1818 साली संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यापासून येथे इतिहास, समाज आणि संस्कृतीवर महत्त्वपूर्ण परिणाम झाले. ब्रिटिश प्रशासनाने केवळ राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत बदल केले नाही, तर इतिहासाचे पुनर्लेखन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्नही केला. इतिहासातील खरे संदर्भ दुर्लक्षित करून चुकीचे पुरावे आणि गैरसमज समाजात रुजविण्याचे काम झाले, ज्यामुळे समाजाला एकत्रित ठेवणाऱ्या प्रेरणांचा प्रभाव कमी झाला. या लेखातून ब्रिटिश व पुढील काही शासकवर्गांच्या हस्तक्षेपातून इतिहासाचे विकृतीकरण, त्यामागील हेतू आणि परिणाम यांचा सविस्तर मांडणी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याचा खरा इतिहास, त्यातील सांस्कृतिक व सामाजिक योगदान, आणि सत्य इतिहासाची पुनर्स्थापना करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांचा आढावा देखील घेण्यात आला आहे.
ब्रिटिशांनी केलेले विकृतीकरण
पण, ब्रिटिश इथेच थांबले नाहीत, तर ग्रॅण्ड डफ याने मराठ्यांचा शिवकालीन आणि 18व्या शतकातील इतिहास नव्याने लिहून काढला. या इतिहासाशी संबंधित अस्सल संदर्भ, पुरावे यांच्याकडे डोळेझाक करून त्याने ब्रिटिशांना हवा त्या पद्धतीने इतिहास लिहून काढला आणि अनेक विमर्श प्रस्थापित केले. स्वाभाविकच छत्रपती शिवाजी महाराज आणि 18व्या शतकातील मराठा साम्राज्य यांच्याविषयी अनेक गैरसमज संपूर्ण हिंदुस्थानात निर्माण झाले.
स्वातंत्र्यानंतरच्या अपेक्षा आणि वास्तव
वास्तविक 1947 साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासकीय पातळीवर यावर सखोल संशोधन होणे आवश्यक होते. परंतु, आपण भोंगळ धर्मनिरपेक्षतेच्या मागे लागलो. 1999 साली महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार स्थापन झाले. तब्बल 15 वर्षे त्यांनी राज्य केले. या काळात सरकारच्या राजाश्रयाने इतिहासविषयक विकृती पसरवण्याचे काम पद्धतशीरपणे करण्यात आले. हिंदू समाजात जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणे, हा त्यामागील एक उद्देश होता. मग एकामागून एक विकृत विमर्श प्रस्थापित करण्यासाठी छोट्या पुस्तिकांचे लेखन करून मोफत किंवा अगदी अल्प किमतीत त्यांचे वितरण केले गेले. मूळ संदर्भ जसेच्या तसे न देता सर्रास खोट्या पद्धतीने मांडले गेले.
नकारात्मक विमर्शांची उदाहरणे
यातील काही उदाहरणे आपण पाहूया. शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते; त्यांच्या सैन्यात 57 टक्के मुसलमान होते; संभाजी महाराजांच्या वधात ब्राह्मणांचा हात होता; शंभुराजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राह्मणांनी गुढीपाडवा सुरू केला.; अफझलखानाचा वकील ब्राह्मण होता, हे आवर्जून सांगणे, परंतु त्याचवेळी अफझलखानाकडे असलेले मराठे यांच्याकडे दुर्लक्ष करणे;मराठेशाही मराठ्यांची तर पेशवाई ब्राह्मणांची होती; ब्राह्मण महापुरुषांची बदनामी करणारे खोटे पुरावे; ‘छत्रपती घराणे विरुद्ध पेशवे’ असा संघर्ष, औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यासाठी त्याने मंदिरांना मदत केल्याचे खोटे पुरावे सादर करणे; रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचे दाखले देणे; मुघलांचा संघर्ष धर्माचा नाही तर राज्य विस्ताराचा होता, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे; शिवाजी महाराज गोमांस खात होते असे सांगणे; शिवाजी महाराजांनी अनेक दर्ग्यांना इनामे व वतने दिल्याचे खोटे पुरावे दाखविणे; टिपू सुलतान स्वातंत्र्यसैनिक होता असे भासविणे; अकबर महान आणि लोककल्याणकारी राजा होता हे सिद्ध करणे; स्वातंत्र्यवीर सावरकर माफीवीर होते असे सिद्ध करणे; इतिहासातील खलपुरुषांचे उदात्तीकरण करणे; हिंदुस्थानातील ब्राह्मण चुकीचे आणि मुसलमान देशभक्त आहेत अशी मांडणी करणे; जिजामातांनी दर्ग्यात नवस केला होता असे सांगणे; ज्ञानेश्वर माऊलींचे नाव न घेणे; शिवराज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध होता अशी मांडणी करणे; तुकारामांची हत्या ब्राह्मणांनी केली; संतांचे इस्लामीकरण करणे; आपला इतिहास हा पराभवाचाच इतिहास आहे अशी मांडणी करणे; आपण कधीच एक राष्ट्र नव्हतो तर आपण ‘नेशन इन मेकिंग’ आहोत अशी मांडणी करणे; आपण गुलाम होतो आणि ‘गुलाम’ हा एक धर्म असू शकत नाही; मुस्लीम सत्ताधाऱ्यांचे कलाक्षेत्रातील योगदान दाखविणे; आधुनिक भारताचे जनक मुघल होते हे सिद्ध करणे; समर्थ रामदासरचित दासबोधाची रचना बदलणे, अल्पसंख्य असल्यामुळे स्वसंरक्षणासाठी मुस्लीम आक्रमक होते असे सांगणे; भगवान श्रीराम आर्य होते आणि आर्य बाहेरून या देशात आले; 1818 साली कोरेगाव भीमा येथे पेशवे आणि महार यांच्यात लढाई झाली असे सांगणे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. ही सर्व विकृत विमर्श प्रस्थापित करणारी उदाहरणे पाहिली, तर त्यामागील अंतस्थ हेतू स्पष्टपणे लक्षात येतो.
राष्ट्रीय नायक आणि विभाजनकारी शक्ती
हिंदुस्थानच्या इतिहासातील एक तेजस्वी राष्ट्रनायक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. त्यांच्या इतिहासातून हिंदू समाजाला एकरस होण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच समाजाला विभाजित करण्याची मानसिकता असलेल्या लोकांनी शिवचरित्र आणि आपल्या वैभवशाली इतिहासाचे विकृतीकरण वरील विविध विमर्शांच्या आधारे सुरू केले. इतिहासाचा उपयोग सत्य सांगण्यासाठी करण्याऐवजी सत्य लपविण्याकडे होऊ लागला. इस्लामी राज्यकर्त्यांनी हिंदू प्रजेवर केलेल्या अत्याचारांची वर्णने लपविली जाऊ लागली.
मार्क्सवादी आणि इस्लामी इतिहासकारांची घातक युती
या इतिहासाच्या विकृतीकरणात आधीपासूनच काम करणारे आणि स्वतःला मार्क्सवादी म्हणविणारे शिरले. आता इस्लामचे उदात्तीकरण करणारे इतिहासकार आणि मार्क्सवादी यांची घातक युती झाली. ‘मनुष्याच्या शरीराला शस्त्राने मारले जाऊ शकते, पण त्याची प्रज्ञा संपविली, तर तो संपूर्ण नष्ट होतो,’ अशा प्रकारचा मार्ग या मंडळींनी अवलंबिला. हिंदू देवदेवतांच्या मूत मशिदींच्या पायऱ्यांमध्ये घातल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असतानाही ते समोर आणले गेले नाहीत. यासंदर्भात ज्येष्ठ इतिहास संशोधक गजाभाऊ मेहेंदळे यांनी त्यांच्या पुस्तकात विवेचन केले आहे. त्याप्रमाणे, सत्य लपविणे, असत्य सांगणे, मुळात नसलेला मजकूर अनुवादात घुसडणे, मुळातला विषयाला धरून असलेला मजकूर अनुवादातून गाळणे, हेतुपुरस्सर चुकीचा अनुवाद करणे, अशी खोटारडेपणाची शेकडो उदाहरणे या नामवंत इतिहासकारांनी लिहिलेल्या तथाकथित इतिहासांमध्ये आढळतात. जे कोणी त्यांच्या या कंपूत सामील होणार नाहीत, त्यांना colonial, communal, nationalistic अशी शेलकी विशेषणे लावली जातात. या कंपूत अनेक पाश्चात्य लेखकही आहेत; पण त्यांची दखल घ्यावी एवढे महत्त्व त्यांना नाही. खोटेपणाच्या या साथीत पाठ्यपुस्तकेही बळी पडली आहेत. नमुन्यादाखल अगदी अलीकडचे एक उदाहरण देतो. छरींळेपरश्र उेपलळश्र ेष एवलरींळेपरश्र ठशीशरीलह रपव ढीरळपळपस (छउएठढ)ने इयत्ता बारावीकरिता तयार केलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील Even when temples where destroyed during war, grants were later issued for their repair - as we know from the reigns of Shah Jahan and aurangzeb या विधानाचा आधार काय, असा प्रश्न शिवांक वर्मा यांनी विचारला असता, The information is not available on the files of the Department असे उत्तर त्यांना छउएठढ कडून देण्यात आले. कशी असणार! पाठ्यपुस्तकातील विधान निराधार आहे, किंबहुना धादांत खोटे आहे.
आक्रमकांचे उदात्तीकरण आणि वास्तव इतिहास
औरंगजेब आणि टिपू यांच्यासारख्या जुलमी आक्रमकांचे उदात्तीकरण करणे आणि त्याचवेळी हिंदू समाजातील दोष प्रकर्षाने दाखविणे, हा या खटाटोपामागील उद्देश आहे. अनेकवेळा राजाश्रयातून मिळालेल्या पैशांच्या लालसेपायी विकृत विमर्श प्रस्थापित करण्याची चढाओढच लागली होती. तेव्हा यासंदर्भात सत्य पुढे येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक झाले. अशा वेळी समाजातील अनेक संस्था आणि इतिहासप्रेमींनी सत्य इतिहास पुढे आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. ते सत्य हे आहे की, शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म, हिंदू समाज, हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठीच आपले राज्य स्थापन केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्यांनी स्थापन केलेल्या व्यवस्थांच्या आधारेच आमच्या स्वराज्याचे औरंगजेबाच्या आक्रमणापासून रक्षण होऊ शकले. या स्वराज्याचे लवकरच एका विशाल साम्राज्यात रूपांतर झाले आणि त्यामुळेच इस्लामी राजवटींच्या काळात होणारे हिंदू समाजावरचे अनेक प्रकारचे अन्याय-अत्याचार थांबले. नेमकेपणाने सांगायचे झाले, तर युद्धकैद्यांच्या कत्तली थांबल्या, शेतकऱ्यांच्या बायका-मुलांची विक्री बंद झाली, जिझिया कर रद्द झाला, देवळांचा विद्ध्वंस थांबला, पाडलेली मंदिरे पुन्हा उभी राहिली, आम्हाला परदेशात गुलाम म्हणून नेऊन विकणे बंद झाले, धर्मांतराला आळा बसला, अशी अनेक उदाहरणे आहेत. यामधील ‘हिंदू समाज’ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये पारंपरिक हिंदूंबरोबरच जैन, बौद्ध आणि शीख यांचाही समावेश केला आहे, तोच अपेक्षित आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केले आणि त्यातून एक साम्राज्य निर्माण झाले, त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे इस्लामी सत्तांचा नाश झाला. या साम्राज्याने भारताला इस्लाममय करण्याचे इतिहासाचे कालचक्र उलटवून लावले आणि त्याचवेळी देशाच्या विविध भागांत राहणाऱ्या लोकांना सांस्कृतिक साखळीने जोडले. म्हणूनच विभाजनवादी शक्ती आणि व्यक्ती आज भारताला कमकुवत करण्यासाठी इतिहासातील सत्य लपवून असत्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यांनी एक प्रकारे विमर्शाचे युद्धच सुरू केले आहे. त्यासाठी आपल्याला इस्लामी राजवटींचा आणि इंग्रजांच्या कूटनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचवेळी सकारात्मक विमर्शही प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांची संस्कृत मुद्रा व त्याचा अर्थ, ब्रिटिश पूर्वकाळातील भारतातील शिक्षणपद्धती, ब्रिटिशपूर्व काळातील स्वयंपूर्ण गावे, हिंदुत्व संविधानाला पूरक आहे, हिंदू संस्कृती विज्ञानवादी आहे, शिवरायांचे परावर्तनाचे काम, मराठेशाहीत कला संस्कृती आणि कलाकार यांना मिळालेले प्रोत्साहन, संतांचे योगदान, आपला इतिहास केवळ पराभवाचा नसून शौर्याचाही आहे, ‘राष्ट्र’ संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, इंग्रजांनी हिंदुस्थान मुसलमानांकडून नाही, तर हिंदूंकडून घेतला, इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर झाला आहे, तत्त्वज्ञान पटले म्हणून नाही इत्यादी इत्यादी.
देशानुकूल आणि युगानुकूल चिंतन आवश्यक
‘विचार आणि प्रचार’ या विषयात अजून खूप काम हिंदू समाजाने सामूहिकरित्या करण्याची गरज आहे. आमचे चिंतन पाश्चात्य देशांच्या नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या आधारावर झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला ‘स्व’ जाणून घेण्याची आवश्यकता आहे. समाजातल्या सज्जन शक्तींनी सक्रिय होण्याची गरज आहे. हिंदू समाजातील शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध यांच्यामध्ये अनेक नैसर्गिक समानता आहेत. त्या प्रकर्षाने मांडण्याची गरज आहे. देशानुकूल आणि युगानुकूल गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. पंडित दीनदयाळजींच्या म्हणण्यानुसार, जे देशाबाहेरचे आहे, ते देशानुकूल करणे आणि जे देशातील आहे, ते युगानुकूल करणे आवश्यक आहे.
- सुधीर थोरात
(लेखक श्री शिवशंभू विचार मंचचे महाराष्ट्र राज्य संयोजक आहेत.)