संघस्पर्श : नाशिकच्या मातीतील किस्से

01 Oct 2025 15:06:11

नाशिक हे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाणारे शहर नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे. रामायणातील पंचवटीपासून डॉ. हेडगेवारांच्या संघ स्थापनेपर्यंत आणि श्रीगुरुजींच्या प्रेरणादायी प्रसंगांपासून समाजातील समरसतेपर्यंत, नाशिकच्या भूमीने संघकार्याला असंख्य प्रेरणादायी क्षण दिले आहेत. या लेखात अशाच दहा निवडक किश्श्यांच्या माध्यमातून नाशिकमधील संघकार्याचा इतिहास, मूल्यप्रणाली आणि समर्पण यांचे एक जिवंत दर्शन घडते. हे प्रसंग केवळ संघाच्या वाटचालीचे दस्तऐवजीकरण नाही, तर कार्यकर्त्यांच्या निष्ठा, त्याग आणि त्यागातून उभ्या राहिलेल्या संस्कृतीचे प्रतिबिंबही आहेत.

नाशिकच्या संघकार्याचे आधारवड ‌’राजाभाऊ गायधनी‌’

नाशिक शहराला हजारो वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. पंचवटीतील प्रभू श्री रामचंद्रांच्या निवास स्थानामुळे नाशिक शहरास तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. दक्षिण गंगा गोदावरीचा उगमही नाशिक जिल्ह्यात होतो. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातच आहे. समर्थ रामदास स्वामींची ही तपोभूमी आहे, असे ऐतिहासिक संदर्भ खूप देता येतील. या नाशिक शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल ते असे की, याठिकाणी संघकार्यासाठीच ज्यांचा जन्म झाला आहे अशा केवळ व्यक्तीच नाही तर कुटुंबेच्या कुटुंबे अनुभवायला मिळतात. त्यापैकी महत्त्वाचे एक नाव म्हणजे राजाभाऊ गायधनी. राजाभाऊ हे संघाच्या अधिकार श्रेणीतील कोणी अधिकारी नाहीत, परंतु नाशिकच्या संघकार्याचे ते एक आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

संघ कार्यकर्त्यांचे गुरुजींबद्दलचे प्रेम आणि आदरभाव

संघ शिक्षा वर्गाच्या प्रारंभी किंवा शेवटी श्रीगुरुजींचा नाशिकला हमखास प्रवास असायचा. बैठका, बौद्धिक, जाहीर कार्यक्रम बऱ्याच गोष्टी चालायच्या. एक गमतीचा प्रसंग असा की, नगरचे प्रसिद्ध अधिवक्ता ज्येष्ठ स्वयंसेवक व माजी क्षेत्र संघचालक माणिकराव पाटील यांचे लग्न नाशिकला झाले. त्या लग्नाला स्वतः गुरुजी नाशिकला हजर होते. गम्मत अशी की, माणिकरावांनी आपल्या विवाहाचा दिनांक श्रीगुरुजींना विचारूनच निश्चित केला होता. यावरून संघ कार्यकर्त्यांचे गुरुजींबद्दलचे प्रेम आणि आदरभाव केवळ अलौकिकच म्हटले पाहिजे.

यावषचे चपलांचे बजेट संपले...

श्रीगुरुजी आर्थिकदृष्ट्या आपले जीवन किती काटकसरीने जगायचे हे नाशिकमधील एका प्रसंगावरून लक्षात येईल. साधारण १९६२ चा काळ असावा. येवला येथे तीन दिवसीय सलग बैठकीसाठी गुरुजी आले होते. बैठक संपल्यावर ते निघाले, तेव्हा त्यांच्या बाहेर ठेवलेल्या चपला सापडेना. कोणीतरी चुकून घातल्या असाव्या किंवा अदलाबदल तरी झाली असावी. त्यामुळे गुरुजी तडक अनवाणी चालू लागले. तेव्हा एका स्वयंसेवकाने त्यांच्याजवळ समोरच्या चपलेच्या दुकानात आपल्यासोबत येण्याचा आग्रह धरला. त्यावर गुरुजी म्हणाले, “आता चप्पल खरेदी नाही, कारण यावषचे चपलांचे बजेट संपले.”

१९३९ साली त्र्यंबकेश्वर येथे संघकार्याला सुरुवात

श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग. सह्याद्री पर्वताच्या कुशीत सामावलेला त्र्यंबकेश्वर हा दुर्गम वनवासी तालुका. येथील काही तरुणांना पू. डॉ. हेडगेवारांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव जाणविला होता. दरम्यानच्या काळात नाशिकच्या संघ स्वयंसेवकांनी त्यांना मोलाची साथ दिली. अखेर १९३९ साली त्र्यंबकेश्वर येथे संघकार्याला सुरुवात झाली. लक्ष्मीदासशेठ खत्री त्यावेळचे माननीय संघचालक होते. सुरुवातीला शाखा घोडेमैदानावर आणि नंतर ती संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराजवळील मैदानावर भरत असे.

संघकार्यावरील स्वयंसेवकाची निष्ठा

चांदवड तालुक्यातला एक प्रसंग. नाशिकच्या संघकार्याच्या इतिहासात कायम आठवणीत राहणारा असा आहे. तो म्हणजे, मारुती तालमीच्या उत्तरेकडे संघशाखा तर दक्षिणेकडे राष्ट्र सेवा दलाची शाखा लागायची. महात्मा गांधीजींच्या हत्या प्रकरणानंतर एक दिवस संघशाखेवर खेळ सुरु असताना राष्ट्र सेवा दलाच्या लोकांनी शाखेवर हल्ला केला. हल्लेखोर थेट ध्वजापर्यंत पोहोचले, तेव्हा श्याम रत्नपारखी यांनी आपल्या मिठीत ध्वज दाबून धरला होता. त्या अवस्थेत त्यांना खूपच मारहाण झाली. अखेर ते बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा त्यांना ध्वज थोडा फाटल्याचे कळले तेव्हा ते ओक्साबोक्षी रडले. संघकार्यावरील निष्ठा काय असते, हे या प्रसंगावरून कळते.

काळाराम मंदिर सत्याग्रह आणि समरसता यात्रा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९३५-३६ साली अनुसुचित जाती-जमातीच्या बांधवांनी एक मोठा सत्याग्रह केला होता, जो ‌‘काळाराम मंदिर सत्याग्रह‌’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या ‌‘सामाजिक समरसता मंचा‌’ने फेब्रुवारी २००५ मध्ये एक समरसता यात्रा काढली, जी काळाराम मंदिराच्या परिसरातून सुरु होणार होती. याबाबत कळताच मंदिरातील पूवचे पुजारी रामदासबुवा यांचे नातू सुधीरबुवा महंत स्वतः यात्रेच्या आयोजकांना भेटले. यात्रेतील सर्व कार्यकर्त्यांना मंदिरात बोलावले. सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर सुधीरबुवांनी आपल्या आजोबांनी केलेल्या पापाबद्दल खेद व्यक्त करून समरसता यात्रेला मंदिराच्या आवारातून जाण्याची परवानगी दिली आणि त्यानुसार यात्रेचा प्रारंभ झाला.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत संघाचा घोष?

१९६४ सालचा मालेगावातील एक प्रसंग आजही अनेकांना आठवतो. मालेगावला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. अनेक भाविकांना जखमा झाल्या. विसर्जन न झाल्याने गणपती असलेल्या बैलगाड्या रस्त्यातच उभ्या राहिल्या. तीन दिवसांनंतर सरकारने गणपती विसर्जनाच्या सवाद्य मिरवणुकीस परवानगी दिली, परंतु भितीपोटी वाजंत्री मिरवणुकीत यायला तयार नव्हते. तेव्हा त्यावेळचे शहर कार्यवाह नानासाहेब पुणतांबेकर यांनी माननीय संघचालक दादा कासार वकील यांना विनंती करून संघाचा घोष मिरवणुकीत सहभागी केला. ते पाहून मग इतर वाजंत्रीदेखील काही अंतरानंतर मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी तर अक्षरशः बैलाच्या जागी स्वतःला जुंपून गणपतीच्या गाड्या ओढल्या.

नाशिकच्या मातीतील संघकार्य हे केवळ संघटनेच्या विस्ताराचे प्रतीक नाही, तर मूल्यनिष्ठ, समरस, आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित जीवनशैलीचे मूर्तस्वरूप आहे. या दहा किश्श्यांमधून संघ कार्यकर्त्यांची निःस्वार्थ वृत्ती, सामाजिक समरसतेसाठीचा संघर्ष, आणि कार्यातली शिस्त, त्याग व नेतृत्वगुण ठळकपणे समोर येतात. डॉ. हेडगेवारांची दूरदृष्टी, श्रीगुरुजींचे नेतृत्व, आणि नाशिकमधील असंख्य ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे समर्पण हेच नाशिकच्या संघविकासामागचे खरं बळ ठरले. अंधारात बौद्धिक चालवणारे गुरुजी असोत, की ध्वज वाचवताना बेशुद्ध होणारे स्वयंसेवक ्र या सगळ्या कथा आपल्याला एक गोष्ट शिकवतात: संघ म्हणजे केवळ शाखेची रचना नव्हे, तर ती एक जीवंत संस्कृती आहे. आजही नाशिकच्या गल्ल्यांमध्ये, पंचवटीच्या कुशीत आणि ग्रामीण भागात संघकार्य अखंड सुरू आहे. हे कार्य कितीही वर्षे उलटली, तरीही प्रेरणा देत राहील. कारण, इथे संघ म्हणजे केवळ संघटना नव्हे, तर तो आहे एक जीवनमूल्यांचा प्रवाह आहे.

श्रीकृष्ण चित्रपटगृह आणि अंधारात दिलेले बौद्धिक

एकदातर चक्क अंधारात बौद्धिक देण्याची वेळ गुरुजींवर आली होती. झाले असे की, नाशिक विभागातील स्वयंसेवकांची बैठक चाळीसगावला ठेवली होती. येथील श्रीकृष्ण चित्रपटगृहात गुरुजींच्या प्रकट भाषणाचा कार्यक्रम होता. काही कारणास्तव चित्रपटगृहात विजेची व्यवस्था नसल्याने मा. आप्पासाहेब चितळेंच्या घरातून कनेक्शन घेऊन तशी व्यवस्था केली होती. गुरुजींचे बौद्धिक ऐन रंगात आले असताना आप्पासाहेबांच्या मातोश्रीने नेमके वीजेचे बटन बंद केले आणि कार्यक्रमस्थळी संपूर्ण काळोख पसरला. गुरुजींनी मात्र आपल्या बौद्धिकात एका वाक्याचाही खंड पडू दिला नाही. फक्त आवाजाची पट्टी बदलली. गुरुजींचे प्रसंगावधान पाहून उपस्थित श्रेतागण भारावून गेला होता. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्या प्रसंगाची चर्चा होत होती.

कशी झाली संघकार्याची सुरुवात?

नाशिक हे सांस्कृतिक, धार्मिक व राष्ट्रवादी परंपरेचे केंद्र असल्याने संघाच्या कार्याला येथे लवकरच प्रतिसाद मिळाला. नाशिकमध्ये गोदावरी काठावरील भाग, पंचवटी परिसर व शैक्षणिक संस्थांमधून स्वयंसेवक संघटित झाले. १९४७ नंतर नाशिक जिल्ह्यातील तालुका व ग्रामीण भागात संघ कार्य पसरले. शाळा-महाविद्यालयातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी नियमित शाखा, उत्सव कार्यक्रम, व्याख्याने सुरू झाली. नाशिकमधील औद्योगिक व व्यापारी समाजातही संघाचे कार्यकर्ते प्रभावी झाले. १९७५ च्या आणीबाणीनंतर संघाचे कार्य आणखी जोमाने पुढे गेले. 1980 नंतर सेवा प्रकल्प, ग्रामीण भागातील शिक्षणवाढ, पूरग्रस्त मदत, आरोग्य शिबिरे यांत नाशिकच्या स्वयंसेवकांचा मोठा सहभाग दिसला.

‌‘गोळे कॉलनी‌’ नाव कसे पडले?

डॉ. मुंजे यांच्या ‌‘दि सेंट्रल मिलिटरी एज्युकेशन सोसायटी‌’चे रितसर सदस्य झाल्यानंतर डॉ. हेडगेवार कार्यकारी मंडळाच्या बैठकीसाठी दि. २१  व २२ मार्च १९३७ रोजी नाशिकला गेले होते. त्यादरम्यान तेथील एक वस्ती जिचे नाव हिंदू कॉलनी होते, तिच्या नामफलकावर डॉक्टरांची नजर पडली. ते नाव त्यांना खटकले. ते म्हणाले, “आपल्याच देशात एखाद्या वसाहतीला ‌‘हिंदू कॉलनी‌’ म्हणून नाव देणे योग्य नाही.” याचवेळी त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीचाही उल्लेख केला. त्यानंतर ती पाटी काढण्यात आली आणि आज ती वस्ती ‌‘गोळे कॉलनी‌’ म्हणून प्रचलित आहे.

(लेखातील संदर्भ हे ‌‘नाशिक संघ सरिता‌’ या पुस्तकातून साभार.)

Powered By Sangraha 9.0