पर्यावरण संरक्षण गतिविधी - समाज मानस परिवर्तनाचा ध्यास

    01-Oct-2025
Total Views |

भारतीय परंपरेतील निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील परस्परपूरकतेचा दृष्टिकोन समाजात पुन्हा दृढ करणे, हा पर्यावरण संरक्षण गतिविधीचा मुख्य उद्देश. या उपक्रमांतर्गत पर्यावरणीय असंतुलन कमी करून सकारात्मक बदल घडवण्यासाठी समाजपातळीवर तसेच व्यक्तीपातळीवर प्रयत्न केले जातात. तसेच, विविध कार्यक्रम आणि अभियानांच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल जनजागृती करून लोकांच्या मनोवृत्तीत आवश्यक बदल घडवण्यावर भर दिला जातो. या पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी व जागरूकता निर्माण करण्यासाठी ‌‘पर्यावरण संरक्षण गतिविधी‌’ ‌‘एक थाळी एक थैला‌’, ‌‘हरित घर‌’, ‌‘इकोब्रिक्स‌’, जलसंरक्षण, वृक्षारोपण व विद्याथ-सहभागासह विविध उपक्रम राबवित आहे. यामुळे समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता, सक्रिय सहभाग आणि दीर्घकालीन सकारात्मक बदल घडत आहेत. हा लेख या कार्यक्रमांचा सखोल आढावा घेऊन त्यांच्या परिणामकारकतेचे महत्त्व अधोरेखित करतो.

प्रयागराज कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक आणि सामाजिक सोहळा आहे, ज्यामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. या मेळ्याला हिंदू धर्मात पवित्र असे महत्त्व आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक असल्यामुळे कुंभमेळ्यात प्लास्टिक डिस्पोजेबल वस्तूंमुळे (थाळ्या, ग्लास, बॅग्स, चमचे) कचऱ्याचे डोंगर उभे राहायचे, जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. प्लास्टिक संपूर्णपणे विघटन होत नाही, त्यामुळे नदी, जमीन, प्राणी आणि समाज यांवर दीर्घकालीन धोका निर्माण होतो. प्लास्टिकच्या वापरावर बंदी लागू केली असली, तरी काही ठिकाणी अजूनही त्याचा वापर दिसतो, ज्याचा होणारा परिणाम नदीच्या किनाऱ्यांवर आणि परिसरात कचरा, जलप्रदूषण आणि सौंदर्यहानी दिसून येते.

या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं आणि मग पर्यावरण गतिविधीने समाजाला साद घातली आणि भारतभर ‌‘एक थाळी एक थैला‌’ अभियान हाती घेतलं. परिणाम स्वरूप जवळपास 7 हजार, 258 संग्रहस्थानातून सुमारे 2 हजार, 241 संस्थांद्वारा 14 लाख, 17 हजार, 64 थाळ्या, 13 लाख, 46 हजार, 128 कापडी पिशव्या व 2 लाख, 63 हजार, 678 स्टीलचे ग्लासेस गोळा करण्यात आले. हे अभियान देशभरात राबविले गेले आणि समाजाने यात सक्रिय सहभाग नोंदवला. परिणामस्वरूप, डिस्पोजेबल वापरात 80 टक्के घट दिसून आली. तसेच 29 हजार टन कचरा कमी झाला. समाजाच्या सहभागाने पर्यावरणाची हानी कशी टाळता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा सकारात्मक बदल समाजामध्ये घडवून येऊ शकतो, याचे हे द्योतक आहे.

दि. 10 मार्च 2019 रोजी ग्वाल्हेर येथील संघप्रतिनिधी सभेत ‌‘पर्यावरण संरक्षण गतिविधी‌’ अशी घोषणा करण्यात आली. तत्कालीन सरकार्यवाह आदरणीय भैय्याजी जोशी म्हणाले की, “आज पर्यावरण प्रदूषण ही जगासमोरील गंभीर समस्या आहे. संघ देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणरक्षणासाठी काम करणार आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने वृक्ष, पाणी आणि पॉलिथिन (कचरा व्यवस्थापन) या तीन उपक्रमांवर काम करणार आहोत. या उपक्रमांवर प्रत्यक्ष काम करण्यासाठी जिल्हा पातळीवर पाच विभाग असतील शिक्षणसंस्था, धर्मसंस्था, नारीशक्ती आणि स्वयंसेवी संस्था व युवाशक्ती. अखिल भारतीय स्तरावर आणि राज्य स्तरावर ‌‘जनसंपर्क‌’ आणि ‌‘जनसंवाद‌’ असे इतर दोन विभागदेखील असतील.”

‌‘पर्यावरण गतिविधी‌’ सुरू झाली आणि कोरोना आला. पण, थांबणे हा स्वभावच नसल्यामुळे, परिस्थिती विपरीत असली, तरी काम थांबले नाही पाहिजे, या कृतिरूप विचारातून गतिविधीच्या पहिल्या कार्यक्रमाची योजना आखली गेली. सगळे घरीच असल्यामुळे एक अनोखी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. निमित्त होते, विश्व पृथ्वी दिवस (Earth Day) दि. 22 एप्रिल 2020 ही पर्यावरण आधारित चित्रकला स्पर्धा, इकोब्रिक बनवणे, घरातील कुंडीची सजावट अशी ऑनलाईन फोटो अपलोड करण्याची स्पर्धा होती. देशभरातून 15 हजार, 367 स्पर्धक सहभागी झाले आणि कार्यकाऱ्यांचा उत्साह अनेक पटींनी वाढला आणि गतिविधी योग्य मार्गावर असल्याची खात्री पटली.

विद्याथ हा संस्कारक्षम वर्ग पर्यावरणाच्या संस्कारांतून घडला, तर देश नक्कीच पर्यावरणसुरक्षित असेल, या हेतूने ‌‘पर्यावरण प्रहरी‌’ ही संकल्पना उदयाला आली आणि आतापर्यंत साडेतीन लाख विद्याथ या अभ्यासक्रमातून संस्कारित झाले आहेत. त्यातील काही आता पर्यावरण गतिविधीचे कार्यकर्तेही आहेत, सध्या हीच संकल्पना 'SIP' (Social Internship Program) म्हणून चालू आहे. दरमहा SIPचे वर्ग चालू आहेत. नवीन SIP मध्ये 75 महाविद्यालयांतून चार हजार विद्याथ सध्या या कार्यक्रमात सहभागी आहेत. 'NEYP 2022‌’ म्हणजेच 'National Environment Youth Parliament' मध्ये भारतभरातील 156हून अधिक विद्यापीठांमधून तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षण गतिविधी (PSG) यांनी आयोजित केला आणि पुरस्कार समारंभ व valedictory session मानव रचना ‌‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड स्टडीज (MRIIRS)‌’ व PSG यांच्यातर्फे संसद भवन येथे दि. 16 एप्रिल 2022 रोजी झाला.

या परिषदेत लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दोन वादविवाद सत्रे झाली, ज्यानंतर पुरस्कार समारंभ झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ओम बिरला (लोकसभा अध्यक्ष) होते. भूपेंद्र यादव (केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदलमंत्री) आणि ‌‘पद्मश्री‌’ सन्मानित सवजी ढोलकिया हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. 12 वर्षांची पर्यावरण क्रूसेडर आर्या चावडा आणि ‌‘गुगल बॉय‌’ कौटिल्य पंडित हेसुद्धा सहभागी झाले. याचवष संपलेल्या NSPC-25 या ‌‘इको मित्रम‌’ ॲपवर घेतल्या गेलेल्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये 15 लाख, 47 हजार, 901 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 1 लाख, 25 हजार, 537 संस्था यात सहभागी झाल्या व 113 देशांमध्ये ही स्पर्धा खेळली गेली. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या रुजवत्या वयात पर्यावरणाचे संस्कार पेरणी हा या स्पर्धेचा उद्देश होता.

‌‘इकोब्रिक्स‌’ म्हणजे स्वच्छ, कोरडा व पुनःप्रक्रिया न होणारा प्लास्टिक कचरा प्लास्टिकच्या बाटलीमध्ये घट्ट भरून तयार केलेली एक पर्यावरणपूरक बांधकाम वीट आहे. ‌‘इकोब्रिक‌’चा वापर बागेतील भिंती, बाके, फर्निचर व इतर लहान बांधकामांसाठी केला जातो. यामुळे प्लास्टिक कचरा लॅण्डफिल किंवा नदीत न जाता सुरक्षितपणे पुनर्वापर होतो आणि पर्यावरणास धोका कमी होतो. ‌‘इकोब्रिक्स‌’ हा पर्यावरण गतिविधीचा अखंड चालणारा कार्यक्रम आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त परिसंवाद घेतले आहेत आणि अनेक घरांमधील एकल वापरातील पॉलिथिन या बाटल्यांमध्ये बंद आहे व जमीन संरक्षणाचे काम करत आहे.गेल्या सहा वर्षांत पर्यावरण गतिविधीने समाजाला सोबत घेऊन अनेक छोटे-मोठे उपक्रम राबवले आहेत. त्यातील दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी झालेले ‌‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर‌’ हे अभियान भारतातील 836 समुद्रकिनाऱ्यांवर 1 लाख, 37 हजार, 396 लोकांनी 10 हजार, 570 संस्थांमार्फत केवळ दोन तासांत 738 टन कचरा साफ केला आणि समुद्रात होत असणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणाविषयी समाजात जागृती केली.

‌‘पर्यावरण संरक्षण उपक्रम‌’ आणि ‌‘हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन‌’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘प्रकृति वंदन‌’ हा निसर्गवंदनाचा एक कार्यक्रम दरवष आयोजित करण्यात येतो. समाजाला निसर्ग आणि पर्यावरण हितकारक मूल्यांशी जोडण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर दरवष ऑगस्ट महिन्यात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यात सर्व समाजांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करून त्यांना पर्यावरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो.

देशात आणि समाजात होत असलेल्या सकारात्मक हालचालींमधून जनचेतना, जनजागृती, लोकसहभाग आणि सार्वजनिक मोहिमा दिसून येतात. कोणत्याही मर्यादेच्या पलीकडे जाऊन पर्यावरणाचे काम ‌‘सर्वेषाम्‌‍ अविरोधेण‌’ आहे. हे एक सार्वत्रिक, सर्वस्पश आणि संपूर्ण समाजासाठी सर्वत्र स्वीकारलेले कार्य आहे. कोरोनाच्या काळानंतर जागतिक स्तरावर या कामाला मोठी मान्यता मिळत आहे. त्यामुळे हे काम सर्वव्यापी झाले आहे. आपले काम समाजाला विरोध करण्याचे नसून पर्याय उपलब्ध करून देण्याचे आहे. समाजाला उपभोगवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढायचे आहे आणि समस्यांवर नव्हे, तर उपायांवर बोलून मूळ आरण्यक संस्कृतीकडे परतायचे आहे.

पर्यावरण संरक्षणाचा सर्वांत लहान परंतु सर्वांत महत्त्वाचा भाग आहे ‌‘हरित घर.‌’ हरित घराच्या संकल्पनेत तिन्ही उपक्रमांना आधारभूत ठेवत, कुटुंबाला केंद्रबिंदू मानलेले आहे. प्राथमिक एकक म्हणून आपल्याला कुटुंबापासून कार्य सुरू करायचे आहे आणि त्याच आधारावर सामाजिक चेतना आणि समाजाचे मानस परिवर्तन घडवून आणायचे आहे. पर्यावरण संरक्षणाचे कार्य सैद्धान्तिक नसून व्यावहारिक आहे. प्रत्येक योजनेची अंमलबजावणी करून आणि त्याला गती देऊनच आपण आपली उद्दिष्टे पूर्ण करू शकू. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या भूमिका निश्चित करणे गरजेचे आहे. या भूमिकेत ‌‘मी‌’पासून ‌‘आपण‌’ असा प्रवास करत समाजाचे मानस परिवर्तन घडवून आणायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्या पर्यावरणपूरक संस्कृतीकडे वाटचाल करायची आहे. आपण जिथे राहतो, तिथे पर्यावरणाबद्दलचे आपले दायित्व निश्चित करावे. घर आणि कुटुंब यांपासून या कार्याची सुरुवात करावी. आधी सांगितल्याप्रमाणे, ‌‘हरित घर‌’ हे आपल्या कार्याचे सर्वांत लहान एकक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रयोगांच्या आधारे आपण आपल्या घराला ‌‘हरित घर‌’ केले पाहिजे. सर्वप्रथम याचेच चिंतन व्हायला हवे. देशभरात सुमारे 1 लाख, 25 हजार परिवार पर्यावरणपूरक हरित घरांची बोलकी उदाहरणे आहेत.

देशभरातील सामाजिक संस्थांना एक मंच मिळावा, म्हणून देशभरातील पर्यावरण क्षेत्रातील प्रभावी कामे करणाऱ्या प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था (NGOs) यांना पर्यावरण गतिविधीकडून खास आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात 44 संस्थांनी त्यांच्या कामगिरी आणि प्रयत्नांची मांडणी केली, ज्यामुळे समाज व पर्यावरणासाठी त्यांचा मोलाचा वाटा जाणून घेण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम दिल्ली येथील खाटू श्याम धाममध्ये दि.17 जानेवारी रोजी पार पडला. कार्यक्रमाचा समारोप सहसरकार्यवाह श्री कृष्णगोपाल यांच्या सारगर्भित आणि प्रेरणादायी भाषणाने झाला. देशभरातील तीन हजारांपेक्षा अधिक सामाजिक संस्था गतिविधीच्या संपर्कात आहेत.
पर्यावरणातील 3P असे आहेत.

जनजागृती (Public wareness) - समाजातील चेतना ही कोणत्याही बदलाची आधार असते. पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी पर्यावरणाचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कार्यशाळा, सोशल मीडिया इत्यादींद्वारे पर्यावरणविषयक माहिती, समस्या आणि उपाय यांवर चर्चा करून वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर यांबाबत अधिकाधिक लोकांना जागरूक करता येईल. ऑनलाईन प्रश्नमंजुषा किंवा इतर अशा प्रयत्नांद्वारे लोकांना जागरूक करता येईल.

लोकसहभाग (Public Participation) - सामाजिक जागरूकता लोकसहभागाद्वारे मोजली जाते. समाज जितका जागरूक होईल, तितका लोकसहभाग वाढेल. लोकसहभाग वाढल्याने कामाला गती मिळेल आणि उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. ग्रामीण व शहरी भागात वृक्षारोपण आणि जलसंधारण यांसाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित करण्यात यावा. प्रत्येक व्यक्तीला या पवित्र मोहिमेचा एक भाग बनण्यासाठी प्रोत्साहित करता येईल.

सार्वजनिक मोहीम (Public Campaign) - नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करून आपण विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत. याला आताही मोठ्या मोहिमेत रूपांतरित केले नाही, तर आपले अस्तित्व नक्कीच धोक्यात येईल.पर्यावरणाभिमुख जीवनशैलीशी संबंधित संदेश जनतेपर्यंत पोहोचवून पर्यावरण संरक्षणाचे सार्वजनिक मोहिमेत रूपांतर करणे गरजेचे आहे.

पर्यावरण संरक्षणाचे काम कसे करावे, याविषयीचे चिंतन खालीलप्रमाणे आहे. वैयक्तिक आणि कौटुंबिक (Personal) कोणतीही संकल्पना स्वतःपासून सुरू करणे चांगले असते. पर्यावरण संवर्धनाचा सल्ला देण्यापूव आपण स्वतः त्याचा विचार करून त्याचा अवलंब केला पाहिजे. समाजाला दिलेला संदेश किंवा सल्ला पूर्णपणे पाळावा लागेल. आपण वस्तूंचा उपभोग घेण्याऐवजी त्यांचा वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण करणे शिकले पाहिजे. आपली दैनंदिन दिनचर्या अशा प्रकारे नियोजित केली पाहिजे की पाण्यापासून ऊर्जेपर्यंत सर्व गोष्टींचे संरक्षण आणि पुनर्वापर करणे, ही आपली सवय होईल. प्रत्येक स्वयंसेवकाचे घर हे ‌‘हरित घर‌’ असावे. प्रत्येक कार्यकर्त्याने पर्यावरणाचे जागरूक रक्षक असले पाहिजे.

व्यावसायिक (Professional) -
एखाद्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र केवळ त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित नसते. त्याला सामाजिक, व्यावसायिक आणि इतर प्रकारची कार्ये असतात. जेव्हा आपण एखादे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करतो, तेव्हा ते उद्दिष्ट आपल्या प्रत्येक कार्यातून दिसले पाहिजे. त्या दृष्टीने आपली दिनचर्या पर्यावरणपूरक असायला हवी. आपण कुठेही असलो, तरी आपले चिंतन आपल्या कार्यातून प्रकट झाले पाहिजे. आर्थिक लाभाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या धावपळीत पर्यावरणाला विनाशाकडे नेणाऱ्या जीवनशैलीत संपूर्ण परिवर्तन घडवून पर्यावरणपूरक आणि पर्यावरण हितकारक जीवनशैली उभी करण्याचा प्रयत्न करायला हवा.

सामाजिक (Public) - सामाजिक जागृतीशिवाय कुठल्याही प्रकारचे परिवर्तन अशक्य आहे. पर्यावरण संरक्षणाला एक सामाजिक मोहिमेचे रूप देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीत चेतनेचा संचार करणे गरजेचे आहे, जेणेकरून तो निसर्गाशी एकरूप होऊ शकेल. निसर्गाचे जितके घटक आहेत आणि जितकी स्वरूपे आहेत, त्या सर्वांना एकसारखे समजू शकेल. आपल्याला समाजाला सोबत घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी कायदे तयार करायला हवे व त्याचे काटेकोरपणे पालनही करायला हवे.

पर्यावरण गतिविधीकडून दि. 7 नोव्हेंबर व दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी भवन योजना एवं वास्तुकला विद्यालय, भोपाळ येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत HRIT (Holistic tion for Rejuvenating Indigenous Traditions) या संकल्पनेवर आधारित सतत जीवनशैली व हवामान अनुरूप निर्माण अभिकल्पना व योजना या विषयावर सखोल चर्चा झाली. या ‌‘हरित संवादा‌’त 'HRIT'ची संकल्पना सर्वांना परिचित करून देण्यात आली. भारतीय परंपरेनुसार पर्यावरणपूरक वास्तुकला व बांधकामपद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले, जेणेकरून समग्र विकास व पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालता येईल. उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य होते. आपल्या उद्बोधनात त्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली, भौतिकता व अध्यात्म यांमधील संतुलन आणि पर्यावरणाबद्दल जबाबदारीची जाणीव ठेवून जीवन जगण्याचा संदेश दिला.

पर्यावरण गतिविधीचा पथदश प्रयोग : ECOMITRM app पर्यावरण संरक्षण उपक्रमाच्यावतीने आयोजित प्रत्येक कार्यक्रमाची माहिती विशेष ॲपवर टाकली जाते. या ॲपमध्ये पर्यावरण संरक्षण उपक्रमाचे सगळ्यात लहान एकक म्हणजे ‌‘हरित घर‌’ यासाठी ठरवलेली कार्ये अपेक्षेनुसार पूर्ण झाल्यावर त्याची नोंद होऊन प्रमाणपत्र देण्यात येते. याशिवाय उपक्रमाच्यावतीने वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा, मोहिमा, पर्यावरण मासिक यांची माहिती ही ॲपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. आतापर्यंत 12 लाखांहून अधिक लोकांनी हा ॲप डाऊनलोड केला आहे. या प्रणालीमुळे पर्यावरण संरक्षणाच्या कामात लोकांचा सहभाग वाढला आहे आणि जनजागृती प्रभावीप्रकारे करण्यात येत आहे. आपणही हे ॲप डाऊनलोड करून पर्यावरण गतिविधीत सामील होऊ शकता. https://ecomitram.page.link/install पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या सुरक्षिततेसाठीची जाणीव हीच मुख्य आधार आहे. वेदांमध्ये लोककल्याणाची कामना केलेली आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकात शांती व्यक्त होते, तसेच विश्वाच्या कल्याणासाठी तीव्र इच्छा आहे, कारण निसर्ग हा जसा शांत आणि सौम्य आहे, तसाच तो रौद्ररूप धारण करणाराही आहे. जर आपण त्याच्याशी जुळवून घेतलं आणि त्याला सहकार्य केलं, तर तो अनंत काळापर्यंत आपल्या दुग्धरूपी संपत्तीने आपलं पालनपोषण करेल, परंतु शोषण आणि विद्ध्वंस केल्यास तो आपल्याला मारून टाकण्यास अजाित संकोच करणार नाही. म्हणूनच ऋषींनी हवा, पाणी, औषधी वनस्पती इत्यादी पर्यावरणीय घटकांबद्दल जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे आणि त्यातील अशुद्धता दूर करून पर्यावरण संरक्षणाचे लक्ष्य प्राप्त करण्यास प्रवृत्त केले आहे.

मानव आणि निसर्ग हे परस्परपूरक आहेत. शोषण केल्यास निसर्ग रौद्र रूप धारण करतो. म्हणून ऋषींनी पाणी, वायू, औषधी वनस्पतींबद्दल जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. आपली जबाबदारी म्हणजे स्वतःपासून समाजापर्यंत हा प्रवास करत पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणे.
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः॥

पर्यावरण करणीय कार्य

1. जलसंरक्षण (घरातले पाणी घरात)
रोजच्या दिनचर्येत थोडा बदल आणत आपण कित्येक लाख लिटर पाणी वाचवू शकतो. आपले उद्दिष्ट आहे की, आपण घरातले पाणी गरजेनुसार कमीत कमी वापरावे.
* बादलीत पाणी घेऊन अंघोळ करावी.
* पिण्यासाठी पाणी अर्धा ग्लासच भरावा.
* आरओ आणि एसीच्या सांडपाण्याचा उपयोग करावा.
* नळातून पाणीगळती थांबवावी.
* नळांना एरेटर लावावा.
* गच्चीवर साचणाऱ्या पाण्याचा वापर करावा.

2. भूमिसंरक्षण (घरातला कचरा घरात)
* ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावा.
* स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्याचे खत तयार करावे.
* भंगार विकावे.
* पॉलिथिन अजिबात वापरू नये. घरात पॉलिथिन आल्यास ते त्याच स्वरूपात बाहेर जाऊ देऊ नये. (इकोब्रिक्स तयार कराव्या.)
* उपयोग नसलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करावा.
* घर आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता
* स्वयंपाकघरातील बाग.

3. वनसंरक्षण (पंचवटी)
* घरातील रिकाम्या जागेत/बाल्कनीत/गच्चीत/अंगणात झाडे लावावी.
* घरात कमीत कमी पाच औषधी वनस्पती लावाव्या.
* जागा नसल्यास कुंड्यांत पंचवटी लावावे आणि एक वर्षापर्यंत जोपासावे. त्यानंतर त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे.
* घरात आलेली फळे/भाज्या यांच्या बिया एकत्रित करून रोपणे किंवा बाग, शाळा यांसारख्या परिसरात लावाव्या.

4. जीवसंरक्षण
* वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, कीटकनाशकांचा वाढता वापर, मोठ्या प्रमाणात होणारे वायुप्रदूषण इ.मुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. काही प्रजाती तर नामशेष होण्याच्या परिस्थितीत आहेत. यांच्या संरक्षणासाठी जे काही करणे शक्य आहे, ते करावे.
* प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवावे.
* पक्ष्यांसाठी बर्डफीडर आणि आश्रय तयार करावा.
* जखमी पशुपक्ष्यांसाठी औषधोपचाराची व्यवस्था करावी.

5. ऊर्जासंरक्षण
* कुठलेही कार्य करण्याची पद्धत अशा प्रकारे तयार करावी, जेणेकरून ते कार्य करण्यात कमीत कमी ऊर्जा खर्च होईल. यालाच ‌‘ऊर्जेचे संरक्षण‌’ असे म्हटले जाते.
* विजेवर चालणाऱ्या वस्तू गरज नसताना बंद ठेवाव्या.
* कुटुंबातील सर्वांनी शक्यतो एकाच खोलीत बसावे.
* एलईडी उपकरणांचा वापर करावा.
* नवीनीकरण ऊर्जास्रोतांचा उदा., सौरऊर्जा, बायोऊर्जा, जैविक इंधन यांचा वापर करावा.
* घरात गोघृत दीप लावावा.

- अभिजित देशपाडे
(लेखक कोकण प्रांत संयोजक, पर्यावरण संरक्षण गतिविधी आहेत.)