स्वदेशी पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानासाठी भारतीय कंपन्यांची बोली; माजी ब्रह्मोस प्रमुखांच्या समितीकडे मूल्यांकनाची जबाबदारी

01 Oct 2025 18:17:10

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) च्या महत्त्वाकांक्षी ‘अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एएमसीए) या स्वदेशी पाचव्या पिढीच्या लढाऊ विमान प्रकल्पासाठी अनेक भारतीय कंपन्यांनी आपली बोली सादर केली आहे. या प्रकल्पासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत ठरविण्यात आली होती.

सुमारे १५,००० कोटी रुपयांचा हा डिझाइन आणि विकास प्रकल्प असून, संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीने गेल्या वर्षी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने त्यास मंजुरी दिली होती. या प्रकल्पाचे मूल्यांकन माजी ब्रह्मोस एरोस्पेस प्रमुख ए. शिवथानू पिल्लई यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. समिती आपला अहवाल व शिफारसी संरक्षण मंत्रालयाला सादर करेल, त्यानंतर अंतिम भागीदार निश्चित केले जातील.

या प्रकल्पात लार्सन अँड टुब्रोने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत भागीदारी केली असून, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने इतर खासगी क्षेत्रातील कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. देशातील सर्वात मोठी एरोस्पेस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने देखील आपली बोली सादर केली आहे.

संरक्षण मंत्रालय व डीआरडीओ यांच्याकडून या प्रकल्पावर काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. संरक्षण सचिव स्वतः एडीए (एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी) सोबत जवळून समन्वय साधत असून, प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

२०३४-३५ पर्यंत एएमसीएचे उत्पादन सुरू होऊन ते भारतीय वायुदलात दाखल होण्याची अपेक्षा आहे. उत्पादन भागीदार म्हणून निवडलेल्या कंपनीला डिझाइनसोबतच उत्पादनाची जबाबदारीही मिळू शकते. या अंतर्गत किमान १२५ विमाने तयार करण्याचा अंदाज असून, सुमारे २ लाख कोटी रुपयांचा सात स्क्वॉड्रनचा उत्पादन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.


Powered By Sangraha 9.0