शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदूत्वाचा जागर की, टीकांचा पाऊस?

01 Oct 2025 20:08:10

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची तोफ गुरुवार, २ ऑक्टोबर धडाडणार आहे. या मेळाव्यात कोण कोणती भूमिका जाहीर करणार? आणि कोण कुणाला काय बोलणार? यावर सर्वांचेच लक्ष लागून आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये सुरु केलेल्या दसरा मेळाव्याला ५९ वर्षांची परंपरा आहे. या दसरा मेळाव्यातून बाळासाहेब राज्याच्या राजकीय दिशा ठरवत विचारांचे सोने वाटण्याचे काम करायचे. तेव्हापासूनच दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेनेचा दसरा मेळावा असे एक जुने नाते निर्माण झाले.

दरवर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांसह सर्वांचेच कान आतूर असायचे. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...” या गर्जनेने सुरु होणाऱ्या त्यांच्या भाषणात प्रखर हिंदूत्वाची भूमिका आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याची जिद्द ओसंडून वाहत होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली. मात्र, त्यांच्या दसरा मेळाव्यात टीकाटिपण्णी, टोमणे आणि कुरघोड्या करता करता बाळासाहेबांच्या हिंदूत्वाचा धागा कुठे विरून गेला ते कळलेच नाही. पुढे २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही दोन वेगवेगळे दसरा मेळावे घेणे सुरु केले.

यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट ओढवल्याने हे दसरा मेळावे होतात की, नाही अशी शंका होती. मात्र, दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे होणार असून त्यांच्या जागाही निश्चित झाल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मैदानात मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असली तरी सर्वत्र चिखल पसरला असल्याने हा मेळावा पार पाडण्यासाठी उबाठा गटासमोर अनेक आव्हाने आहेत. याशिवाय दुसरीकडे, याच ऐतिहासिक मेळाव्यातून मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीची घोषणा होते का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

याऊलट, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आझाद मैदानावर पाणी साचले असल्याने गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिक उपस्थित राहणार असून उर्वरित शिवसैनिक राज्यभरातील पूरग्रस्तांच्या मदतीला जाणार आहे. या दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यात बाळासाहेबांच्या हिंदूत्वाचा जागर होतो की, घोषणा, टीकाटिपण्णी आणि आगामी निवडणूकांची समीकरणे जुळतात? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.


Powered By Sangraha 9.0