ लागली. संघकार्याच्या वैशिष्ट्यांमध्ये घोषाने निश्चितच स्थान मिळवले. त्यामुळे घोष हा स्वयंसेवकांचा आणि नागरिकांचाही आकर्षणाचा विषय झाला. भारत-चीन युद्धात (1962) सीमावत भागात संघस्वयंसेवकांनी भारतीय सैन्याला आवश्यक ती मदत पुरवण्याचे काम अत्यंत साहसाने केले. त्याबरोबरच दिल्लीतील वाहतूक नियमनाचेही काम संघावर सोपवण्यात आले होते. तेही त्यांनी अत्यंत उत्तम रितीने केले. त्या कार्याचा सन्मान म्हणून दि. 26 जानेवारी 1963 रोजी दिल्लीतील राजपथावर (कर्तव्य पथ) झालेल्या संचलनप्रसंगी संघाच्या स्वयंसेवकांनाही आमंत्रित करण्यात आले होते आणि संघस्वयंसेवकांच्या तुकडीने घोषासह तेथे संचलनात भाग घेतला होता. दिल्लीत 1982 साली झालेल्या आशियाई-एशियाड स्पर्धांच्या समारोपप्रसंगी ‘शिवराजः’ या भूप रागातील रचनेचे वादन नौदलाच्या वाद्यवृंदाने केले होते. या रचनेची निवड पं. रविशंकर यांनी केली होती आणि ही रचना तयार केली होती, संघस्वयंसेवक बापुराव दात्ये यांनी. पुण्यात 1983 साली झालेल्या महाराष्ट्र प्रांताच्या तळजाई शिबिरात 35 हजार स्वयंसेवक उपस्थित होते. त्यावेळी जी दोन संचलने निघाली होती, त्यांतील घोषानेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
घोषावरील अमीट ठसा
संघाच्या घोषाचा समग्र इतिहास लिहिला गेला, तर बापुराव दात्ये आणि सुब्बुजी या दोघांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, इतके मोठे कार्य या दोघांनी संघघोषासाठी करून ठेवले आहे. पुण्याचे स्वयंसेवक हरि विनायक ऊर्फ बापुराव दात्ये यांचे संघाच्या घोष उभारणीत मोलाचे योगदान राहिले. घोष हा त्यांच्या आवडीचा आणि चिंतनाचा विषय होता. कठोर परिश्रमातून आणि मोठ्या ध्यासातून त्यांनी घोषाची उभारणी केली. भारतीय रागसंगीतावर आधारित प्रांगणीय संगीतासाठी उपयुक्त अशा 50 रचना बापुरावांनी विविध रागांमधून बांधल्या आहेत. भारतीय संगीताचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ते जसे संगीतकार होते, तसेच उत्तम लेखकही होते, चित्रकार होते. प्रांगणीय संगीताचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. चिंतनशील, अभ्यासू, संशोधनशील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचे एकूण वागणे अत्यंत लयबद्ध आणि टापटिपीचे असे. घोषातील वाद्यांची ते फार काळजी घेत आणि ती सदैव लखलखती असली पाहिजेत, असा त्यांचा कटाक्ष असे. संघाच्या घोषबांधणीत त्यांचे मोठे योगदान राहिले.
घोषसाधक सुब्बुजी
संघाच्या घोषविभागासाठी आपले सारे आयुष्य ज्यांनी झोकून दिले, असे आणखी एक नाव म्हणजे सुब्बु श्रीनिवासन अर्थात सुब्बुजी. ते मूळचे म्हैसूरचे. एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मोठे बंधू अनंत यांच्याबरोबर 1952 मध्ये त्यांचा संघप्रवेश झाला. कर्नाटक प्रांताचे तत्कालीन प्रांतप्रचारक यादवराव जोशी त्यांच्या प्रेरणेतून सुब्बुजी यांनी 1962 मध्ये संघप्रचारक म्हणून कामाला सुरुवात केली. घोषविभागाची त्यांनी विशेष आवड होती. घोषाचे परिपूर्ण शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. पुण्यात सहा महिने राहून त्यांनी ते शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्यावर कर्नाटक प्रांताचे घोषप्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली. सुरुवातीच्या काळात संघाच्या घोषातील रचना लष्कराच्या वाद्यवृंदातून घेतलेल्या होत्या. त्यामुळे त्या पाश्चात्य सुरावटीवर वाजवल्या जात. घोषप्रमुख झाल्यानंतर सुब्बुजी यांनी या रचनांचे शब्द, स्वर आणि लिपीचे भारतीयीकरण केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण देशभर प्रवास केला. वादनक्षेत्रातील अनेक तज्ज्ञांच्या त्यांनी भेटी घेतल्या. हळूहळू घोषाचे संपूर्ण रूप बदलून गेले. अनेक नव्या रचना त्यांनी घोषासाठी बनवल्या. त्यांचे संकलन करून त्या एकत्रित रितीने ‘नंदन’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्धही केल्या. त्याबरोबरच त्या रचनांचे उत्तम रितीने ध्वनिमुद्रण करून त्याच्या ध्वनिफिती (कॅसेट्स)देखील प्रकाशित केल्या. सुब्बुजी प्रामुख्याने शंखवादक होते. परंतु, घोषातील सर्व वाद्ये वादनातही ते पारंगत होते. सुब्बुजी जेव्हा घोषदंड फिरवत, तेव्हा पाहणारे ती कृती पाहण्यात दंग होऊन जात असत. घोषदंड आकाशात 20, 25 फुटांपर्यंत उंच उडवून तो चालता चालता अचूक पकडण्याचे काम ते लीलया करत. त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. चेहरा सदैव हसरा. मोठ्या आपुलकीने ते कोणालाही सहज आपलेसे करून घेत.
संघामध्ये घोष हा स्वतंत्र विभाग करण्यात आला, तेव्हा सुब्बुजींकडे अखिल भारतीय घोषप्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली. एका अर्थाने ते संघाचे पहिले अखिल भारतीय घोषप्रमुख होत. या जबाबदारीनंतर घोष या विषयासाठी त्यांचा प्रवास देशभर सुरू झाला. घोषदंडासह इतरही वाद्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम त्यांनी केले. विशेषतः उत्तर प्रदेशात वाद्ये तयार करणाऱ्या शहरांमध्ये जाऊन कारागिरांसमवेत तासन्तास बसून त्यांनी हे काम करून घेतले. घोषात चामडी कातड्याचे आनक वापरले जात. सुब्बुजींनी फायबरचे पान आणि स्टीलच्या पत्र्यापासून आनक तयार करून घेतले. त्यामुळे आनक हे वाद्य वजनाला अत्यंत हलके झाले. सुब्बुजींच्या प्रवासामुळे संपूर्ण देशभर घोषवादकांची शिबिरे प्रांताप्रांतांमध्ये सुरू झाली. अनेक महानगरांमध्ये घोषवादनाच्या प्रात्यक्षिकांचे जाहीर कार्यक्रम झाले. या उपक्रमांमुळे हजारो नवे घोषवादक संघाला मिळाले. दि. 18 जानेवारी 2005 या दिवशी त्यांचा जीवनस्वर घोषनिनादामध्ये विलीन झाला. खरोखरच सुब्बुजी आजीवन घोषाचा ध्यास घेऊनच जगले.
पुण्यातील पहिले घोष संग्रहालय
संघाच्या घोषाची आणि घोषाच्या इतिहासाची समग्र माहिती देणारे एखादे संग्रहालय असले पाहिजे, या विचारातून पुण्यात एक संग्रहालय तयार करण्यात आले आहे. डिसेंबर 2024 मध्ये संघाच्या घोषाची समग्र माहिती देणारे आगळे-वेगळे संग्रहालय सुरू करण्यात आले. ‘अखिल भारतीय घोष संग्रहालय आणि अभिलेखागार (अर्काइव)’ असे त्याचे स्वरूप आहे. पुण्यात असलेल्या संघाच्या ‘मोतिबाग’ कार्यालयामध्ये हे संग्रहालय विकसित करण्यात आले आहे.
घोषविषयक माहितीचा खजिना
संघाच्या घोषाचा प्रारंभ कसा झाला, अगदी सुरुवातीला घोषासाठीची वाद्ये कशी जमविली गेली, त्यासाठी स्वयंसेवकांनी किती कष्ट सोसले, पुढे त्यांना प्रशिक्षण कसे मिळाले, त्यानंतर घोषातील वाद्यांवर वाजवल्या जाणाऱ्या रचना किंवा सुरावटी कशा तयार होत गेल्या, अशी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचे काम स्वयंसेवकांनी केले आहे आणि हे काम यापुढेही सुरू राहणार आहे. ही सारी संकलित माहिती ‘घोष’ या विषयाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी या संग्रहालयात उपलब्ध आहे. अभ्यासकांना तसेच या विषयातील तज्ज्ञांना येथे संशोधन तसेच अध्ययनही करता येणार आहे.
संग्रहालयात काय पाहाल...
संघाच्या घोषातील सर्व वाद्ये या संग्रहालयात मांडण्यात आली आहेत. यातील अनेक वाद्यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. या वाद्यांबरोबरच अनेक पारंपरिक वाद्येही संग्रहालयात आहेत. त्यात प्रामुख्याने नगारा, हलगी, डफ, दिमडी, तुतारी, सनई इत्यादीचा समावेश आहे. या प्रत्येक वाद्यासमोर त्या त्या वाद्याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. ही माहिती मराठी आणि हिंदीमध्ये आहे. याशिवाय, प्रत्येक वाद्यासमोर असलेला क्यूरआर कोड स्कॅन केल्यास दोन-अडीच मिनिटे एवढ्या कालावधीत त्या त्या वाद्याची माहिती ऐकता येते. या माहितीबरोबरच त्या त्या वाद्याचे वादनही ऐकायला मिळते. संघाच्या घोषासंबंधीची विस्तृत माहिती, घोषातील वाद्ये तसेच पारंपरिक वाद्ये, घोषासंबंधीचे ग्रंथ, पुस्तके, लेख, कागदपत्रे, न्या(त्या) चित्रफिती (व्हिडिओ कॅसेट), ध्वनिफिती (आॉडिओ कॅसेट) अशा अनेक गोष्टी येथे मांडण्यात आल्या आहेत.’
हे संग्रहालय निःशुल्क असून आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 11 ते 1 सायंकाळी 4 ते 7 या वेळेत खुले असते. अधिक माहितीसाठी घोष संग्रहालय, मोतिबाग, 309 शनिवार पेठ, पुणे - 411030 येथे मोरेश्वर गद्रे - 9423042806 यांच्याशी संपर्क साधता येईल.
‘घोषाचा योग्य इतिहास समजेल’
या संग्रहालयाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते दि. 16 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले. डॉ. मोहनजी हे स्वतः घोषविभागातील जाणकार आणि उत्तम घोषवादकही आहेत. घोषात वाजवल्या जाणाऱ्या काही रचनांची निर्मितीही त्यांनी केली आहे. “योग्य गोष्टी समाजापुढे मांडल्या गेल्या नाहीत, तर अयोग्य गोष्टी समाजापुढे येतात. या पार्श्वभूमीवर संघाच्या घोषाचा समग्र इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या घोष-अभिलेखागाराचे महत्त्व खूप मोठे आहे. अभिलेखागारामुळे घोषाचा योग्य इतिहास नव्या पिढीसमोर येईल, असा विश्वास डॉ. मोहनजी भागवत यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला होता. “संघाच्या घोषविभागाचा इतिहास नव्या पिढीला माहीत होणे आवश्यक आहे. पूवच्या काळात घोषविभाग कसा होता आणि तो कसा विकसित होत गेला, याची माहिती एकाच ठिकाणी संग्रहित असणे आवश्यक होते. हे काम या अभिलेखागारामुळे झाले आहे,” असेही डॉ. भागवत म्हणाले होते. सांघिक कृतीला दिले जाणारे असाधारण महत्त्व, शिस्त, स्वयंअनुशासन ही घोषाची काही प्रमुख वैशिष्ट्ये. याशिवाय संघाच्या घोषाची आणखी एक विशेषता डॉ. मोहनजी भागवत यांनी अत्यंत समर्पक शब्दांत सांगितली आहे. ती म्हणजे, प्रांगणीय संगीताची परंपरा भारतातून लुप्त झाली होती. हे प्रांगणीय संगीत भारतीय संगीताच्या दालनात पुन्हा संघामुळेच आले. प्रांगणीय किंवा मैदानी संगीताचे पुनरुज्जीवन ही संघाच्या घोषाची विशेषता आहे. घोषाची नेमकी विशेषता या शब्दांतून सहजच लक्षात येते.
- विनायक करमरकर