
मुंबई: मागचे काही दिवस महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांत ओला दुष्काळ पडला आहे. मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नद्यांना पूर आल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अनेक नागरीकांच्या जीवनावश्यक वस्तू तसेच घरादाराचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. तर या सगळ्या पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने स्वतः मदत करत चाहत्यांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.
संकर्षणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, त्या तो म्हणाला की, नमस्कार माझं नाव संकर्षणकऱ्हाडे, मी मराठवाडा परभणीचा आहे. हा व्हिडिओ मी अत्यंत काळजीने, जबाबदारीने आणि तळमळीने करतोय. मी गेल्या काही दिवसात बातम्यांमध्ये, व्हाट्सअपवगैरे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मराठवाड्यातली पूर परिस्थिती पाहतोय. ज्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या पिकांमध्ये कंबरे एवढं पाणी शिरलंय. ज्यामध्ये सोयाबीन, कापूस यांसारखी बऱ्याच प्रकारची पिकं आहेत. ती सगळी वाया गेलेली आहेत. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निघून गेलेला आहे. हे सगळं फार क्लेशदायक आहे.
आता मी मुंबईत राहून तिथे येऊन काही मदत करू शकत नाही त्यामुळे मी आज सकाळी परभणी मधल्या जिल्हाधिकाऱ्यांशी म्हणजेच कलेक्टर साहेबांशी बोललो. त्यांनीही तितक्याच तत्परतेने तात्काळ मला एक नंबर दिला. मी माझ्या परभणीसाठी फुल न फुलाची पाकळी मराठवाड्यासाठी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ जेवढे लोक पाहत असतील, मग ते माझ्या क्षेत्रातले असो किंवा जगभरातले कोणताही क्षेत्रातले मराठी माणूस असतील त्याला जर वाटलं माझ्या मराठवाड्यासाठी मदत करावी तर त्यांनी नक्की करा.
यातून नक्कीच त्यांना एक प्रकारची उभारी मिळेल, धीर मिळेल. राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा तर माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही संयम सोडू नका. हे म्हणणं सोपं आहे पण लेकरासारखा वाढवलेलं पीक जेव्हा नेस्तनाबूत होतं तेव्हा काय वाटू शकतं याची मला कल्पना आहे. तुम्ही थोडा संयम ठेवा, तुमच्या जीवाचं काहीच बरं वाईट करून घेऊ नका. तुम्ही तसं करून घेतलं तर तुम्ही पिकवलेलं अन्न आम्हाला गोड लागणार नाही. तुम्ही संयम ठेवा सगळं काही चांगलं होईल. तुम्ही बांधावर बसा, वाहणाऱ्या पाण्याकडे बघा पुढच्या वर्षी हेच पाणी तुम्हाला साथ देईल, त्रास देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे. हा व्हिडिओ ज्यांच्या पर्यंत पोहोचेल त्यांनी कलेक्टर साहेबांनी दिलेल्या अकाउंट नंबर वर तुम्हाला जमेल तेवढी मदत करा. मी माझ्याकडून पाठवत आहे. माझा मराठवाडा, माझी परभणी.... थोडी तळमळ आहे , पण सगळं चांगलं होईल. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.
याशिवाय ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या टीमनेही मोठी मदत जाहीर केली आहे.
अद्वैत थिएटर निर्मित ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हया नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग २७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर ,पुणे येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला आणि विशेष म्हणजे निर्माते राहुल भंडारे आणि नाटकाच्या टीम कडून अवकाळी पाऊस परिस्थिती मुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून १,००,०००/- रुपयांची कर्तव्य रूपी मदत जाहीर केली .आणि लवकरच ही मदत महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त करण्यात येईल. नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील कलाकार देखील शेतकरी आहेत
अभिनेता श्रेयस राजे आणि त्याच्या मित्रांनी मिळून पूरग्रस्तांसाठी मदत सुरु केली आहे.
त्याने पोस्ट करत लिहिलं आहे,
“महाराष्ट्रातल्या आपल्या बांधवांना मदतीचा हात देऊया!
बीड, सोलापूर, धाराशिव ह्याठिकाणी आलेल्या भयंकर पुरातून सावरण्यासाठी तिकडच्या बांधवांना आपल्या मदतीची नितांत गरज आहे. सरकारी यंत्रणा काम करतेच आहे. पण नागरिक म्हणून त्यांना मदत करणं हे आम्ही आपलं कर्तव्य समजतो. कृपया जास्तीत जास्त मदत करून पूरग्रस्त बांधवांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करूया. आपली छोटीशी मदत खूप मोठा आधार बनू शकते! व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टी मदतकेंद्रावर पोचवणं शक्य नसल्यास आणि तुम्हाला जमेल तितकी आर्थिक मदत करण्याची इच्छा असल्यास व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या QR code चा वापर करा. तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीचा पूरग्रस्तांसाठी योग्य पद्धतीने वापर केला जाईल ह्याची ग्वाही देतो. धन्यवाद!!”
अभिनेता सौरभ चौघुलेने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
कल्याणमधील अखिल भारतीय नाट्य परिषदतर्फे कलाकार मदत करणार आहेत. व्हिडीओत सौरभ म्हणतो,
"नमस्कार, आज मी तुमच्यासमोर एका कारणासाठी आलोय. ते कारण म्हणजे सोलापूर, बीड, मराठवाडा या ठिकाणी झालेल्याअतिवृष्टीसंदर्भात... मराठवाड्यातील शेतकरी बांधवाला आज आपली गरज आहे. तिथे त्यांचं खूप नुकसान झालंय. त्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेतील कलाकार ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम सुरू केली आहे. २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत तुम्ही सहखुशीने त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तुम्ही पाठवू शकता. अत्रे मंदीर येथे संध्याकाळी ४ ते ८ वाजता सगळे कलाकार असणार आहेत. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी मदत तिकडे येऊन नक्की करा. आज आपल्या शेतकरी बांधवाला आपली गरज आहे. त्यासाठी आपण उभं राहणं खूप गरजेचं आहे".