sangh
‘स्व-बोध’ म्हणजे केवळ ‘मी कोण आहे’ एवढाच प्रश्न नाही, तर माझा समाज, माझा देश आणि माझी संस्कृती यांची खरी ओळख पटवून देणारा व्यापक आत्मबोध आहे. इतिहास, वारसा, शिक्षण, भाषा, अर्थव्यवस्था, धर्म आणि कुटुंबव्यवस्था या सर्व आयामांवर चिंतन करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांना सक्षम बनवण्याचा हा मार्ग आहे. स्वतःची खरी ओळख पटल्याशिवाय उत्कर्ष साधता येत नाही, हा संदेश हा लेख अधोरेखित करणारे ‘स्व-बोध’चे सखोल चिंतन...
‘स्व-बोध’ म्हणजे नक्की काय? तर मी कोण आहे, कसा आहे, माझी बलस्थाने काय आहेत आणि त्याचसोबत माझी कमकुवत स्थाने कोणती आहेत, यांची ओळख आणि जाण. आपल्याला आपली खरी ओळख जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वतःचा उत्कर्ष साधता येत नाही. दोन गोष्टी आठवतात. हनुमंताजवळ अनेक शक्ती होत्या, परंतु काही शापामुळे त्याला त्यांचा विसर पडला होता. जेव्हा जांबुवंताने आठवण करून दिली, तेव्हा त्या शक्तींच्या साहाय्याने हनुमंताने श्रीरामांना साहाय्य केले. दुसरी गोष्ट म्हणजे, मेंढ्यांच्या कळपात राहिलेला सिंह. त्याला जेव्हा दुसऱ्या सिंहाने जाणीव करून दिली आणि त्याने पाण्यात स्वतःला पाहिले, तेव्हा स्वाभाविकपणे म्या म्या ओरडणे जाऊन त्याने डरकाळी फोडली आणि सिंहांच्या कळपात गेला. आपल्याला आपली स्वतःची ओळख होणे हे अत्यंत महत्त्वाचे. Who am I? माझी Identity काय आहे? हे समजून घेणे म्हणजे स्व-बोध. इथे ‘स्व’ हा केवळ ‘मी’ या अर्थाने नाही, तर व्यापक आहे. यात मी, समाज, देश आणि विश्व असा सर्वंकष विचार आहे.
सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या स्व-बोध म्हणजे मी कोण आहे, माझा समाज कोणता, त्याची पूर्वापार काय ओळख आहे, माझ्या देशाची ओळख काय आहे, देशाचा इतिहास काय आहे, राष्ट्रपुरुष कोण आहेत, संस्कृती काय आहे, ती किती प्राचीन आहे, माझ्या देशाची भौगोलिक स्थिती काय आहे आणि या सर्वांचा संबंध माझ्या देशाशी कसा जोडला गेलेला आहे, याची जाणीव. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आजची वस्तुस्थिती काय आहे आणि माझ्या देशाला वैभव प्राप्त करून द्यायचे असल्यास या पार्श्वभूमीवर देशाने, समाजाने आणि मी स्वतः काय करणे आवश्यक आहे, या सर्व बाबींचे विचारमंथन आणि त्याप्रमाणे कृती.
‘स्व’ म्हणजे केवळ स्वदेशी अर्थव्यवस्था एवढेच नाही, तर ‘स्व’चे अनेक आयाम आहेत. या स्व-बोधच्या चिंतनानिमित्त काही मुद्द्यांची आपण थोडक्यात चर्चा करू.
1. आपला देदीप्यमान इतिहास
भारताचा इतिहास भारताचा इतिहास अनेक ऋषी मुनी, अनेक वैज्ञानिक, अनेक पराक्रमी राजे आणि सम्राटांचा आहे, ज्यांच्यामुळे भारत जगभरात वैभवशाली राष्ट्र म्हणून मान्यता प्राप्त झाला होता. शेती, उद्योग इत्यादी सर्वच क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती. संरक्षणात भारत अव्वल होता. जगाच्या जीडीपीमध्ये भारताचा हिस्सा जवळपास 40 टक्के होता. भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे इथल्या संपन्नतेचे वर्णन केले जाते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत संशोधनात भारत अग्रेसर होता. अगणित ऋषी-मुनी यांनी निरनिराळ्या क्षेत्रांत मूलभूत संशोधन केले होते. पाणिनी, चाणक्य, आर्यभट्ट आणि अशा अनेकविधजणांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली; अनेक शोध लावले. भारत म्हणजे शिक्षणाची जगाची राजधानीच. इथे अनेक पराक्रमी महापुरुष झाले. प्रभू श्रीराम यांच्यापासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीराव, लाचीत बडफुकन, बिरसा मुंडा, राणी गाईडेनील्यू असे अनेक पराक्रमी. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे हजारो क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्या बलिदानामुळे मिळाले आहे. इथली अप्रतिम शिक्षणपद्धती, जी सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था करत होती, दुर्दैवाने इस्लामी आक्रमण आणि नंतरचे इंग्रजांचे आक्रमण यांनी आपला इतिहास, इथली ज्ञानपरंपरा पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतरसुद्धा तीच पद्धत अवलंबली गेली. त्यामुळे आजच्या पिढीला हा आपला देदीप्यमान इतिहास आणि परंपरा यांची माहिती नाही. आपला इतिहास हा पराभवाचा आहे, इथे एक मागास आणि रानटी समाज होता, हा समज दृढ केला गेला आहे. आर्य बाहेरून आले, हा खोटा सिद्धांत आपल्या माथी मारला गेला. सुदैवाने आज आपला इतिहास, आपले संशोधन यांचा अभ्यास होत आहे.
वैज्ञानिक क्षेत्र (रसायन, भौतिक, जीवशास्त्र), औषधी/वैद्यकीय क्षेत्र, खगोल, स्थापत्य, सागरी क्षेत्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कला क्रीडा, संरक्षणनीती - युद्धकला, देदीप्यमान इतिहास आणि परंपरा इत्यादींचा अभ्यास आणि त्यासंबंधी संशोधन करून प्रत्येक भारतीयाला त्याची उचित माहिती आणि समाजजीवनात त्याचा योग्य तो वापर करणे याची आवश्यकता आहे.
2. आपल्या राष्ट्रीय वारशाचा अभिमान
आपल्या राष्ट्राला एक देदीप्यमान आणि गौरवशाली असा वारसा लाभला आहे. याच वारशाच्या आधारावर भारताने जगद्गुरूपद मिळवले होते. भारत एक प्रगत राष्ट्र होतेच, परंतु सर्वार्थाने एक आदर्श मानवी मूल्यांचे उगमस्थान म्हणून जगभरात आदरणीय होते. त्यामुळेच इथल्या परंपरा, रितीरिवाज, समाजपद्धती, राज्यपद्धती आणि केवळ मानवच नव्हे, तर चराचरांत ईश्वर पाहणारी संस्कृती जगाला भुरळ पाडत होती. आज ज्यावेळी आपण पुन्हा एकदा प्रगतिपथावर अग्रेसर होऊ पाहात आहोत, त्यावेळी प्रगतीचे मापदंड हे पाश्चिमात्य नाहीत, तर आपल्या राष्ट्राने प्रस्थापित केलेले असावेत, हाच कटाक्ष हवा. यासाठी आवश्यक बाब ही आहे की, आपल्याला आपला वारसा नक्की काय होता, हे समजून घ्यावे लागेल. आपल्या समृद्ध वारशाची काही उदाहरणे समजून घेऊया...
सर्वंकष आरोग्यशाली जीवनशैली
योग, आयुर्वेद आणि आदर्श जीवनशैली ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असेच म्हणावे लागेल. जीवनशैलीच्या बदलामुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे जग आज योग, आयुर्वेद आणि आपल्या प्राचीन जीवनपद्धती आणि जीवनशैली यांकडे आकृष्ट होत आहे. आवश्यकता आहे, आपण भारतीयांनी या वारशाची पुनर्स्थापना करून त्याचे आचरण अभिमानाने करण्याची.
प्रकृतीसोबत जगणे
चराचरांत परमेश्वराचे रूप पाहणे, ही आपली परंपरा. सजीवच नव्हे, तर निजव वस्तूंमध्येही परमेश्वराचे अस्तित्व आपण मानतो. या निसर्गावर आपण जगण्यासाठी अवलंबून आहोत आणि म्हणूनच त्याप्रति कृतज्ञता भाव मनात जागता ठेवणारी आपली संस्कृती. निसर्गाचा समतोल राखण्याची जाणीव आपल्या पूर्वजांनी ठेवली आणि म्हणूनच निसर्गपूरक जीवनशैलीचा पुरस्कार पूर्वापार आपण करत आलो आहोत. परंतु, सध्या सर्व जगभर निसर्गाला ओरबाडण्याची अहमहमिका लागली आहे. याचे परिणामही आपणच भोगत आहोत. चराचरांत परमेश्वर पाहणारी, शोषण नव्हे दोहन यांवर विश्वास ठेवणारी जीवनपद्धती हा आताच्या या प्रश्नावर पूर्वजांनी दिलेला उपाय आहे. आपण आपला विसरत चाललेला हा वारसा पुन्हा एकदा जागविण्याची आणि जगण्याची आवश्यकता आहे.
कुटुंब पद्धती
खरं म्हणजे भारता नीई-पेटंट घ्यावे, अशी ही आदर्श व्यवस्था. व्यक्ती, समाज आणि देश यांचे स्वास्थ्य टिकविणारी ही व्यवस्था. एकत्र कुटुंब पद्धती ही भारताची खासियत. एक सशक्त सामाजिक व्यवस्था आणि त्यातूनच उभे राहणारे सशक्त राष्ट्र. पाश्चिमात्य देशांत आज कुटुंब व्यवस्था पार कोलमडून पडली आहे आणि याचे समाज आणि राष्ट्रावर होणारे परिमाण आजही राष्ट्रे भोगत आहेत. तिथले समाजशास्त्री आज कुटुंब व्यवस्थेकडे वळू लागले आहेत, हिंदू जीवनपद्धतीचा अभ्यास करू लागले आहेत. दुर्दैवाने आज भारतात पाश्चिमात्यांचे अंध अनुकरण सुरू आहे आणि त्यामुळे आपली कुटुंब व्यवस्था डळमळीत होऊ पाहात आहे. पाश्चात्यांनी हे अनुभवले आहे. आणि हिंदू कुटुंब पद्धती हे त्यांना आशास्थान वाटू लागले आहे. त्यांच्या या अनुभवातून आपण शहाणे होऊन आपलाच हा वारसा पुन्हा एकदा जोमाने पुढे नेला पाहिजे. अधिक सशक्त केला पाहिजे. सुदृढ आणि समर्थ राष्ट्र बनण्याचा महामार्ग हा सुदृढ कुटुंब व्यवस्थेमधूनच जातो, हे आपण जाणले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे आणि जगासमोर आदर्श उभा केला पाहिजे.
वसुधैव कुटुम्बकम्
हिंदू विचारांच्या विशालतेचे, भव्यतेचे आणि व्यापकतेचे दर्शन म्हणजे ही संकल्पना. भारतीय कुटुंब व्यवस्थेचे हे विस्तारलेले स्वरूप. ‘हे विश्वची माझे घर’ असे मानणारी आपली संस्कृती. विश्वबंधुत्वाची जाणीव करून देणारा हा विचार. इतिहासकाळात भारतीयांनी हा विचार आचरणात आणला होता. भारत हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्र होते आणि केवळ आपणच नाही, तर जगातील सर्वचजण प्रगत व्हावेत, हा सहजभाव आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार आपल्याला अनुभवायला मिळतो. आजच्या एकमेकांचे प्रतिस्पध म्हणून उभ्या ठाकलेल्या या जगात सामंजस्य, विश्वास आणि शांती यायला हवी असेल, तर त्यासाठी ‘विश्वबंधुत्व संकल्पना’ राबविण्याची गरज आहे आणि जे फक्त आणि फक्त भारतच करू शकतो!
एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति-सत्य एकच आहे
सर्व मतांचा आदर. सत्य हे एकच आहे, विद्वान त्याची मांडणी अनेक प्रकारे करतात, ही आपली सहज अंगवळणी पडलेली मान्यता आहे. म्हणूनच भारतात निरनिराळ्या पंथ-उपपंथात वादविवाद आणि झगडे झाले नाहीत. म्हणूनच हिंदू विचारांचा वारसा सांगणारे अनेक पंथ इथे सापडतील. शैव, शाक्त, वेदांती, जैन, सिक्ख, बौद्ध, आर्यसमाजी, लिंगायत, स्वामीनारायण यांना मानणारे आणि याशिवाय अनेक छोटे-मोठे पंथ यांचा उदय याच भूमीत झाला. हे सर्व पंथ, उपपंथ हे त्या एकाच ईश्वराकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग सांगतात आणि त्यामुळे सर्व मार्गही सत्यच आहेत आणि म्हणूनच प्रत्येक मताचा स्वाभाविक आदर हा आमचा प्राचीन वारसा आहे. वास्तविक मुस्लीम आणि ख्रिश्चन हे एकेश्वरवादी धर्म. अन्य कुठला मार्ग त्यांना मान्यच नाही आणि याच मान्यतेतून आज जगात जे संघर्ष सुरू आहेत, त्याचे उगमस्थान आहे. म्हणूनच आज जगात एकमेकांना सहन करण्याची नव्हे, तर एकमेकांचा आदर करण्याची आवश्यकता आहे. हा आपला समृद्ध वैचारिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. तो जगण्याची आणि जपण्याची आवश्यकता आहे.
3. शिक्षणनीती
मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचा त्याग करून आपल्या देशाला, समाजाला जे आवश्यक ते शिक्षण देण्याची प्राथमिकता. राष्ट्रभावना, राष्ट्रगौरव जागृत करणारे शिक्षण, भारताचा खरा वारसा शिकविणारे, आम्ही पराभूत नव्हे, तर गौरवशाली पूर्वजांचा वारसा सांगणारे आहोत, हा अभिमान जागृत करणारे शिक्षण, पूर्वजांनी सर्वार्थाने केलेली प्रगती याचे ज्ञान देणारी आणि त्यात अधिक संशोधन करण्यासाठी प्रवृत्त करणारी शिक्षणपद्धती, केवळ नोकरदार निर्माण करणारे शिक्षण नव्हे, तर आदर्श माणूस निर्माण करणारे शिक्षण. स्वातंत्र्यानंतर बऱ्याच कालावधीने निरनिराळ्या तज्ज्ञांच्या विचारमंथनातून, लाखो नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन, आताच्या काळात असलेली आव्हाने विचारात घेऊन सरकारने नवीन शिक्षानीती अवलंबायचे ठरविलेले आहे. शिक्षणाचा मोठा प्रभाव हा त्या त्या देशाच्या एकूण वाटचालीवर होत असतो. लहानपणापासून जे शिक्षण मिळते, त्याचे दूरगामी परिणाम होत असतात, मानसिकतेवर आणि एकूणच व्यवहारावर. शिक्षणपद्धतीतसुद्धा दुसऱ्या देशांचे अंधानुकरण न करता आपल्याला जे आवश्यक त्या पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक. अर्थात अन्य पद्धतींतील जे जे चांगले आहे, त्याचा स्वीकार करणे यात गैर काहीही नाही. ते केलेच पाहिजे. मात्र, अंधानुकरण नको. आता जी शिक्षणनीती अवलंबली जाणार आहे, त्याचे परिणाम दिसायला आणि जाणवायला पुढील दहा वर्षे नक्कीच जातील. पण त्यासाठी आज बदल करणे आवश्यकच आहे आणि त्यासाठीसुद्धा आवश्यक आहे, ती ‘राष्ट्र प्रथम’ ही मानसिकता.
4. स्वभाषा
भाषा हा प्रत्येकाच्या व्यक्त होण्याचा, विचार करण्याचा स्वाभाविक मार्ग. जगभरातील जे प्रगत देश आहेत, त्यांच्याकडे पाहिले, तर आपल्या लक्षात येईल. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, चीन, रशिया यादी कदाचित मोठी होईल. सर्वांमध्ये एक समान धागा आहे, स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान आणि आग्रह. त्या त्या देशांची शिक्षणनीतीसुद्धा पाहा. शिक्षण अगदी बिगरीपासून ते उच्च शिक्षण आणि तेही सर्व शाखांचे, आपल्या स्वतःच्या भाषेतून. स्वभाषेतून शिक्षण हे अत्यंत आवश्यक, त्यातून समजण्याची आणि व्यक्त होण्याची सहजता असते, हे पाश्चात्य शिक्षणतज्ज्ञांनीच सांगितलंय बरं का आणि आपण मात्र इंग्रजीच्या मागे वेड्यासारखे धावत चाललोय. इथे इंग्रजांनी रुजविलेली गुलामीची मानसिकता. भाषा म्हणून इंग्रजी शिकणे गैर अजिबात नाही; परंतु ‘त्यावाचून पर्यायच नाही’ इथपासून ते ‘या जगात प्रगती करायची असेल तर इंग्रजीच हवी’ ही मानसिकता हा मोठा अडसर आहे.
हा झाला शिक्षणाचा भाग. परंतु, भारताबद्दल विचार करायचा झाला, तर भाषा विविधता आणि प्रत्येक भाषा समृद्ध हा एक दुर्लभ वारसा आपल्याला लाभला आहे. इथेसुद्धा इंग्रजांनी सफलतापूर्वक भाषावाद निर्माण करून आपल्याला एकमेकांपासून वेगळे करण्यात ते यशस्वी झाले होते आणि आजही तीच मानसिकता आपण हिरिरीने पुढे चालवत आहोत. मंडळी, भाषावैविध्य किती आहे, याचा विचार करा. प्रत्येक प्रांताची विशिष्ट भाषा आहे. ईशान्य भारतात तर प्रत्येक गावाची स्वतःची भाषा आहे. आणि विशेष म्हणजे, भारतातील प्रत्येक भाषेत विपुल साहित्य उपलब्ध आहे. अनेक विचारवंत प्रत्येक भाषेने दिले आहेत आणि त्यातही वैशिष्ट्य म्हणजे, जवळपास सर्व भाषा या संस्कृतोत्भव आहेत. सर्व भाषा या भारतभूमीच्या संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या आहेत, इथल्या परंपरांचा वारसा सांगणाऱ्या आहेत आणि म्हणूनच भारतीयत्वाचे जागरण करणाऱ्या आहेत. सर्व भाषांतून भारतीय संस्कृतीचेच गुणगान गायले आहे. आणि म्हणूनच या सर्व भाषा आमच्या आहेत, नव्हे माझ्या आहेत, या मानसिकतेची आज आवश्यकता आहे. भाषा हे समाजाला जोडण्याचे माध्यम आहे. दुर्दैवाने इंग्रजांच्या कृपेने आणि आपल्या करंटेपणामुळे आज भाषा हे तोडणारे माध्यम झाले आहे. स्वभाषेचा तिरस्कार आणि इंग्रजीचा पुरस्कार आहेच, पण अन्य भाषा आणि भाषिकांचा तिरस्कार हेसुद्धा आपण अनुभवले आहे आणि आजही अनुभवत आहोत. देशाला जोडण्यासाठी, एकत्व राखून मजबूत करण्यासाठी आणि भाषा गुलामीचे जोखड फेकून देण्यासाठी स्वभाषा आणि अन्य भाषांचा आदर हे अत्यंत आवश्यक आहे. भले अन्य भाषा मला बोलता येत नसतील, पण आमच्या पूर्वजांची ती ठेव आहे, त्यांनी दिलेला तो समृद्ध वारसा आहे आणि म्हणून सर्वच भारतीय भाषा आणि भाषिक यांचा मी आदर केला पाहिजे. भाषिक गुलामीतून बाहेर पडण्यासाठी आणि भाषेच्या माध्यमातून देश एकत्र जोडण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. पुन्हा इथेही आवश्यक ते म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’ ही मानसिकता.
5. स्वदेशीचा आग्रह
कोणत्याही देशाची प्रगती ही देशातील उद्यमिता, समृद्ध व्यापार, शेतीमधील निर्भरता, संशोधन, संसाधनांचा योग्य वापर, रोजगारनिर्मिती आणि देशाला अनुकूल आर्थिक धोरणे यावर अवलंबून असते. आत्मनिर्भरता हे देशाचे धोरण असणुे आवश्यक आहे.यासाठी आपले कर्तव्य आहे की, आपण ‘मेड इन इंडिया’ उत्पादने खरेदी करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे देशातील पैसा देशातच राहून पुन्हा इथेच त्याची गुंतवणूक केली जाते. ज्या वस्तू भारतात बनतच नाहीत, त्यांची खरेदी बाहेरूनच करावी लागेल. परंतु, हे करताना ती उत्पादने भारतात कशी तयार होतील, या दृष्टीने सरकार आणि उद्योजक यांच्या प्रयत्नांची दिशा असायला हवी.उद्योजक मंडळींनीसुद्धा आपल्या उत्पादनांचा दर्जा उत्कृष्ट कसा राहील, यासाठी दक्षता घेणे आवश्यक.
उद्योजकांनी भारतीय संसाधनांचा अधिकाधिक सुयोग्य पद्धतीने वापर, संशोधनाद्वारे नवीन उत्पादने, ग्राहकांना उत्तम सेवा देणे, यासाठी तत्पर असणे आवश्यक आहे. लघुउद्योग आणि कुटिरोद्योग ही भारताची बलस्थाने आहेत. त्यांच्याद्वारे अधिकाधिक रोजगारनिर्मितीसुद्धा होत असते. त्यांचे सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे. स्टार्टअप हे सध्या भारतीय तरुणांचे बलस्थान आहे. जगभरात सध्या सर्वाधिक स्टार्टअप भारतात आहेत. त्यांना पाठबळ देण्याचे धोरण आवश्यक आहे. बचतगट हेसुद्धा अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून काम करत आहे, ज्यामुळे उद्योगनिर्मिती आणि रोजगारनिर्मिती होत आहे.
आपल्याकडील उपलब्ध संसाधने, मनुष्यबळ, नैसर्गिक विविधता, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता आणि समृद्ध वारसा आणि आपल्या आवश्यकता यांचा विचार याला अनुसरून उद्योगाचे व्यवस्थापन याचा विचार करण्याची गरज आहे. सरकार आणि उद्योजक यांनी मिळून ‘स्किल डेव्हलपमेंट’ याचा विचार आणि तशा सोयी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. या मोठ्या सेटचा उपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे. भारतीय तरुणांमध्ये नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बनण्याची मानसिकता कशी वाढेल, यासाठी प्रयत्न आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ, प्रशिक्षण इत्यादींची व्यवस्था उभारावी लागेल. भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ‘Be Indian, Buy Indian’ आणि ‘Vocal for Local’ हे सूत्र आपल्या प्रत्येकाला अवलंबायला लागेल.