नवी दिल्ली : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) ला अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस कडून चौथे एफ४०४-आयएन२० फायटर जेट इंजिन मिळाले आहे. हा पुरवठा 2021 मध्ये झालेल्या कराराचा एक भाग आहे. एचएएल सध्या जीईसोबत 113 इंजिन्सच्या खरेदीसाठी सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा नवा करार अंतिम टप्प्यात नेण्याच्या तयारीत आहे.
एचएएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी.के. सुनील यांनी सांगितले की, या करारावर स्वाक्षरी ऑक्टोबरमध्ये होण्याची अपेक्षा आहे. या नव्या ऑर्डरमध्ये 113 इंजिन्सचा समावेश असून त्याद्वारे 68 सिंगल-सीटर फायटर आणि 29 ट्विन-सीटर ट्रेनर विमानांना शक्तीपुरवठा केला जाणार आहे. या इंजिन्सची डिलिव्हरी 2027-28 पासून सहा वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे.
सध्या एचएएलकडे 99 इंजिन्सचा करार आधीच आहे, ज्यांचा वापर 83 तेजस एलसीए एमके१ए लढाऊ विमानांसाठी होणार आहे. डॉ. सुनील यांच्या मते, तीन विमाने तयार असून त्यांची अंतिम चाचणी ऑक्टोबरमध्ये पार पडेल. “ऑक्टोबरपर्यंत पहिले विमान वायुसेनेला सुपूर्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले. एचएएलचे उद्दिष्ट 2032-33 पर्यंत 180 विमाने वितरित करण्याचे आहे.
या इंजिन्सचा वापर भारतीय स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस एमके१एमध्ये केला जाईल. याशिवाय, एचएएल जीईच्या एफ४१४ इंजिन्ससाठी 80 टक्के तंत्रज्ञान हस्तांतरण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, जे भविष्यातील तेजस एमके२ आणि अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एमएमसीए) यांना शक्ती देणार आहेत. हा करार भारताच्या आत्मनिर्भर भारत दृष्टीकोनाशी सुसंगत असून, संरक्षण उत्पादनातील स्वदेशीकरणाला चालना देण्यासोबतच परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करणार आहे.