संघ आणि मुंबई : आठवणींचा प्रवास

01 Oct 2025 15:22:01
केशवसृष्टी, उत्तन (भाईंदर) येथे सन २००० रोजी ‌’विश्व संघ शिबीर‌’ संपन्न झाले. तेव्हा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांना ‌’विदेशात होत असलेल्या संघकार्याच्या प्रदर्शनीची माहिती देताना तेव्हाचे शिबीर कार्यवाह ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीत नेहमीच आचार, विचार आणि कृती यांचा संगम दिसून येतो. मात्र, संघाच्या कार्याचा इतिहास, विशेषतः एखाद्या ठिकाणचा तपशीलवार प्रवास, अधिकृतपणे लिहून ठेवण्याची परंपरा फारशी आढळत नाही. यामुळेच मुंबईसारख्या विविधतेने समृद्ध, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातील संघकार्याचा मागोवा घेणे, ही एक रंजक आणि एकाचवेळी महत्त्वाची जबाबदारी ठरते. हा लेख म्हणजे मुंबईतील संघकार्याच्या प्रवासाची एक अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न नोंद म्हटल्यास हरकत नाही. १९३४ पासून सुरू झालेल्या या कार्याचा मागोवा घेताना केवळ शाखांची वाढ किंवा प्रमुख नेत्यांची नावेच नव्हे, तर त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा संघकार्यावर झालेला परिणाम, त्यातून तयार झालेली संघटनात्मक उभारणी आणि कार्यकर्त्यांची जिद्द हे सारे समोर येते. ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या आठवणी, ऐतिहासिक संदर्भ आणि कालानुरूप बदलत गेलेली कार्यपद्धती यांचे हे संकलन म्हणजे केवळ भूतकाळाचा दस्तऐवज नसून वर्तमान व भविष्यासाठी प्रेरणादायी ठरावे, हाच उद्देश...

संघामध्ये आपल्या कामाचा इतिहास लिहून ठेवायची फारशी प्रथा नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणचा गेल्या १०० वर्षांतील संघकार्याचा तपशील म्हणाल, तर सहजपणे वाचकांसमक्ष मांडणे तसे कठीणच. मुंबईत संघकार्य कसे उभे राहिले, याचा जेव्हा अभ्यास करायची वेळ आली, तेव्हा अनेक जुन्या स्वयंसेवकांच्या भेटीगाठी आणि तसेच काही दुमळ संदर्भग्रंथ उपयोगी आले. गेल्या दहा-बारा वर्षांतील मुंबईतल्या संघकार्याबाबत अनेकांना ठावूकही असेल. मात्र, मुंबईत संघकार्याला खरी सुरुवात झाली, ती १९३४ पासून. मुंबईत संघकामाचा इतिहास घडविणाऱ्यांमध्ये दादा नाईक, प्रल्हादजी अभ्यंकर, मधुकरराव मोघे, मुकुंदराव दामले, शिवराय तेलंग आणि गोपाळराव येरकुंटवार अशा अनेकांची नावे प्रामुख्याने घेता येतील.

मुंबईत जेव्हा संघकार्याला सुरुवात झाली, तेव्हा देशभर इंग्रजांविरुद्धचे वातावरण तापू लागले होते. मुंबईमध्ये पहिली संघशाखा सुरू झाली ती १९३४ साली. प्रचारक गोपाळराव येरकुंटवार हे मुंबईला आले असता, त्यांनी संघाची पहिली शाखा सॅण्डहर्स्ट रोड (आता सरदार वल्लभभाई पटेल रोड) वरील मारवाडी विद्यालयाच्या पटांगणात सुरू केली. १९४२ साली गोवालिया टँक येथे ‌‘चले जाव‌’ चळवळीचा पुकारा झाला. ‌‘भारत छोडो‌’ किंवा ‌‘चले जाव‌’ चळवळ सुरू झाली. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची सभादेखील तेव्हा झाली होती. त्याच रात्री इंग्रज सरकारने काँग्रेसच्या सर्व नेत्यांना स्थानबद्ध केले आणि विविध तुरुंगांत पाठविले. गोवालिया टँकच्या सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवकही गेले होते. अनेक भूमिगत काँग्रेस नेत्यांना तर संघस्वयंसेवकांनी आपल्या घरात आश्रय दिला होता.

संघावर पहिली बंदी लागली, ती दि. ३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या गांधीहत्येमुळे. दि. ४ फेब्रुवारी १९४८ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सरकारने संघावर बंदी घातली. सुमारे दीड वर्षाने ही बंदी उठवण्यात आली. बंदी उठल्यानंतरचा १९६५ पर्यंतचा कालखंड पाहिला, तर हा कठीण कालखंड आहे. संघबंदीची झळ अनेक संघस्वयंसेवकांना बसली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या; पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत मुंबईतील स्वयंसेवकांनी आपली कंबर कसून नव्या जोमाने संघकार्य उभे करण्यास सुरुवात केली. एकेक करत मुंबईत ठिकठिकाणी शाखा सुरू झाल्या. या कालखंडात प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या रूपाने एक समर्थ नेतृत्व मुंबईला लाभले. हसत-खेळत, नर्मविनोद करीत, अत्यंत मार्मिक भाष्य करीत कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरित केले आणि उत्साहात ठेवले.

मुंबईतील संघकार्य पाहिले, तर ते कधीच संघचालककेंद्रित किंवा प्रचारककेंद्रित अशा स्वरुपाचे नव्हते, तर ते एकाअथ व्यवसायी स्वयंसेवककेंद्रित होते. कारण, खुद्द द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी म्हणायचे की, “मुंबई शहर हे विशाल असून तेथे सर्व जमातींचे, मतांचे असे सर्वप्रकारचे लोक राहतात, त्यामुळे ते शहर एखाद्या विचित्र वस्तुसंग्रहालयासारखे भासते.” अनेक चढाओढींवर मात करत दादा नाईक यांनी मुंबईत संघाच्या कामाला सुरुवात केली. शाखा भरवण्यासाठी संघस्थान पाहिजे, म्हणून जागेची व्यवस्था केली. सुरुवातीला फक्त २० असलेली स्वयंसेवकांची संख्या सहा वर्षांत १ हजार, ५०० वर गेली. पुरुषांबरोबरच मुंबईच्या संघकामात स्त्रीशक्तीचा सहभागही अतिशय मोठा आहे. खरं तर स्वयंसेवकांच्या घरातील स्त्रीवर्ग कुठे फारसा दिसत नाही. त्या सर्वांचे कार्य सीता, सावित्र, द्रोपदी, जिजाऊ, रमाबाई आणि सावित्रीबाई यांच्या परंपरेतील आहे. ही परंपरा आपल्या पतीच्या कामाशी एकरूप होण्याची आहे.

१९व्या शतकाच्या अखेरीस व २०व्या शतकाच्या सुरुवातीस मुंबई कापड उद्योगाचे केंद्र बनले. शेकडो गिरण्या उभ्या राहिल्या आणि लाखो कामगार त्यात नोकरी करू लागले. कामाचे तास लांब, मजुरी कमी, आरोग्याच्या सोयी अपुऱ्या अशा कठीण परिस्थितीत कामगार काम करत होते. दि. १८जानेवारी १९८२रोजी डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी संप पुकारला. योग्य वेतनवाढ, बोनस व भत्ते, कामगारांच्या हक्कांचे रक्षण या तीन प्रमुख मागण्या गिरणी कामगारांनी मांडल्या होत्या. अंदाजे अडीच ते तीन लाख कामगार या संपात सहभागी झाले होते. हा संप १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालला.

मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हा मुंबईच्या इतिहासाला मूलगामी वळण देणारा बिंदू आहे. या संपामुळे मुंबईतील कापड उद्योग बंद झाला. एके काळी कापड उद्योग मुंबईचा आर्थिक कणा होता, तोच या संपामुळे मोडला. कापड उद्योगावर अवलंबून असलेले परिवार देशोधडीला लागले. हा संप भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासातील एक मोठा आणि निर्णायक टप्पा मानला जातो. याचा फटका मुंबईतील संघकामालाही बसला, कामगार क्षेत्रातील संघकामावर याचा विपरीत परिणाम झाला. असंख्य संघकार्यकर्ते कापड उद्योग बंद झाल्यामुळे पर्यायी नोकऱ्यांच्या शोधात ठिकठिकाणी विखुरले गेले.

गिरणगाव म्हणजे हिंदुस्थानची छोटी प्रतिकृतीच. सर्व भाषिकांचे हक्काचे स्थान. कामाठीपुरा-वरळीचे तेलुगू, डिलाईल रोडचे आजरा-गडहिंग्लजचे करवीरवासीय, शिवडी-प्रभादेवीचे उत्तर भारतीय, धारावीचे तामिळ-मल्याळी, परळ-प्रभादेवीचे मूळ निवासी चौकळशी-पांचकळशी, वरळी-प्रभादेवीचा भंडारी, आग्रीपाडा-सनमिल गल्लीतील चर्मकार, माझगावपासून चेंबूरपर्यंत पसरलेला आगरी मच्छीमार संघात दिसेच. सर्वत्र पसरलेला कोकणी माणूस तर मुंबई संघाचा कणाच! तेव्हा बी. आय. टी. चाळीजवळच्या मैदानात संघाची शाखा भरत असे. इथल्या आग्रीपाड्यात साधारण १९३८च्या सुमारास संघकाम सुरू झाले. वस्ती कामगारांची असल्याने येथे सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र नांदत असत. सुरुवातीला अन्य धमयांचा शाखेला विरोध व्हायचा, मात्र तोही कालांतराने कमी होत गेला. कालांतराने आग्रीपाड्याबरोबरच नागपाडा, कामाठीपुरा, बेलासिस रस्ता, भायखळा, महालक्ष्मी आणि सध्याचा ना. म. जोशी मार्ग येथील परिसर संघमय होत गेला. इथल्या शाखांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभात, सायंशाखेप्रमाणेच रात्र किंवा अतिरात्र शाखादेखील येथे नियमित लागायच्या. अतिरात्र शाखा म्हणजे काय, तर ज्यांना प्रभात किंवा रात्र शाखा जमत नसे, असे स्वयंसेवक अतिरात्र शाखेवर येत असत आणि नंतर आपापल्या घरी जात. मुंबईत संघाचे काम सुरू झाल्यानंतर चार ते पाच वर्षांत मध्य मुंबईत संघाचा चांगला विस्तार झाला.

मुंबईला भला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे मुंबईत मच्छीमारांची लोकसंख्यादेखील बऱ्यापैकी होती. माहीमसारख्या परिसरातच तेव्हा साधारण ५० ते ६० हजार मच्छीमार बांधवांची वस्ती होती. त्यांचा कधी संघाशी फारसा संबंध आला नव्हता. इथल्या स्थानिकांशी चर्चा, विचार विनिमय झाल्यानंतर १९७८-१९७९च्या काळात मच्छीमारांची पहिली शाखा सुरू झाली. प्रतिसाद इतका चांगला मिळत होती की, ४० दिवसांतच जवळपास ३६ गट तयार झाले. दररोज शाखा लागायला लागली. शाखेवर १५० ते १७५ उपस्थिती हमखास असायची. जर संघाची एक शाखा चांगली चालली, तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिस्थितीवरही नक्कीच पडत, हे चित्र तेव्हा दिसून आले. मच्छीमार समाजाची शाखा अशीच एक शाखा होती.

सुरुवातीच्या काळात संघसंस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार आणि पू. श्रीगुरुजींचा मुंबईला प्रवास व्हायचा. एक प्रसंग असा होता की, ठाणे येथे डॉ. हेडगेवारांसोबत एक बैठक बोलवण्यात आली होती. डॉक्टरांनादेखील या बैठकीस मुंबईहून वेळेवर पोहोचायचे होते. मुंबईतील आधीच्या बैठकीत नेमका त्यांना उशीर झाला; त्यामुळे त्यांची शेवटची लोकलसुद्धा चुकली. एकीकडे हा प्रसंग उद्भवला आणि दुसरीकडे ठाण्यातील स्वयंसेवकसुद्धा वाट पाहात होते. त्यामुळे डॉ. हेडगेवारांनी थेट एका ट्रकमध्ये उभे राहून मुंबई ते ठाण्यापर्यंतचा प्रवास केला आणि बैठकीला उपस्थिती लावली होती. तिथून ते कल्याणला गेले आणि सकाळी भुसावळच्या दिशेने प्रवास सुरू केला. अशा पद्धतीने मुंबईचा प्रवास त्यांचा वरवर होतच राहायचा. एप्रिल 1939 साली त्यांनी शेवटचा मुंबई प्रवास केला. संघावरील बंदी उठवल्यानंतर दि. 26 जुलै 1949ला श्रीगुरुजींनी मुंबईत आयोजित सार्वजनिक सभेला संबोधित केले होते. तेव्हा जवळजवळ दहा ते 12 हजार स्वयंसेवक आणि नागरिकवर्ग कार्यक्रमाला उपस्थित होता.

मुंबई जिल्ह्यातील संघशिबिरांचा पूवचा आढावा घेतला, तर १९४३, १९४४, १९४५या काळात वडाळा येथे हेमंत शिबिरे झाली. १९४६रोजी हे शिबीर सध्याच्या अंधेरीच्या भवन्स कॉलेज कॅम्पस परिसराच्या ठिकाणी झाले होते. या शिबिराला प. पू. श्रीगुरुजींनी भेट दिली होती. तेव्हा त्यांचा बौद्धिक वर्गसुद्धा झाल्याची माहिती आहे. 1947 रोजी स्वातंत्र्यानंतरचे पहिले शिबीर बोरिवली येथे झाले होते. फाळणीनंतरचे दिवस असल्याने शिबीर मुंबईत घ्यायचे नाही, असा सरकारी आदेश होता. त्यामुळे ते मुंबईबाहेर ठाणे जिल्ह्यात घ्यायचे ठरले. बोरिवली उपनगरात ठरल्याप्रमाणे शिबीर भरले आणि संपूर्ण गणवेशात सघोष सात मैल संचलन करीत बोरिवली स्थानकावर येऊन शिबिराची सांगता झाली. या शिबिराला मा. बाबाराव भिडेदेखील उपस्थित होते. त्यानंतर क्रमाक्रमाने १९५९ते १९६३पर्यंत गोवंडी स्थानकाजवळील घाटले गावात ही शिबिरे झाली.

जून १९७५ ते ७७ हा आणीबाणीचा काळ होता. संघावर बंदी आल्यानंतर संपूर्ण देशभरात संघाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. काही दिवसांनी ‌‘जेल भरो आंदोलन सत्याग्रह‌’ सुरू झाला. त्याची योजना ‌‘पद्मश्री‌’ रमेश पतंगे, विमल केडिया आणि अन्य ज्येष्ठ कार्यकर्ते करीत होते. दहा ते १५सत्याग्रहींनी सत्यग्रह न करता प्रचंड गदमध्ये मिसळायचे व अचानक घोषणा द्यायच्या आणि लगेच मिळेल ते वाहन पकडून दुसरीकडे जाऊन पुन्हा तेच करायचे, अस काहीसा क्रम चालायचा. पुढे जनजागृतीसाठी तोच प्रयोग संध्याकाळी ७ वाजेनंतर (रात्री) वेगळ्याच पद्धतीने चाले. इतकेच नव्हे, तर जे स्वयंसेवक-संघकार्यकर्ते पोलिसांच्या रडारावर होते, स्वतःच्या घरी न राहता, आठ-आठ दिवस घरे बदलून राहायचे. कोणी ओळखू नये, म्हणून थोड्या थोड्या अंतरावर दाढी-मिशी बदलायची, टोप्या बदलायच्या, वावरण्याचा परिसर बदलायचा, असे बरेच उद्योग तेव्हा चालायचे.

रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात मुंबईभर शिलापूजनाने कार्यक्रम झाले होते. ज्या शिला जमा झाल्या, त्या दोन ट्रकांमध्ये भरून अयोध्येला पोहोचवण्यात आल्या. शिला अयोध्येत पोहोचवणाऱ्या रामसेवकांचे वाटेत ठिकठिकाणी प्रचंड स्वागत झाले. अयोध्येत नृत्यगोपालदास महाराजांच्या आश्रमात शिला उतरवण्यात आल्या. या प्रवासातील काही भाग हा चंबळ खोऱ्यातून होता. रात्रीच्या वेळी तेथून प्रवास करू नका, अशा सूचना तेव्हा लोकांनी केल्या होत्या. परंतु, तरीही श्रीरामावर भरोसा ठेवून आणि सशस्त्र पोलिसांच्या पहाऱ्यात रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत प्रवास करून शिला सुखरूपपणे अयोध्येत पोहोचवल्या गेल्या. गंभीर म्हणजे, रामसेवक सांगतात की, त्या प्रवासात ठिकठिकाणी मुडदे झाडावर लटकलेले दिसत होते!

सन १९३४ नंतर वर्षभरात जेव्हा गिरगाव परिसरात अनेक ठिकाणी शाखा सुरू झाल्या व त्या जोमाने वाढू लागल्या, त्यामुळे मुंबईत संघाचे कार्यालय असण्याची गरज भासू लागली. तेव्हा १९३५ साली मंगळदास वाडीत एका एकमजली इमारतीत पहिल्या मजल्यावरची जागा भाड्याने घेण्यात आली. १९३५ ते १९४० या कालखंडात संघसंस्थापक डॉ. हेडगेवार अनेकदा या कार्यालयात आले. या ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. १९४० साली डॉ. हेडगेवारांच्या निधनानंतर गोळवलकर गुरूजी सरसंघचालक झाले. त्यांचे आणि अर्थातच नंतरच्या प्रत्येक सरसंघचालकांचे या वास्तूत येणे झाले. संघकार्याच्या रचनेनुसार मुंबई हे आधी जिल्हा व नंतर महानगर झाले. ही वास्तू ‌‘नाझ‌’ या चित्रपटगृहाच्या बरोबर समोरच असल्यामुळे या कार्यालयाला ‌‘नाझ कार्यालय‌’ कालांतराने म्हटले जाऊ लागले. १९८० च्या दशकात दादरचे ‌‘पितृछाया कार्यालय‌’ आणि १९९० च्या दशकात परळचे ‌‘यशवंत भवन‌’ ही कार्यालये निर्माण झाली. या काळात मुंबई महानगराचा विस्तार उपनगरांमध्ये अफाट पसरत गेला होता. २०००च्या दशकात ‌‘नाझ कार्यालया‌’ची इमारत फारच जीर्ण झाली होती. त्यामुळे कार्यालय आता बंद करावे का, असाही विचार अनेकांच्या मनात तेव्हा आला. मात्र, डॉ. हेडगेवार यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली एकमेव वास्तू मुंबईत असल्याने तिचे नूतनीकरण, पुनरुज्जीवन करायचे ठरले. त्यानुसार दि. १५ ऑक्टोबर या दिवशी ललिता पंचमीच्या शुभ मुहूर्तावर नवनिर्मित ‌‘नाझ कार्यालया‌’चे उद्घाटन झाले व त्याचे ‌‘साकेत कार्यालय‌’ या नावाने नामकरणदेखील झाले.

मगाशी परळच्या ‌‘यशवंत भवन‌’ कार्यालयाचा उल्लेख झाला. खरं तर ‌‘यशवंत भवन‌’ ही दोन मजली भव्य इमारत मूळतः डी. के. फोमन हायस्कूल या नावाने ओळखली जाणारी एक शाळा होती. या इमारतीत आठ वर्गखोल्या, एक सभागृह, एक लहान कार्यालय आणि तात्पुरती प्रयोगशाळा होती. जवळजवळ मोडकळीस आलेली. अगदी कोसळण्याच्या स्थितीत असलेली ही इमारत तब्बल ३३ वर्षे शिक्षण देत उभी होती. १९८५ साली समाजपरिवर्तनाची इच्छा असलेल्या काही स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. विद्याथ प्रगती करत असतानाच इमारत मोडकळीस आलेली राहिली. तरीही नवीन व्यवस्थापनाने निधीवर अतिरिक्त ताण येत असूनही दुरुस्तीचे काम सुरू ठेवले. विकास योजना आणि इमारतीची दुरुस्ती यांमध्ये तोल राखत त्यांनी संकटांचा सामना केला. अखेर व्यवस्थापनाला शाळेची इमारत मालकीहक्काने घेण्याची संधी मिळाली. यातूनच ‌‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन संस्था‌’ या नव्या संस्थेची स्थापना झाली. निधी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा निर्धार आणखी बळकट झाला आणि सर्वांनी मिळून भव्य इमारतीचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शेवटी हे स्वप्न साकार झाले आणि ‌‘यशवंत भवन‌’ उभारले गेले. या इमारतीचे उद्घाटन सरसंघचालक के. सुदर्शनजी यांच्या हस्ते झाले. सध्या या इमारतीला सुमारे २३ वर्षे पूर्ण झाली असून येथे विविध महत्त्वाची केंद्रे कार्यरत आहेत.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील एक आठवण म्हणजे, पू. डॉ. हेडगेवारांना अभिवादन करणारी एक ऐतिहासिक सभा या मैदानात झाली होती. डॉक्टरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबईत व्यापक संपर्क झाला होता. संघसंस्थापकांचे नाव घरोघरी पोहोचले होते. अशी माहिती आहे की, सेवाकार्यासाठी मुंबईतून एक कोटीहून अधिक रक्कम जमवली गेली होती. डॉ. हेडगेवारांचे जन्मशताब्दी वर्ष यशस्वी करण्यासाठी भाजप, ‌‘भारतीय मजदूर संघ‌’, ‌‘अखिल भारतीय विद्याथ परिषद‌’, ‌‘विश्व हिंदू परिषद‌’ इत्यादी सर्व संघटनांचा मोठा हातभार तेव्हा लागला होता. मध्यंतरी ‌‘कोविड‌’ काळातसुद्धा अनेक स्वयंसेवकांनी ‌‘कोविड योद्धा‌’ म्हणून भूमिका पार पाडली होती. आज मुंबईत संघाचे कार्य प्रचंड प्रमाणात वाढले असून नवनवीन स्वयंसेवक संघाशी, संघकामाशी आणि एकाअथ राष्ट्रसेवेत जोडले जात आहेत, ही आनंदाची बाब आहे. आठवणी बऱ्याच आहेत आणि निश्चितच त्या प्रत्येक स्वयंसेवकाजवळ असतील, परंतु शब्दमर्यादेच्या अभावी तूर्त विराम देण्याची अनुमती द्यावी.

संकलन : ओंकार मुळ्ये
(लेखातील काही संदर्भ हे ‌‘मुंबई संघ सरिता‌’ या पुस्तकातून घेण्यात आले आहेत.)

Powered By Sangraha 9.0