कुटुंब व्यवस्था हा भारत देशाचा कणा आहे , तो सुदृढ करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे ,कुटुंबाकडून समाज आणि समाजाकडून देश आपण समृद्ध करू शकतो, सनातन धर्माची ही ताकद आपण वेळीच ओळखून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण व्यक्तिवादाच्या अट्टाहासामुळे संयुक्त कुटुंबाची संकल्पना जवळपास इतिहासजमा होताना दिसते. त्याचे परिणाम म्हणून माणूस एकाकी होत आहे आणि मानसिक भूक भागवण्यासाठी कृत्रिम मार्ग शोधू लागला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबसंस्थेचे महत्त्व, संवादाची गरज, परस्पर विश्वास व प्रेम यांचा ओलावा पुन्हा जागवणे आवश्यक आहे. सक्षम कुटुंब हेच सक्षम समाज आणि अखेरीस सक्षम राष्ट्राची पायाभरणी करते, हा संदेश या लेखातून अधोरेखित केला आहे.
एक हैं तो सेफ हैं’ मथळा बघून राजकीय घोषणा वाटते ना! तर तसं काही नाही. हा मथळा भारतीय समाजव्यवस्थेसाठी आहे. कुटुंब प्रबोधन आजच्या काळात अत्यंत आवश्यक झालं आहे. बाजारात दुर्दैवाने स्वयंपाकघराशिवाय घरे येऊ लागली आहेत. हे कशाचे कारण आहे, तर आपले कुटुंब विभक्तेकडून व्यक्तिकेंद्राकडे जाऊ लागले आहे. आधी कुटुंब वेगवेगळी झाली. त्यामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अट्टाहासापायी व्यक्ती एकट्या पडू लागल्या आहेत. परिस्थिती गंभीर नक्की नाही, पण आतापासून आपण विचार करू लागलो, त्यावर पर्याय काढू लागलो, तर घडणारे मोठे अरिष्ट टळेल.
मूळ मुद्दा असा आहे की, कुटुंब एकत्र का हवे? आधी कुटुंब हवेच का? याचा आपण विचार करू. मनुष्य प्राणी हा समूहांमध्ये वाढणारा, जगणारा आणि प्रगती करणारा आहे. साधे प्राणिमात्रातील उदाहरण घेऊ. एक मुंगी काहीही करू शकत नाही; पण जेव्हा मुंग्या एकत्र येतात, तेव्हाच त्या आपल्यापेक्षा प्रचंड प्रमाणातील वजन सहज झेपवू शकतात. आपण लहानपणापासून ‘इसापनीती’च्या गोष्टी ऐकत आहोत. त्यात ‘एकीचे बळ’ म्हणून एक गोष्ट होती. बघा, नक्की आठवेल. त्यालाच धरून, एकीमुळे काय होते, याचा अंदाज येईल. एवढे सांगण्याचे कारण म्हणजे, आताची परिस्थिती अशी आहे की, ‘हम दो हमारे दो’वरून ‘हम दो हमारा (कदाचित) एकच!’
‘कुटुंब’ या कल्पनेचाच ऱ्हास होऊ लागला आहे. कुटुंबपद्धत आणि त्यात एकत्र कुटुंबपद्धत जवळपास इतिहासजमा होऊ लागली आहे. त्यामुळे नातेवाईक असतात किंवा असू शकतात, याचा हळूहळू विसर पडू लागला आहे. कोण जबाबदार यासाठी? तुम्ही, आम्ही की मी? एकत्र कुटुंबाचे खूप फायदे आहेत. एकतर लढायला बळ मिळते. आपल्या पाठीशी, आपल्यासोबत कोणीतरी आहे, हीच बाब कुठल्याही संकटाचा सामना करायला पुरेशी आहे. नुसतं दुःखात नव्हे, तर सुखाच्या प्रसंगात आपली माणसे असताना आनंद वेगळाच. एका चित्रपटातला भाग आठवतोय. विदेशात नवीन नवीन राहायला गेलेला असतो. तिकडे त्याला ‘कुकरी शो’मध्ये यश मिळते. त्याला विचारलं जात, “आता या देशाचा कायमचा रहिवासी होणार का?” त्यावर तो मार्मिक उत्तर देतो, “मी कितीही इथे मोठा झालो, तरी जेव्हा गावाला माझ्या घरी असेन, तेव्हा गावातील माणसे माझं नाव अभिमानाने घेतील; माझी विचारपूस करतील; काही चुकलं तर माझा कान पकडतील आणि छान केलं तर माझ्या पाठीवर थाप देतील, ते माझं खरं यश असेल.” या गोष्टीत एकच महत्त्वाचं, माझं यश बघायला माझ्यासोबत माझी माणसे हवीत.
एकत्र कुटुंबे का कमी झाली? याचा काथ्याकूट करण्यापेक्षा आपण काय काय करू शकतो, याचा विचार करायला हवा. वरील कथा सांगण्याचा उद्देश हाच की, आपलं कोणी हवं. कदाचित आताच्या परिस्थितीमुळे एकत्र कुटुंबसंस्था लोप पावू लागली आहे. विभक्त कुटुंब ही त्यावेळी काळाची गरज असेलही; पण आज त्याचमुळे आपण आपले सर्वस्व हरवून बसायला लागलो आहोत. आपली मानसिक भूक भागत नाही. त्याला पर्याय म्हणून समाजाने पाट, विकेंड पाट/गेट टुगेदर, री-युनियन, विविध ‘डेज’ सुरू झाले. भारतीय मानसिकता ही समाजप्रेमी आहे, याबाबत मात्र शंका नाही. एक विशेष म्हणजे, हल्ली ‘फ्रेंड’ प्रकरण वाढले आहे. त्या फ्रेंडशिपमध्ये मित्रता अशी कुठे जाणवत नाही. किंवा मित्रता म्हणजे नक्की काय, याची व्याख्या किंवा भव्यता लक्षात येत नाही. मैत्री म्हणजे कृष्ण-सुदामा. त्यामुळे कुठेतरी आपण चुकीच्या मार्गाने जाऊ लागलो आहोत. तसेच आपण प्रेम शोधायला घरात कुत्रे-मांजर पाळू लागलो आहोत. नात्यातील प्रत्येकाचे एक ‘डेज’ होऊ लागले आहेत. यात गैर नक्कीच काही नाही. पण यात आपुलकीचा ओलावा असतो का? थोडक्यात, एखाद्या पर्यटनस्थळाला जायचं आणि आपल्या गावच्या घरी जायचं, यात उजवं कोण ठरतं, अगदी तसंच आहे. घरातलं जेवण आणि परिपूर्ण खानावळीतलं जेवण जास्त छान काय वाटेल? कशाला आपण पूर्णब्रह्म म्हणणार? थोडक्यात, ज्यात आपुलकी आणि प्रेम आहे, तेच मनाला भावते. तसेच आपले कुटुंब असणे महत्त्वाचे, ज्यात प्रेमाचा अखंड ओलावा आहे. त्यागाचा सुंदर वास आहे.
आता हे सगळं छान वाटतं, पण याची सुरुवात कशी करुया?
माझं कुटुंब, घराघरांत संवाद संपला आहे. आपल्याला पहिल्यांदा स्वतःच्या घरातून संवाद चालू करावा लागेल. म्हणजे अवांतर गप्पांनी आपल्या कार्यालयीन गमती अथवा ताणतणाव आपल्या मुलांना सांगणे. घरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींत त्यांचे मत घेणे, त्यांना मत मांडण्यासाठी प्रवृत्त करणे. एखादी कुटुंबातील जबाबदारी त्यांना देणे. छान केलं, तर शाबासकी आणि समजा चुकलं, तर ते सुधारून त्यांना देणे. त्यांच्या महाविद्यालयातील गप्पा - फक्त यामध्ये ‘आमच्या वेळी’ असा सूर असू नये, तर ‘कसले भारी आहात रे तुम्ही’ अशी पुष्टी जोडणे आवश्यक आहे. जमलं तर आपण त्याचे मित्र होऊ, अगदी जीवलग झालात तर सगळ्यांत उत्तम, पण मित्र जरी झालो, तरी आपल्या वयाचा एक आब ठेवता आला पाहिजे. कारण आताची पिढी आणि मागील पिढी यांतील दुवा आहोत आपण. कदाचित आपल्याला ढोलासारखी परिस्थिती आपली झाली आहे, असे वाटू शकते.
दुसरा मुद्दा महत्त्वाचा पती आणि पत्नी यांच्यामध्ये सगळ्यांत जास्त विश्वास, प्रेम आणि संवाद असायला हवा. त्याकरिता काय करता येईल, तर शक्य तेवढे आपले घरातील वातावरण खेळकर राहील, याची काळजी घ्यावी लागेल. ही सगळी जबाबदारी 80 टक्के पुरुषाची आहे. गृहलक्ष्मी खुश तर सगळे खुश. शक्य तेवढी घरातील कामांत त्यांना मदत करा. त्याचा फायदा पुरुषांनाच होणार आहे. दुसरं म्हणजे स्वाभाविक मुलांवर संस्कार होतील, घरात मदत करायचे. पत्नीने जसं आपल्या सासरच्या मंडळींचे करावे असे वाटते, तसेच आपणही तिच्या माहेरच्यांशी संपर्कात असावे. त्याने घरात एक दृढ विश्वास निर्माण होईल. महिलांनी मोठी काळजी घ्यायची ती म्हणजे, आपले घर हे केवळ तुम्हीच सांभाळू शकता. घर तुटणे अथवा नीट राहणे हे तुमच्या हातात आहे. तसेच मुलांना संस्कार आणि शिस्त फक्त आईच लावू शकते. मुलगा असो वा मुलगी, ‘सातच्या आत घरात’ तत्त्व पाळले गेले पाहिजे. (सातच्या आत घरात म्हणजे नक्की कुठे, कोणासोबत आपली मुले आहेत, हे पाहणे.) आपल्या मुलांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, याची माहिती आणि संपर्क क्रमांक असायलाच हवेत. त्यांच्या मित्रपरिवाराला आपल्या घरात आमंत्रित केले पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलाचा मित्रपरिवार कसा आहे, याची माहिती होईल. एक विशेष म्हणजे, जमलं तर रोज किंवा आठवड्यातून किमान एकदा सत्संग (शुभं करोति, रामरक्षा, हनुमान स्तोत्र, श्रीसूक्त, आपल्या कुलदेवतेचा एखादा पाठ असेल तर उत्तम) करावा, जेव्हा घरातील सगळेजण एकत्र जमतील. स्वाभाविक संस्कार होतील.
आपण आतापर्यंत फक्त आपल्या चौकोनी कुटुंबाबद्दल बोलत आहोत. यापुढे आपले नातेवाईक यांच्याशी आपले नाते जपणे आपल्याला जमले पाहिजे. फक्त लग्नकार्याला बोलावणे, म्हणजे एक औपचारिकता असते. पण, वर्षातून किमान एक-दोन वेळा शक्य होईल तेवढे नातेवाईकांना बोलावणे आवश्यक आहे. त्यातून एक मनाचे धागे जुळू लागतील. मोठा समारंभ असावा, असं नाही. साधे-सरळ एकत्रीकरण करावे. चाय के साथ वायपण असावे. बघा विचार करून. सगळं एकत्र कदाचित नाही जमणार; पण प्रयत्न तर करायला हवाच ना! आपल्या घरातील वडीलधाऱ्यांसोबत आपण जितके चांगले वागू, तेवढे आपल्या मुलांवर संस्कार होत जातील.
आपला प्रवास मी-आम्ही-आपण असा होऊ लागेल. आपले कुटुंब जेवढे सुदृढ, तेवढे आपले जगण्याचे बळ तिप्पट-चौपट होईल. कारण आपल्या जीवनाचा प्रवास हा ‘मी’पासून चालू होऊन ‘आपण’पर्यंत आला पाहिजे. सक्षम कुटुंब म्हणजेच सक्षम राष्ट्र. राष्ट्र बळकट कधी होईल, जेव्हा त्या राष्ट्रातील प्रत्येक माणूस सशक्त असेल, विचाराने, शरीराने आणि संस्काराने, तेव्हा यशस्वी होऊ शकतो आपण. एक छोटेसे कुटुंब जर एकमेकांत मिसळलं, तर अशी लाखो कुटुंबे तयार झाली, तर आपल्याला किती मोठा पल्ला सहज गाठता येईल. आपण रांगोळी सगळेजण बघतो; पण ती एका बिंदूने चालू होते आणि त्याचा बिंदूबिंदूंतून निर्माण होते. मनाला भावणारी सुरेख रांगोळी, असेच एक बिंदू म्हणजे एक कुटुंब असे अनेक बिंदू जोडले गेले, तर विचार करा, राष्ट्र परमवैभव का प्राप्त करणार नाही!
समाजाचे आपण काही देणे लागतो आणि मातृभूमीचे उपकार आपल्याला फेडावेच लागणार, त्यासाठी आपल्या घरातून सुरुवात करून मग समाज, मग राष्ट्र, ही श्रृंखला आहे. त्याग, समर्पण, निष्ठा, प्रेमभाव यांचे एकत्रित समग्र मिश्रण म्हणजे आपले कुटुंब आणि त्याच कुटुंबाचे परावर्तन म्हणजे आपला समाज. आजातून(आणि ज्यातून) तयार होईल आपले राष्ट्र. समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला आपले अधिकार माहीत असतात, पण आपली जबाबदारी माहीत नसते. त्याची जाणीव आपण कृतीने देणे आवश्यक आहे. नागरी कर्तव्य पार पाडणे दुर्दैवाने आपल्याला शिकवावे लागते. तेव्हा सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये, सार्वजनिक नियम पाळावेत, हे आपण आपल्या कुटुंबापासूनच चालू केले, तर समाज त्याची दखल घेईल. घरामध्ये आपण स्वतः किती मोबाईल वापरतो, तसेच किती वेळ टीव्ही बघतो, याची खातरजमा आपण केली पाहिजे. घरातील प्रत्येकाची आवड वेगवेगळी असेलच, तरी त्यासाठी एक आवडीचे फ्युजन करावेच लागेल. घरातील प्रत्येकाने महिन्याला एक ते दोन पुस्तके वाचलीच पाहिजेत. पुस्तके वाचल्यानंतर त्यावर चर्चा अथवा पुस्तकाची माहिती एकमेकाला देता आली पाहिजे. सहज चर्चेतून हे घडलं पाहिजे. छान नाटक-चित्रपट एकत्र पाहिले गेले पाहिजे. आपल्या कुटुंबाची ती वेळ म्हणजे ‘हॅप्पी टाईम’ असला पाहिजे. ओढून-ताणून संस्कार अथवा मैत्री होणार नाही. त्यासाठी थोडा वेळ द्या आणि घ्या. कुटुंबाला, स्वतःलासुद्धा!
कुटुंब सुदृढ होण्यासाठी आपल्यालाही काही गोष्टींचे तारतम्य पाळावे लागेल. शिस्तीचा बडगा नको, पण आदरयुक्त भीती हवीच. याचे एकदा भान आपण राखले, तर सगळं काही नीट होईल. मला कल्पना आहे, ही तारेवरची कसरत आहे. पण, आपल्याला हे करावेच लागेल. मुलांच्या कल्याणासाठी जसे आपण त्यांना हवे ते शिक्षण देतो, त्याचा भार उचलतो, अगदी तसेच हे आहे. मुलांना चांगले वातावरण मिळावे, हीच आपली अपेक्षा असणार, मग ती पूर्ण करायला अजून एक छोटासा त्याग आपल्याला करावाच लागणार. कारण, सशक्त कुटुंब-सशक्त समाज-सशक्त राष्ट्र!
- मनिषा साठे
(लेखिका राष्ट्र सेविका समितिच्या कोकण प्रांत कुटुंब प्रबोधन गतिविधी प्रमुख आहेत.)