संघाची सहकार क्षेत्रातील गाथा - विकास, संघर्ष व आत्मीयता

    01-Oct-2025
Total Views |


भारतीय समाजजीवनात ‌‘सहकार‌’ ही संकल्पना ऋग्वेदीय परंपरेपासून अधोरेखित होत आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या तत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून समाजजीवनात एकोपा, सेवा आणि आत्मनिर्भरता यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. संघप्रेरित ‌‘सहकार भारती‌’सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण विकास, शेतकरी सबलीकरण आणि सामाजिक परिवर्तनात सहकार हा प्रभावी मार्ग ठरत आहे. प्रस्तुत लेखात संघाचा सहकारविषयक दृष्टिकोन आणि त्याचे योगदान याचा आढावा घेतला आहे.


संगच्छध्वं संवदध्वं सं वो
मनांसि जानताम्‌
देवा भागं यथा पूर्वे सञ्जानाना उपासते॥
(ऋग्वेद-१०.१९१.२)
अर्थात, आपण सर्वांनी एकाच दिशेने एकत्र जावे, एकाच स्वरात बोलावे, आपले मन एक व्हावे, विचार एकसमान व्हावेत. प्राचीन काळी देवतांनी असेच एकोप्याने काम केले होते, त्यामुळे ते वंदनीय आहेत.


भारतवर्षाच्या सर्वात प्राचीन ग्रंथातील म्हणजे ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील हे सूक्त. एकोपा, संघटन आणि साहचर्याचे महत्त्व रुजवणारा हा मंत्र. सर्वांनी सुसंघटितपणे एका दिशेने एकत्र विकास साधायचा प्रयत्न केला, तरच सशक्त व बलवान समाज निर्माण होतो, हे आपले पूर्वज जाणत होते आणि हेच अमूल्य तत्त्वज्ञान भारतभूमीमध्ये पुनः प्रस्थापित करून हिंदू समाजाला संघटित, बळकट व वैभवशाली करण्यासाठी आजपासून १०० वर्षांपूव १९२५ साली विजयादशमीच्या शुभदिनी पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन ‌’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ‌’ नावाचे एक बीज रोवले आणि आज त्या बीजाच्या अनेक पारंब्या असलेला एक विशाल वटवृक्ष झाला आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हिंदू धर्माची मूलतत्त्वे, हिंदू संस्कृती, परंपरा, विचारधारा खऱ्या अर्थाने जगणाऱ्या व्यक्तींचे निर्माण, त्यातून एक सशक्त, सुसंस्कारित व सुदृढ समाजनिर्माण आणि पर्यायाने समृद्ध व बलाढ्य राष्ट्र निर्माण करण्यासाठी कार्यरत असणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संपर्क, संवाद, सहवास, समन्वय, संस्कार, समरसता आणि संघटन या सोपानांवरून पुढे पुढे जात आपले समृद्ध व संघटित भारत, राष्ट्रउभारणीचे ध्येय गाठण्यासाठी गेली १०० वर्षे निरंतर कार्यरत असणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. नागपूरमध्ये काही मोजक्या कार्यकर्त्यांसह चालू झालेल्या संघाच्या आज विविध क्षेत्रांत सखोल कार्य करण्यासाठी भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, सेवा भारती, विद्या भारती, संस्कृत भारती, स्वदेशी जागरण मंच, अखिल भारतीय विद्याथ परिषद, हिंदू स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिति, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्रीय मुस्लिम मंच, संस्कार भारती, प्रसार भारती, विज्ञान भारती, डिजिटल भारती, स्वामी विवेकानंद सेवा समिती, समर्थ भारत, एकल विद्यालय, स्व-रूपवर्धिनी, दुर्गा वाहिनी, संस्कृती संवर्धन संस्था, बालगोकुलम, आरोग्य भारती, प्रबोधन मंच, जनकल्याण समिती, भारतीय शिक्षण मंडल सेवा सहयोग आणि सहकार भारती अशा अनेक संस्था अहोरात्र झटत आहेत. संघ आणि त्याचे कार्य हा विषयच एवढा व्यापक आहे की असे कित्येक लेख अन्‌‍ कित्येक ग्रंथ लिहिले, तरी कमी पडतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूतच्या निमित्ताने या वटवृक्षाच्या एका शाखेची म्हणजे सहकार क्षेत्रातील योगदानाची आपण या लेखात चर्चा करू. मुळात सहकार म्हणजे काय, आधुनिक भारतातील सहकार चळवळीचे स्वरूप कसे आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहकारविषयक दृष्टिकोन नेमका काय आहे, संघाची सहकार क्षेत्रातील अभिव्यक्ती कशी आहे आणि त्यांचा आजवरचा प्रवास, याअनुषंगाने हा लेखनप्रपंच...


सहकार चळवळीची संकल्पना


सहकार म्हणजे नेमके काय? सहकार म्हणजे एकत्र येऊन, परस्परांना साहाय्य करून, सामूहिक हित लक्षात घेऊन काम करणे. जेथे व्यक्ती, कुटुंबे किंवा समाजाचे छोटे गट आपल्या स्वार्थापुरते न जगता परस्परांवर विश्वास ठेवून, समान हक्कांनी, समान जबाबदारीने व समान फायद्यासाठी काम करतात, त्या व्यवस्थेला सहकार क्षेत्र (Co-operative Sector) म्हणतात. त्यातही विशेषतत्वाने म्हणायचे तर ही संकल्पना आर्थिक आणि सामाजिक विकासाशी अधिक निगडित आहे. समानता, लोकशाही तत्त्वे, सामाजिक बांधिलकी, स्वावलंबन, परस्पर सहकार्य आणि सामूहिक विकास यांवर आधारलेली आर्थिक-सामाजिक व्यवस्था म्हणजे सहकार चळवळ. भारतासारख्या मोठा भौगोलिक आकार असलेल्या, विविधतेने नटलेल्या, अधिक लोकसंख्या असलेल्या विकसनशील कृषिप्रधान देशात सहकार क्षेत्र हे शेतकरी, लहान व्यापारी, कामगार, युवक आणि महिलावर्ग यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही भारताच्या ग्रामीण विकासाचा कणा मानली गेली.


खरे पाहता, भारतीय समाजरचनेत सहकार ही संकल्पना नवी नाही. परस्पर साहाय्य, एकमेकांच्या संकटात धावून जाणे, सामूहिक श्रम करून सामूहिक हित साधणे ही वृत्ती भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून आहे. इंग्रज भारतात येण्यापूवच्या भारतीय ग्रामव्यवस्थेचा अभ्यास केला, तर आपली स्वयंपूर्ण खेडी, बारा बलुतेदार पद्धती, शेतकऱ्याला म्हणजे बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून त्यास साहाय्य करणाऱ्या बलुतेदारांना आणि अलुतेदारांना मिळणारे ठराविक वेतन, एकूणच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था सहकार तत्त्वावरच चालत असे. मात्र, आपली भारतीय अर्थव्यवस्था भारतीय संस्कृती, भारतीय विचारधारा समाजव्यवस्था, ग्रामव्यवस्था यांना अनुरूप होती. ‌‘सहकार‌’ नावाखाली वेगळी एखादी चळवळ येथे नव्हती, तर संपूर्ण समाजव्यवस्थाच ‌’सर्वे भवन्तु सुखिनः‌’ या विचारावर आधारलेली होती.


त्यामुळे आधुनिक अर्थाने भारतात सहकार चळवळ उभी राहिली, ती 20व्या शतकात. 19व्या शतकात इंग्लंडमध्ये चालू झालेल्या ‌‘रॉचडेल पायोनियर्स‌’ या सहकारी संस्थेच्या आदर्शावर ती येथे आली. ब्रिटिश राजवटीत शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकले होते. कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी शेतकऱ्यांना स्वस्त व्याजाने कर्ज मिळावे, त्यांना उत्पादन साधने मिळावीत, या उद्देशाने 1904 मध्ये सहकारी पतसंस्था कायदा (को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ॲक्ट) आला. या कायद्याने भारतातील सहकारी पतसंस्था सुरू झाल्या. यालाच भारतातील सहकार चळवळीची औपचारिक सुरुवात मानली जाते. १९१२ मध्ये सहकारी संस्था कायदा (को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट) आला. यामुळे केवळ पतसंस्था नव्हे, तर इतर उत्पादन, विपणन आणि ग्राहक सहकारी संस्थाही स्थापन होऊ लागल्या.


स्वातंत्र्यानंतर या चळवळीला नवा वेग मिळाला. भारत सरकारने सहकाराला केवळ आर्थिक व्यवहारासाठी मर्यादित न ठेवता, सहकार हे ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन आहे, अशी भूमिका घेतली. पंचवार्षिक योजनांमध्ये सहकार क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांना खतं, बियाणं, कर्जपुरवठा करणाऱ्या सहकारी पतसंस्था, सहकारी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने, दुग्धसंघ, कुक्कुटपालन केंद्र, शिक्षणसंस्था, रुग्णालये, महिला बचतगट, स्वयंरोजगार प्रकल्प आदी विकासाच्या चळवळी उभारण्यासाठी योजना बनविल्या. भारताच्या ग्रामीण भागाचा सहकारातून विकास व्हावा, ही कल्पना निश्चितच उत्तम होती. परंतु, कल्पना कितीही उत्तम असली, तरी त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल, यावरच त्या कल्पनेचे यशापयश अवलंबून असते. दुर्दैवाने शेतकरी, कामगार, लघुउद्योजक, महिला, युवक या सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या श्रमातून, कष्टातून आणि परस्पर साहाय्यातून उभ्या राहणाऱ्या संपन्नतेला दृष्ट लागली भ्रष्टाचार, गैरव्यवहार, व्यवस्थापनातील त्रुटी, राजकीय हस्तक्षेप आणि अपारदर्शकतेची. साम्यवादाच्या नावाखाली आणि भांडवलशाहीचा बागुलबुवा दाखवीत, अनेकांनी सहकार क्षेत्राला अक्षरशः लुबाडले. भारतीय सहकार क्षेत्रातील हे वैषम्य दूर करण्यासाठी पुढे आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऋत्विज!


संघाचे सहकार क्षेत्रात औपचारिक पदार्पण़


हिंदू समाजाचे संघटन आणि राष्ट्रीयत्वाचा अंगीकार या दोन मूलभूत गोष्टींसाठी पूजनीय डॉक्टरांनी हे बीज रोवले. जिथे संघटन आले, तिथे परस्पर सहकार्य, सहकार आलेच. सहकाराविना ‌‘संगच्छध्वं‌’ कसे शक्य होईल? त्यामुळेच परस्पर सहकार्य, सहकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पायाभूत तत्त्वात अभिप्रेतच आहे. संघाशी संबंधित प्रत्येक संघटना संपर्क, सहकार्य व समन्वय मार्गानेच चालते. तरीही आधुनिक संकल्पनेच्या दृष्टीने पाहिले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार क्षेत्राच्या संघटनात्मक बांधणीचा शुभारंभ १९७८ सालच्या गणेश चतुथच्या मुहूर्तावर झाला. या दिवशी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव गोडबोले यांनी पुण्यात ‌‘सहकार भारती‌’ची सुरुवात केली. भारतातील सहकार क्षेत्रात असलेला भ्रष्टाचार आणि त्यामुळे एका सर्वोपयोगी संकल्पनेचा होत असलेला दुरुपयोग जर काढून खऱ्या अर्थाने अंत्योदय व्हावे, असे वाटत असेल, तर त्यात प्रामाणिक व्यक्तींनी येण्याची गरज आहे, हे माधवरावांनी ओळखले होते. १९३५ साली त्यांनी यादृष्टीने सांगली येथे जनता सहकारी बँकदेखील चालू केली होती. सहकार हा केवळ आर्थिक प्रयोग नसून सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आहे. हा मार्गे स्वीकारून समाजाच्या दुर्बल घटकांना आधार देण्याचा प्रयत्न अधिक व्यापक, पारदर्शक व स्वायत्त पद्धतीने केला, तर सहकार क्षेत्र भारताच्या विकासयात्रेत एक मोठा आधारस्तंभ ठरेल. हे जाणून गणेश चतुथला आरंभिलेल्या ‌‘सहकार भारती‌’ला अधिक मजबुती देण्यासाठी आणि ती एक राष्ट्रव्यापी संघटना व्हावी, म्हणून दि. ११ जानेवारी १९७९ रोजी मुंबई येथे अधिकृत रितीने ‌‘सहकार भारती‌’चे कार्य चालू झाले.


विना संस्कार नाही सहकार


स्वतंत्र भारतातील सहकार चळवळीला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले होते. हे लक्षात घेऊन या कामात संस्कारक्षम व्यक्ती जोडले जाण्याची आवश्यकता होती. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती जर प्रामाणिक, निष्ठावंत, राष्ट्रीयत्वाची जाणीव असणाऱ्या असतील, तरच या चळवळीची पाळेमुळे मजबूत राहतील, याची संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जाणीव होती. संस्कारी व्यक्तिनिर्माण हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उद्दिष्टांपैकी एक. त्यामुळे ‌‘विना सहकार नाही उद्धार‌’ या मंत्राला


संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांनी ‌‘विना संस्कार नाही सहकार‌’ या पंक्तीची जोड दिली आणि ‌‘सहकार भारती‌’चा मूलमंत्र झाला, ‌‘विना संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही उद्धार॥‌’ चळवळीचे महत्त्व, त्यातील अडचणी आणि उपाय हे तिन्ही किती साध्या-सोप्या मात्र प्रभावी शब्दांत मांडले आहे.


कार्याचे स्वरूप


शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), शेतकरी गट, साखर कारखाने, दूध संघ यांना संघटित करणे, शेतमालाला बाजारभाव मिळावा, मधल्या दलालांचे शोषण थांबावे यासाठी मार्गदर्शन, सेंद्रिय शेती, बीजोत्पादन, थंडगार गोदामे उभारणी यासाठी सहकारी चळवळीत नवनवे प्रयोग करणे, पतसंस्था, सहकारी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या यांना पारदर्शक व्यवस्थापनाचे धडे, बचत आणि गुंतवणूक संस्कार ग्रामीण भागात रुजवणे, लघु व मध्यम उद्योगांना सहकारी स्वरूपात प्रोत्साहन, ग्रामीण भागात सहकारी गिरण्या, हॅण्डलूम-पॉवरलूम सहकारी संस्था, दुग्धजन्य उत्पादन गट, सहकारी शाळा, तांत्रिक शिक्षण संस्था, प्रशिक्षण शिबिरे, युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी सहकार आधारित कौशल्य विकास प्रकल्प, महिला बचतगट, स्वयंरोजगार प्रकल्प, घरगुती उद्योगांना सहकारी पाठबळ, महिलांना व्यवस्थापन कौशल्य व नेतृत्व घडविणे यासाठी प्रामुख्याने ‌‘सहकार भारती‌’ कार्यरत आहे.


सहकार क्षेत्राचा पाया म्हणजे लोकजागृती. लोकप्रबोधन आणि वैचारिक बदल याशिवाय दूरगामी व शाश्वत परिणाम होणे शक्य नाही, हे संघ कार्यकर्ते जाणत होते. म्हणून स्थानिक उत्पादकांना, महिलांना व शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक बळ देत असतानाच त्यांच्या मनात ‌’सहकार‌’ तत्त्वज्ञान जागवणे, ‌‘विना संस्कार नाही सहकार‌’ हा मंत्र लोकांच्या मनात रुजवण्यावर संघाने विशेष भर दिला. केवळ समित्या उभारणे एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता, गावोगावी बैठका, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून शेतकरी व महिलांना सहकाराची माहिती दिली. अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान यांसारख्या राज्यांत अशी अनेक जिल्हास्तरीय अधिवेशने झाली आहेत.


सहकार चळवळीचा विस्तार


पुण्यात चालू झालेल्या या संस्थेचे जाळे आज महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, ईशान्य भारत अशा अनेक राज्यांत पसरलेले आहे. याचे लहानसे उदाहारण द्यायचे झाल्यास जळगाव जनता सहकारी बँकेचे देता येईल. १९७९ साली ‌‘सहकार भारती‌’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांनी जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना केली. आज या बँकेच्या राज्यभरात ३४ शाखा असून खान्देशातील पहिली शेड्ल्युल्ड बँक म्हणून या बँकेचा लौकिक आहे. एवढेच नाही, तर त्यांनी ‌‘केशवस्मृती प्रतिष्ठान‌’ या सेवाभावी उपक्रमाचा आरंभ केला. ‌‘विवेकानंद प्रतिष्ठान‌’ शालेय उपक्रम, ‌‘मातोश्री‌’ वृद्धाश्रम, ‌‘क्षुधाशांती झुणका भाकर संस्था‌’, ‌‘मांगीलालजी बाफना नेत्रपेढी‌’, ‌‘माधवराव गोळवळकर रक्तपेढी‌’, ‌‘संस्कार केंद्र‌’, ३ हजार, ४०० बचतगट असे अनेक सामाजिक उपक्रम ते आज राबववत आहेत. हे तर एक छोटेसे उदाहरण. संघाच्या सेवाकार्याच्या महासागरातील हे काही थेंब. अशी विविध अभियाने भारतभर चालू आहेत.


राष्ट्रीय सेवा भारती


‌‘राष्ट्रहित सर्वोपरि‌’ या संघाच्या बीजमंत्राला प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारी अजून एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्था म्हणजे राष्ट्रीय सेवा भारती. देशभरातली तळागाळातील, आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या, उपेक्षित, अशा समुदायांच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन या तीन स्तरांवरील उत्थानासाठी दि. ८ डिसेंबर २००३रोजी याची स्थापना झाली. विविध स्वयंसेवी संस्थांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य ही संघटना करते. वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जागृती, अध्ययन आणि प्रशिक्षण यांच्या माध्यमातून एक प्रगत, समरस, संस्कारित आणि शारीरिक, आर्थिक व मानसिक या तिन्ही दृष्टींनी सशक्त समाज निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा भारती कार्यरत आहे. प्राचीन मूलतत्त्वांचा पाया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार असा संगम आपल्याला यांच्या कार्यात दिसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय सेवा भारतीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे यशस्वी प्रयोग देशभरात झाले. या प्रयोगांच्या खऱ्याखुऱ्या कथा सर्वांसमोर आणण्यासाठी www.sewagatha.org सेवागाथा वेबसाईट तयार केली गेली. याशिवाय नैसर्गिक संकटाच्या काळात राष्ट्रीय सेवा भारतीशी निगडित संस्था कायम सक्रिय असतात.


नेपाळमधील भूकंप असो, आसाममधील बराक खोऱ्यातील वादळ असो, केरळमध्ये आलेला पूर असो, ‌‘राष्ट्रीय सेवा भारती‌’ने पुनर्वसनाचे मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. आधुनिक व पाश्चिमात्य तत्त्वांवर आधारित ‌‘सहकार‌’ या संकल्पनेपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‌‘सहकार‌’ ही संकल्पना इथे खऱ्या अर्थाने वेगळी आणि अधिक समृद्ध ठरते. ‌‘वसुधैव कुटुम्बकम्‌‍‌’ असे म्हणणाऱ्या हिंदू विचारधारेनुसार संघाचे सहकारतत्त्व हे केवळ आर्थिक बाबींशी निगडित न राहता व्यापक व सेवाधिष्ठित आहे. राष्ट्रीय सेवा भारती ही त्याची अभिव्यक्ती आहे.


अक्षयश्री अभियान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलताना केरळमध्ये त्यांनी चालविलेल्या ‌‘अक्षयश्री अभियाना‌’चा विशेष उल्लेख करायला हवा. केरळमध्ये भारतातील अन्य राज्यांपेक्षा राजकीय आणि सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. तेथे ख्रिस्ती धर्माचा प्रचंड पगडा आहे. धर्मांतरण हा तेथील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधील तळागाळातील, वंचित लोकांचे आर्थिक व मानसिक पुनरुत्थान करणे हे मोठे आव्हान होते. केरळमध्ये ‌‘सहकार भारती‌’ने २००१ मध्ये आपले कामकाज सुरू केले. संघर्ष, कडवट अनुभव, काही ठिकाणी अपयश, अनेक अडचणी येऊनसुद्धा आपल्या ध्येयापासून विचलित न होता ‌‘सहकार भारती‌’ तेथे प्रयत्न करतच राहिली हळूहळू हळूहळू ‌‘सहकार भारती‌’चे प्रामाणिक प्रयत्न तेथील लोकांना जाणवू लागले. त्यांनी २०११ मध्ये चालू केलेले ‌‘अक्षयश्री अभियान‌’ हे या प्रामाणिक प्रयत्नांचेच गोड फळ आहे. २०१० मध्ये स्वयंसेवी गटांद्वारे त्यांचे उपक्रम विस्तारण्यासाठी त्रिशूरमध्ये ‌‘अक्षयश्री परस्पर साहाय्य सुस्थिर विकास मिशन‌’ची (अक्षयश्री म्युच्युअली एडेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिशन) स्थापना करण्यात आली आणि २०११ मध्ये त्रिशूरमध्ये पहिली ‌‘अक्षयश्री‌’ची स्थापना करण्यात आली. २००१ मध्ये चालू केलेल्या प्रयत्नांना आज २५ वर्षांनी यश मिळत आहे. आज ‌‘अक्षयश्री‌’ची सुमारे २५ हजार युनिट्स आहे. समृद्धी स्टोअर्स ही संकल्पना ‌‘सहकार भारती‌’ने तेथे उभी केली. केरळमध्ये शेकडो स्टोअर्स उघडण्यात आली आहेत आणि पुढील काही वर्षांत १ हजार, ५०० स्टोअर्स उघडण्याचे उद्दिष्ट आहे. या स्टोअर्समध्ये महिलांचे स्व-साहाय्यता गटाने तयार केलेली उत्पादने, तसेच शेतकरी, कारागीर यांच्या वस्तूंना थेट बाजारपेठ मिळते. यामुळे ग्रामीण उत्पादकाला योग्य किंमत व शहरी ग्राहकाला शुद्ध माल असे दोघांचेही हित साधले जाते.


सहकार मंत्रालय


गेली कित्येक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार क्षेत्रात चालू असलेले निरंतर प्रयत्न आणि प्रामाणिक मेहनतीला आता शासकीय आधारदेखील मिळू शकतो. दि. ६ जुलै २०२१ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. हे मंत्रालय केवळ धोरणात्मक पातळीवर कार्यरत नसून सहकारातून समृद्धी या विचारसरणीला ते मूर्त स्वरूप देत आहे. सहकार मंत्रालयाने तीन वर्षांत जवळपास ५० महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. ‌‘आंतरराष्ट्रीय सहकारी परिषद ग्लोबल कॉन्फ्ररन्स २०२४’चे प्रथमच भारतात आयोजन करण्यात आले. सहकार क्षेत्राच्या गेल्या १३० वर्षांतील ही एक ऐतिहासिक घटना आहे.


स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चालू झालेल्या सहकार चळवळीचे स्वरूप बदलत जाऊन ती एक भ्रष्ट प्रणाली होऊ लागली होती, तिला बदलून एक स्वच्छ, प्रामाणिक सहकार प्रणाली निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अथक प्रयत्न करत आहे.


व्यष्टि, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी असा विकासाचा मार्ग सांगत
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः|
सर्वे सन्तु निरामयाः|
सर्वे भद्राणि पश्यन्तु|
मा कश्चिद्‌‍ दुःखभाग्भवेत्‌
अशी वैश्विक प्रार्थना करणाऱ्या हिंदू तत्वज्ञानवर आधारित ‌‘सहकार‌’ या संकल्पनेचा आधार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऋत्विज सशक्त राष्ट्रनिर्माण कार्यासाठी १०० वर्षच नाही तर अखंड कार्यरत राहतील यात शंका नाही.


- सी. ए. डॉ. केतन जोगळेक
(लेखक ‌’सहकार भारती‌’ पुणे महानगर बँकिंग प्रमुख आहेत)