डोंगर - दर्याचा शाखा प्रवास

    01-Oct-2025
Total Views |

१९४० च्या दशकापासून पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य विविध अडथळ्यांना तोंड देत झपाट्याने विस्तारले. विष्णू वाडेकर ते नाना चंपानेरकर या गृहस्थी कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी ते किनारपट्टीपर्यंत शाखांचे जाळे विणले. १९४८च्या बंदीपासून ते रामजन्मभूमी आंदोलनापर्यंत आणि त्यानंतर सेवाकार्य व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संघाने स्थानिक जनजातीय समाजजीवनात घट्ट मुळे रोवली. आज संघशताब्दीच्या उंबरठ्यावर पालघर जिल्ह्यातील बहुतांश मंडलांमध्ये शाखा व सेवाकार्याच्या रूपाने संघाचा प्रभाव दृश्यमान आहे. त्याचा घेतलेला हा आढावा...

वर्ष होते १९४० . प्राथमिक शाळेच्या आवारात लहान मुले खेळत होती. पिंजारलेले केस, मळकट कपडे, शिवराळ भाषा, पण राकट शरीराची ती पोरं धुळीत खेळताना आरडाओरडा करीत होती. या कल्लोळात एक पांढरेशुभ्र कुर्ता-धोतर परिधान केलेला तरुण त्या निरागस बालकांचा खेळ पाहण्यात दंग आहे, असे वरवरून दिसत असले, तरी त्याच्या अंतरंगात खळबळ होती. ती मुले केव्हा थकतात याची तो वाट बघत होता. तो क्षण आला. पोर थकून झाडाच्या पाराजवळ गोळा झाली. काही त्या अपरिचित पाहुण्याकडे कुतूहलाने तर काही संशयाने बघत होती. अपरिचिताने त्या पोरांना जवळ येण्यास खुणावले. पण, ती पोरं त्यांच्याकडे येण्यास बुजतात, हे लक्षात आल्याने ती व्यक्ती एका छोट्या मुलाकडे गेली.

आपल्या हातातील चणे त्याच्या मुठीत कोंबले. हळूहळू त्या सर्व पोरांचा धीर चेपला नि त्या तरुणाच्या खिशातील सर्व चणे संपले. गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. दमछाक करणारे, पण नवीन खेळ झाले. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’, ‌‘जय भवानी जय शिवाजी‌’, ‌‘भारतमाता की जय‌’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला.

दोन-चार दिवसांनी गावात चर्चा सुरू झाली, “शाळेच्या आवारात कोणतरी अवलिया आला आहे. तो पोरांबरोबर खेळतो, बागडतो, अस्तमानास पोरं गावात येतात. एखाद राती हा भामटा पोरांना पळवून तर नेणार नाही ना? चांगलं बदडवून हाकलायला पाहिजे.”
सायंकाळी गावातील पाच-सहा धटिंगण मैदानावर पोहोचले. त्यांनी इशारा करून त्या अवलियास बोलावले.
“हे काय चालले आहे?”
“शाखा. शाखेचे खेळ”
“शाखा? म्हणजे?”
“खेळ, व्यायाम, गाणं, देवभक्ती, देशभक्ती.”
“गोऱ्या फिरंग्याने पाठविले आहे की काय?”
“नाही.”
“मग या कामाकरिता तुला कोण पैसे देतो? तू कुठला? तुझा अतापता काय? घर कुठं?” प्रश्नांची सरबती झाली.
“दादांनो, हा देश हिंदूंचा. म्हणजे आपला. आपल्या देवाची, देशाची भक्ती करायला पैशाची गरज काय? मी जळगावचा. तुमच्या भाषेत घाटावरचा. गावच्या मारुती मंदिरात राहतो. तुम्ही घरी बोलावलं तर येईन, जे मिळेल ते खाईन. नाहीतर मारुतीराया आहेच!” त्या धटिंगणांना तो काय सांगतोय ते समजेना. ते त्याला गावात घेऊन गेले. त्या अवलियाने वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार केला. “मी गोविंद श्रीधर ढोबळे. संघाचा प्रचारक आहे. देव, देशभक्तीचा संस्कार भावी पिढीवर व्हावा, म्हणून आलोय.”

थोड्याच कालावधीत गावातील विष्णू वाडेकर, काशिनाथ पाटील, विष्णू रोडगे, मधु पाटकर, गौरीनाथ गद्रे या तरुणांशी गोविंदची गट्टी जमली आणि वाड्यात बालतरुणांच्या शाखेचा श्रीगणेशा झाला. पुढे त्या तरुणांच्या सोबतीने गोविंदने खानिवडे, खुपरी, आंबिस्ते, चिंचघर, वरले, सापने, गोहा, कंचाड या गावांत शाखा सुरू केल्या. (पुढे हेच गोविंद नाना ढोबळे महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख झाले.)

संघकार्य

वाडा तालुक्याच्या पश्चिमेला महामार्गाच्या पलीकडे मनोर गाव आहे. एका बाजूला स्वातंत्र्याकरिता नेतृत्व करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बहुजनांचे समर्थन होते, पण त्याचवेळी एका विशिष्ट धमयांची दाढी कुरवाळणाऱ्या काँग्रेसविषयी तरुणांच्या मनात रोषही होता. मुठभर धर्मांधांच्या मोहल्यातून जाताना सणासुदीची, लग्नाच्या मिरवणुकीतील वाद्ये हिंदूंना बंद करावी लागत असत. धर्मांधांचा उद्दामपणा वाढत होता. देशभर हीन, दीन, लाचारीचे जीवन हिंदू जगत होते.

१९४१ साली नाना पालकर हे प्रचारक म्हणून दीड वर्ष मनोरमध्ये राहिले. अतिशय शांत, दांत स्वभावाचे. नाना पालकर हे तेजस्वी बुद्धीचे कवीमनाचे संघप्रचारक होते. त्यांनी लोखंडे कुटुंबीयातील आत्माराम, तुकाराम, कृष्णा तसेच वासुदेव घोलप, मधु बोरकर, मदन चाफेकर आदी तरुणांच्या हृदयात देशभक्तीचा अंगार फुलविला. शाखा सुरू झाली आणि मनोरच्या इतिहासात प्रथमच मशिदीवरून सवाद्य देवीची पालखी मिरवणूक निघाली.

(कै. नाना पालकरांनी लिहलेले आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे चरित्र आजही संघात अधिकृत मानले जाते.)

जव्हारला राहणाऱ्या नाना जाईल या तरुणाने डोंगर पठारावरून खाली उतरून कुडण (आताचे विक्रमगड) येथे १९४१ दरम्यान शाखा सुरू केली. त्यांना प्रभाकर, दतात्रेय, विश्वनाथ (भानुशाली), मोरु भट, शंकर औसरकर, बाळू मुळे, बापू वाडेकर, शांताराम आळशी या सळसळत्या रक्ताच्या तरुणांची साथ मिळाली. या टोळीने साखरे, आलोंडा, खोस्ते इ. गावी शाखेचे जाळे पसरविले. जव्हारच्या संस्थानिकाने मुस्लीम पठाणांना वसुलीचे काम सोपविले होते. साहजिकच राजाचे पाठबळ असल्याने मुस्लिमांची मग्रुरी वाढत होती. हिंदू त्यांच्या उरुसात सहभागी होत असत. मुस्लीमही दाखविण्यापुरते हिंदूच्या सणात सहभागी होत असत. पण प्रसाद खात नसत. आदिवासी महिलांबरोबर हे मुस्लीम निकाह करत असत. त्या मुस्लिमांऐवजी आदिवासी समाजाला नावे ठेवण्यात हिंदूंना धन्यता वाटत होती. हे म्हणजे दिव्याखाली अंधार! हा सल नानांना टोचत होता. त्यांनी जव्हारच्या रगेल तरुणांना भेटण्याचा सपाटा लावला.

भास्कर जोशी, नाना ओक, रघू अहीरे, वसंत सरदार, पवार, राम कापसे, अनंत आणि कृष्णा दिंडोरे, कृष्णा पिंपळे, बबन तेंडुलकर यांची फौज तयार केली. जव्हारबरोबर न्याहाळे, साखरे, वाळवंडा, ढेंगाची मेट या रानावनात शाखा बहरू लागल्या. या कार्याने प्रभावित जव्हार संस्थानचे राजे यशवंतराव मुकणे यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात उपस्थिती दर्शविली.

१९४७ साली भारताने स्वातंत्र्य मिळविले. बंडोपंतांना वाटले, पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवला, मग मी जव्हारची सीमा पार करू शकत नाही का? बंडू जोशीने भगवा ध्वज घेतला व तो जोशात डोंगर-दरी तुडवीत चालू लागला. चार रस्त्यावर आला. जायचे कुठे, हा प्रश्न पडला. डोळे मिटले. स्वतःभोवती गिरकी घेऊन थांबला आणि ‌‘ईश्वरी इच्छा बलीयसि‌’ मानून त्या दिशेने चालू लागला.

“राम राम, पाव्हणं. कुणीकडं?” बैल चारणाऱ्या खेडूताने हाक दिली.
“आपलेच गावात.”
“मंग आसं कसं? तथं वावराची वाट नागसं?” (वाट दिसते) “नगं, तुमा वाट गावायची नाय. मी यीतू.” त्या खेडूताने बैल खोडाला बांधले. डांगा टाकीत तो पाहुण्याकडे पोहोचला.
वैजल मास्तराकडं का?
हां, बंडूने पडत्या फळाची आज्ञा मानली. एका कौलारू झोपडीच्या अंगणात गायी-बैलांच्या ‌‘हम्माऽऽ‌’ने बंडूचे स्वागत झाले. गायीच्या हंबरण्याने वैझल मास्तर बाहेर आले. त्यांनी बंडूची चांगली हजेरी घेतली. बंडू परीक्षेत उत्तीर्ण झाला. “कवड्या, समदी बापे माणसानं अथ वाहर (बोलाव) यो पाव्हणं देस, धर्माचं काय सांगतू, बघू.” मास्तराच्या पडवीत जमलेले खेडूतसारखी लायकी नको बढायकी गाण्यावर ढोलले आणि मोखाड्यातील तोरणशेत गावी संघशाखेचे तोरण बांधले गेले. त्याचवेळी कर्मधर्मसंयोगाने दतात्रेय फडके हे नोकरीनिमित्त मोखाडा येथे रुजू झाले. दतुमास्तर आणि रामा वैझल मास्तर या जोडगोळीने नवसू वळवी, विष्णू वाजे, दतू कद्रे, दतू भावर, गंगाराम धांडगे असे पहाडी मित्र मिळविले. आठ-दहा मैल सहज पायी भ्रमंती करणाऱ्या या राकट मंडळींनी गबाल पाडा, बेरिस्ता, सडकवाडी गावात संघाच्या शाखा रोवल्या.

सिंधु सागराकडे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पालघर, डहाणू, तलासरी तालुके येतात. नाना पालकर यांचे पालघरशी जणू अतूट नाते होते. वसईवरून आगेकुच करीत त्यांनी १९४० साली पालघर परिसरात शाखेचे बीज पेरले. तेव्हा त्यांना सोबत मिळाली अप्पा दांडेकर, साठे बंधू, केशव गोखले अशा गौरवणय नितळ मनांच्या तरुणांची. डॉ. दातार, भट यांनी तारापूरला शाखेचे रोप लावले. पांडुरंग पाठकाने डहाणू येथे शाखेचे रोपण केले. अशा तऱ्हेने प्रत्येक स्थानी संघशाखेचा झंजावात सुरू झाला होता. परंतु १९४८ , गांधीवधाचे निमित्त साधून तत्कालीन काँग्रेस सरकारने संघावर बंदी आणली. झंजावात अचानक शांत झाला. तरुणांच्या हृदयात देशप्रेमाची, हिंदुत्वाची ज्वाला निर्माण करणारी संघाची भट्टी कायमची विझावी, ती पुन्हा कधीही चेतावू नये, म्हणून स्वयंसेवकांवर सरकारचे दमनचक्र फिरू लागले. कायदेशीर मार्गाने संघबंदीविरुद्ध सत्याग्रह करणाऱ्या स्वयंसेवकांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले. अनेकांच्या घरादारांची राखरांगोळी करण्यात आली. अशा वेळी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे संघ भरारी घेणार का, हा यक्षप्रश्न निर्माण झाला.

तलासरी तालुक्यात ख्रिश्चन मिशनरी आणि कम्युनिस्ट यांच्या कारवायांनी वनवासी समाज धर्मभ्रष्ट, अराष्ट्रीय होतो की काय, अशी स्थिती १९६५ पर्यंत निर्माण झाली होती. कल्याणच्या महापौरपदाचा त्याग करून माधव काणे तलासरीत आले. ‌‘विश्व हिंदू परिषदे‌’चे पहिलेच वसतिगृह सुरू झाले. त्या वसतिगृहात सात वनवासी विद्यार्थ्यांबरोबर १९६७ साली माधवराव काणेंनी संघप्रार्थना म्हटली.

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीवर्षात (१९८८-८९) गोपीनाथ भिमा अंभिरे हे शिक्षक प्रचारक म्हणून तलासरीत आले. तेव्हा सूत्रकार, गीरगाव, घिमानिया, दापचरी या गावांत विजयादशमी उत्सवात टिकाव, फावडे, नांगर या अवजारांचे शस्त्रपूजन झाले. त्यांनी सुधीर अंधेर, भास्कर रांधे, नवशा हाडळ यांच्या साथीने उथवा, संभा, तलासरी गावांत शाखा सुरू केल्या. अशा तऱ्हेने १९४१ ते १९८९ पर्यंत पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघशाखा सुरू झाल्या.

प. पू. श्री गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाने सत्याग्रह सुरू झाला. सत्याचा विजय झाला. काँग्रेस सरकारला बंदी उठवावी लागली. एका अग्निपरीक्षेत संघाने उभारी घेतली. हिंदू समाजाची कुचेष्टा, तिरस्कार, उपहास सहन करीत संघाची पावले पुढे पडत होती. १९६२ पर्यंत पालघरमध्ये श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक असो वा लग्नाची वरात, मशिदीच्या रस्त्यावरून सवाद्य जाऊ शकत नव्हती. संघबंदीचा धसका घेऊन हतबल झालेला हिंदू समाज धर्माध मुस्लिमांची अरेरावी निमूटपणे सहन करीत होता. हे दृश्य तारापूरच्या स्वयंसेवकांना अस्वस्थ करीत होते. डॉ. दातार, साठे बंधू, दामू गद्रे, जयराम पडघेकर, वासू पाटील इ. स्वयंसेवकांच्या सहकार्याने शंकर काणे आणि केशव गोखले यांनी निर्धार केला व १९६३च्या विजयादशमीला संघाचे सघोष संचलन मशिदीवरून ताठ मानेने गेले. भयभीत हिंदू समाज या घटनेने जागा झाला. परंतु कट्टरपंथीय अस्वस्थ झाले.

नेहमीप्रमाणे चिंचणी सायम शाखेवरून शंकर, केशवाची जोडी तारापूरला परतत होती. रात्री खाडी पुलाच्या एका टोकाला पोहोचले आणि एकाएकी ‌‘अल्ला हूँ अकबर‌’, ‌‘इन्शा अल्ला‌’च्या कल्लोळात त्यांच्यावर लाठी, काठी, सड्याचा मारा सुरू झाला. स्वतःला सावरण्याआधीच ते धाराशायी पडले.

“मारो, काटो, काम तमाम करो काफीरों का”

ते दोघे रक्तबंबाळ होऊन मृत्यूच्या द्वारी पोहोचले होते. “दोनो मर गए साले. पुलीस आई, भागो, भागो” तो क्रूर लांडग्यांचा कळप त्या दोघांना खोदलेल्या खड्ड्यात टाकण्याआधीच पसार झाला. ईश्वरकृपेने ते दोघेही मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर पडले. (याच शंकरने पश्चिमेकडून पूर्वेला धडक मारली, आज पूर्वांचलात ओझा शंकर विद्यालय देशभक्तीचे धडे देत उभे आहे.)

जागोजागी अशा विपरीत परिस्थितीमध्ये दृढतेने उभ्या राहिलेल्या स्वयंसेवकांच्या आधारे संघकार्य पुढे सरकत होते. राम धामापूरकर या प्रचारकाने चिंचणीच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून १९६५ साली धाकटी डहाणूच्या धर्मशाळेत शाखा सुरू केली, तेव्हा शाळेचे विस्तृत मैदानही अपुरे पडू लागले. १८७२ला महादेव नामजोशी, धनंजय, बाळू, मुकुंद, सुनील (सर्व निमकर), रमेश, किशोर, शांतिलाल (सर्व शाह) रघु काळे, बाबू, कैलाश (गावडे) या तरुणांनी आपल्या सफाळे गावातील शाखा फुलवून नंदाळे, नारोटा, सरावली गावात संघशाखेचा सुगंध पसरवला. पुढे अप्पा भडकमकर, श्रीकांत गोखले, हितेंद्र त्रिवेदी यांनी पालघर शहरात नव्या जोमाने शाखा सुरू केली.

ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडिया यांच्या तालमीत तयार झालेला अशोक तांडेल 1978ला डहाणूस आला. संघकाम डहाणू शहर व विशिष्ट वर्गात आहे, हे त्याच्या लक्षात आले. जनार्दन भांडारी गुरुजी व महेश कार्या यांचे मार्गदर्शन घेऊन त्याने गोपाळ तांडेल, पांडुरंग माळी, राजू गावड, रघुनाथ बारी, गोपीनाथ, हरेश्वर, वाशिदास, (अंभिरे), दिनेश मर्दे, दिलीप पागधरे या अरुण तरुणांची टोळी तयार केली. या टोळीने रक्षाबंधन, मकर संक्राती उत्सवानिमित ५०-६०किमी दुचाकीने प्रवास करून डहाणू गाव, डहाणू शहर, आगर, नरपड, वडकती, चिखला, चारोटी, कासा, सूर्यानगर, धाकटी डहाणू, तडियाळे, गुंगवाडा, बहाड, पोखरण, धुमकेत, वाणगाव, चिंचणी या स्थानी दैनंदिन शाखा सुरू करून जिल्ह्यात शाखावाढीची चढाओढ निर्माण केली.

तारापूरला शाम करवीर, बोईसरला दिलीप करवीर, तर सफाळ्यात सूर्यकांत रोकडे यांनी कर्मठपणे शाखा लावून धरल्या. वाडा शहरातील जयंत वाडेकर, अप्पा वाडेकर, भाऊ मनोरे, कोंडुनाना जाधव यांनी कंचाड, कुडूस, तिळसा, वरले या गावांत शाखेचा विस्तार केला. दीनानाथ रा. चंपानेरकर मनोर गावात आले आणि संघकार्यात नवउत्साह संचारला. दुर्गम वनवासी पाड्यात त्यांचा संचार होऊ लागला. त्यांनी भजनी मंडळाच्या संपर्कातून आलेल्या तरुणांना योग्य दिशा देऊन संघकामात सक्रिय केले. संघप्रेरणेतून सुरू झालेल्या वसतिगृहातील बंदिस्त शाखा, गावातील मोकळ्या मैदानात आणण्याचे महत्कार्य त्यांनी केले. जव्हारमध्ये दावजीभाऊ खोटरा यांने, तर मोखाड्यात वाळूदादा वैझल, अशोक बात्रा यांनी शाखेची धुरा सांभाळली. 83च्या तळजाई शिबिराला मोखाडा ते पुणे चालत जाणाऱ्या वनवासी स्वयंसेवकांचे कौतुक महाराष्ट्रभर झाले.

रामजन्मभूमी ते श्रीराम मंदिर वाटचाल

90च्या दशकात श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे अभियान देशभर सुरू झाले. एकात्मता यात्रा, रामजानकी यात्रा, श्री रामज्योत, पादुकापूजन, शीलापूजन अशा कार्यक्रमात नागरी, सागरी, डोंगरी क्षेत्रातील स्वयंसेवकांनी स्वतःला झोकून दिले. “अयोध्यामें परींदा भी पर नहीं मार सकता” अशी दर्पोक्ती ‌‘मुल्ला‌’यमसिंह यादवाने केली होती, तरी हजारो कारसेवक अयोध्येत दाखल झाले. डहाणूच्या सहा कोळी बांधवांनी शरयू पोहून पार केली व ते अयोध्येत दाखल झाले. बाबरी ढाँच्यावर भगवा फडकाविणाऱ्या कोठारी बंधूंचे बलिदान झाले. पण, हजारो वर्षाचा कलंक पुसला गेला. या अभियानामुळे संघशाखेचे काम दहा वर्षे मागे गेले, परंतु समाजात संघसंपर्काचे कार्य २० वर्षे पुढे गेले. या संपर्कामुळे अनेक हिंदू तरुण संघकामात जोडले गेले आणि सेवाकार्य तसेच संघशाखांचा नवा अध्याय सुरू झाला.

वाडा तालुक्यात अश्वथ, अमित हे पाळ बंधू आपले वैद्यकीय व्यवसाय सांभाळून बिपीन वाडेकर, मितेश पाटील या तरुणांच्या साथीने संघकामात कार्यरत आहेत. विक्रमगडात आदित्य आळशी, मधुकर मालकरी, संजय पारधी, बडगुजर, शरद दिवे, रवी गुजाड हे गड राखून आहेत. जव्हार आणि मोखाडा तालुक्यांत सौरऊर्जा, जलमिशन, आरोग्यसेवेद्वारे गावोगावी संपर्क करून विरेंद्र चंपानेरकर, राहूल खोटरा, राजेश कोरडा, राम व कृष्ण बात्रा बंधू, भानुदास खरपडे संघाचा परिचय करून दिला आता राजू फुफाणे, प्रकाश घाटाळ शाखा वाढ करीत आहेत. तलासरीत छगन वावरे गुरुजी, नरेश दौडा, विरु खोकर, राजेश रांधे संघशाखेचा किल्ला लढवत आहेत.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठे गाव म्हणजे सातपाटी (लोकसंख्या ३५ हजार). परंतु, या समाजवादी गावात २००० सालापर्यंत संघप्रवेश नव्हता. पालघरचे रवी रहाळकर सतत तीन-चार वर्षे त्या गावात प्रवास करीत राहिले. त्यांच्या जिद्दीला यश आले आणि सातपाटी गावातून योगेश पाटील, कुणाल धनु हे पालघर तालुक्याला कार्यवाह, सहकार्यवाह, तर राजेंद्र तरे आणि जितू पाटील हे जिल्हा कार्यकर्ते मिळाले. पालघरातील प्रकाश पाटील, परिचारक, जयेश राऊत, अशोक नायर, ऋषिकेश गणपती, रवी चौधरी, संजय कोकेरा यांचे संघकामातील योगदान न थकता चालू आहे.

बोईसर शहर म्हणजे लघुभारतच! विनोद बाजपेयीने भाऊ गावडे, अर्जुन पुरोहित, सोमनाथ सुरोसे, राकेश वैद्य, सागर कानिटकर, चिंतन कोरे या तरुणांशी घरगुती संपर्क राखून त्यांना संघकामात ठेवले आहे. त्यांना साथ मिळत आहे, ती डॉ. शिंदे, भानुदास जोगमार्गे यांच्या मार्गदर्शनाची. डहाणूत राजेंद्र लाडे व सुनील मेस्त्री या जोडगोडीने कमलेश मराठे, रोहन अभ्यंकर, मुकेश पागधरे, पंकज भरवाड, जिग्नेश कंसारा, निलेश अंभिरे, भानुदास मर्दे, अनिल बारी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्याची संघकार्यात जडणघडण केली. ज्योतिष मर्दे, निशांत दळवी, अजित डहाणूकर हे नवतरुण डहाणू तालुक्यातील संघशाखेचे काम जिल्ह्यात एक क्रमांकावर ठेवण्यास झटत आहेत.

संघशताब्दीवर्षामध्ये पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघशाखा सुरू आहेत. साप्ताहिक मिलन, मासिक एकत्रिकरणाच्या माध्यमाने आणि सेवाकार्याच्या विस्तारित जाळ्यांमुळे पालघर जिल्हातील प्रत्येक मंडल स्थानात संघ पोहोचेल, असा विश्वास हिंदू समाजाची संघविचार स्वीकारार्हता आणि स्वयंसेवक कार्यकार्त्याच्या संघनिष्ठेमुळे वाटतो.

(१०२ मंडलांपैकी संघशाखा, साप्ताहिक मिलन, संघमंडळीद्वारे ७२ मंडलांत संपर्क आहे, तर अन्यान्य सेवाकार्यानिमित्त संपर्क सर्व मंडले संपर्कित झाली आहेत.)

दरी-खोऱ्यात, वनांत संघशाखांचा प्रवेश झाला आणि स्वयंसेवकांना तेथील शिक्षण, आरोग्य, आर्थिक, समस्यांची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली. चिंतेतून चिंतन, चिंतनाने सेवाकार्याला मूर्त स्वरूप येत गेले. माधवराव काणे, वसंतराव पटवर्धन, दामुअण्णा टोकेकर यांना साथ मिळाली, ती नवसूदादा वळवी, अंधेर गुरुजी, दादा वाडेकर, नाना चंपानेरकर, बंधू चौधरी आणि असंख्य स्वयंसेवकांची. १९६९ साली सात वनवासी विद्यार्थ्यांना घेऊन माधवाने कम्युनिचांच्या बालेकिल्ल्यात वसतिगृहाचा पाया रोवला. आज १२ वसतिगृहे, चार निवासी शाळा, सहा विद्यालये असा विस्तार झाला आहे. किंबहुना वनवासी समाजातील ही शैक्षणिक प्रगती. या कम्युनिस्टांना सहन झाली नाही. बरोबर २० वर्षांनी तलासरीच्या केंद्रावर या नीचांनी प्राणघातक हल्ला केला. जाळपोळ केली. साहजिक हिंदू समाजामध्ये संतापाची भावना उसळली. त्यांपैकी एक व्यक्ती प्रतिशोध घेण्याच्या हेतूने नंगी तलवार घेऊन वसतिगृहात आला. माधवरावांनी त्याच्या हातातील शस्त्र काढून घेतले. त्याला समजावताना ते म्हणाले, “अशोक, आपणही बदलाच्या भावनेने अनाचार केला, तर त्यांच्यात आणि आपल्या विचारांत काय फरक राहणार? तेही आपलेच बांधव आहेत. पुढे ईश्वरी कार्य कृपेने अप्पा जोशी, वसुधाताई, हरेश्वर वणगा यांना यमाने जीवन दान दिले.”

या संकटाला संधी मानून सुरू झाला. एकल विद्यालय प्रकल्प-एक अनौपचारिक शिक्षण. गावातील युवक, युवतींना प्रशिक्षित करणे आणि त्यांनी आपल्याच गावात पडवीत, झाडाखाली, सोयीप्रमाणे लहान मुलांना गोळा करायचे. हसत-खेळत लिहायला वाचायला शिकवायचे. आजमितीला ३५० गावांत अशी एकल विद्यालये शिक्षणाचा प्रसार करीत आहेत. वसंतराव पटवर्धन यांनी ‌‘प्रगती प्रतिष्ठान‌’द्वारा जव्हार येथे दिव्यांग विद्यालय सुरू केले होते. त्यांच्या पत्नी सुनंदाताईंचे स्त्रियांची ही दैना पाहून डोळे पाणावले. या पाणावलेल्या डोळ्यांनी एका प्रकल्पाला जन्म दिला, ‌‘इतोक्टिक पंप, सौरपंपाद्वारे नळ योजना.‌’ आतापर्यंत १५० गावांत ही नळयोजना कार्यान्वित झाली आहे. किमान ४० हजार महिलांची पाण्यासाठी चालत जाण्याची वणवण थांबली.

‌‘केशवसृष्टी‌’ (भाईंदर)ची दृष्टी या भागात पडली. वनवासी नेतृत्व उभे राहावे, या हेतूने १०० गावांत ‌‘विवेकानंद केंद्र‌’ स्थापन केले. बांबू प्रशिक्षणातून तयार झालेल्या राख्या, आकाश कंदील यांची विक्री धुमधडाक्यांत होत आहे. ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडिया यांनी या सर्व कामांत स्वतःला वाहून घेतले आहे. शताब्दीनिमित्त १०० ग्रामे विकासाचा संकल्प आहे, तो लवकरच पूर्ण होईल. ‌‘सेवा सहयोग‌’द्वारे ४० गावे स्वयंपूर्ण व्हावीत, असा प्रयत्न प्रत्यक्ष सुरू झाला आहे. २५० आरोग्यरक्षक आरोग्याची काळजी घेत आहेत.

ख्रिश्चन, इस्लामी पंथीयांची आक्रमकता ही संपूर्ण हिंदुस्थानची समस्या आहे. त्यात पालघर जिल्हा वनवासी. वर्षानुवर्षे ‌‘राम राम‌’ करणारा समाज रावणदहनाऐवजी रावणपूजन करू लागला. “आम्ही हिंदू नाही,” म्हणू लागला. वनवासी बांधवात खळबळ उडाली. मंथन सुरू झाले, ‌‘जनजाती विकास मंच‌’रूपी रत्न बाहेर आले. जनजाती समाजातीलच उच्च शिक्षित बांधव विचारू लागले, “बापजाद्यापासून राम राम म्हणणाऱ्याचे ऐकायचे की ज्यांचा आमच्या संस्कृती परंपरेशी नाते नाही, या उपटसुंभाचे ऐकायचे?” परंपरागत बोहाडे पुन्हा नव्या जोमाने गाजू लागले. कनसेरी माता, हिमाय, हिरवा देव, महालक्ष्मी, वाघोबा ही नव्या पिढीकरिता श्रद्धेय दैवते झाली आहेत. पाड्यापाड्यांत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव भक्ती जागवत आहे.

संघस्वयंसेवकांनी सुरू केलेली सर्व सेवाकार्ये समाजाच्या सक्रिय सहभागाने वर्धिष्णू होत आहेत. येथील जनजाती तसेच सर्वसामान्य हिंदू समाज शिक्षित, सबल, स्वावलंबी बनत आहे. आता हा हिंदू समाज देशविघातक षड्यंत्राला बळी न पडता, राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात आपले योगदान देत आहे. “सब समाज को लिए साथ में, आगे है बनते जाना” या सूत्राने समाजरूपी संघ पुढेच जात राहणार आहे!

- गोपीनाथ भिमा अंभिरे