राष्ट्रजीवनात सतत बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेत, अखंड वाढत राहिलेली जगातील एकमेव संघटनात्मक प्रयोग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 1925 मध्ये नागपूरच्या विजयादशमीच्या शुभदिनी सुरू झालेला संघ आज जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून उभी आहे. गेल्या 100 वर्षांच्या या प्रवासात संघाने उपेक्षा, उपहास, स्वीकृती आणि सहभाग अशा क्रमाने मार्गक्रमण केले. तरीही संघाची मूळ प्रेरणा, राष्ट्रहित सर्वोपरि, कधी ढळली नाही.
संघाचा शताब्दीचा प्रवास सतत विस्तार, कार्यपद्धतीतील मौलिकता आणि अढळ दृढनिश्चयाचा राहिला आहे. प्रारंभीच्या काळात काही उदासीनता, उपहास, प्रतिकार आणि विरोध सहन करावा लागला. पण, अथक परिश्रम, समर्पण, कार्यकर्त्यांचे बलिदान, समाजाचा अढळ पाठिंबा आणि दैवी आशीर्वाद यांमुळे संघ आपल्या ध्येयमार्गावर अविचल राहिला. काळाच्या ओघात समाजाकडून वाढणारा पाठिंबा आणि सहभाग हीच या कार्याची खरी फलश्रुती ठरली.
2025 सालच्या विजयादशमीला संघ आपल्या प्रवासाची 100 वर्षे पूर्ण करेल. यानिमित्ताने संघाचे उद्दिष्ट केवळ भूतकाळाचा गौरव सांगणे नाही, तर ‘’ या ध्येयाच्या माध्यमातून कार्याचा विस्तार, अधिकाधिक नागरिकांना थेट संघाशी जोडणे आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आहे.
या संपूर्ण कार्यपद्धतीचा केंद्रबिंदू म्हणजे शाखा. शाखा ही केवळ एकत्र येण्याची जागा नाही, ती भारतीय समाजाच्या आदर्शांच्या स्मृतींना जपणारी आणि सामूहिक सद्गुणांना प्रोत्साहन देणारी एक परिवर्तनकारी प्रयोगशाळा आहे. खेळ, शारीरिक प्रशिक्षण, लाठी, योगासन, नियुद्ध, बौद्धिक चर्चा अशा उपक्रमांमधून एकात्मता, शौर्य, संयम आणि राष्ट्रभावना यांचा विकास होतो. शाखेच्या या वातावरणातून स्वयंसेवकांमध्ये खोलवर रुजलेली आपलेपणाची भावना आणि आजीवन राष्ट्रसेवेची वचनबद्धता निर्माण होते.
हजारो स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ कार्यातून आणि त्यागातून संघटनेने समाजात जे बळ निर्माण केले, त्यातून सेवा, शिक्षण, संस्कार, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक सलोखा, राष्ट्ररक्षण आणि जागतिक हिंदू एकतेपर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय वाटचाल घडली.
संघाचा इतिहास अनेकांना आकर्षित करतो, कारण त्यात दृढ निश्चय आणि संघस्थापनेच्या आदर्शांप्रति अविचल निष्ठा सामावलेली आहे. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होत आलेली आहे. गेल्या शतकभरात संघाने भारतातील जवळजवळ प्रत्येक ऐतिहासिक आणि समकालीन घडामोडींचे साक्षीदार तसेच सहभागी म्हणून स्थान मिळवले आहे. ही कालरेषा केवळ तारखांची यादी नाही, ती एका राष्ट्रसेवी आंदोलनाची कहाणी आहे.
1925-1929 : प्रारंभ आणि पायाभरणी डॉ. केशवराव बळीराम हेडगेवारांनी दि. 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपुरात संघाची स्थापना केली. हिंदू समाजातील असंघटितपणा दूर करून सजग, शिस्तबद्ध आणि एकात्मिक स्वरूप उभे करण्याचे हे त्यांचे ध्येय होते. सुरुवातीच्या दिवसांत सुटीच्या दिवशी शारीरिक व्यायाम, संचलन, तसेच राष्ट्रीय विषयांवरील चर्चा यांचा समावेश होत असे.
1926 : नवीन संघटनेच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी दि. 17 एप्रिल रोजी एक बैठक झाली, ज्यामध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे नाव म्हणून स्वीकारले गेले. या बैठकीचे आयोजन डॉ. हेडगेवारांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. त्यावेळी संघटनेसाठी विचाराधीन असलेली इतर नावे होती, ‘जरिपटका मंडळ’, ‘भारतोद्धारक मंडळ’ आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चर्चेनंतर अंतिम झाले.
दि. 28 मे रोजी पहिली नित्य शाखा भगव्या ध्वजाला अभिवादन करून मोहिते वाड्यात (नागपूर) सुरू झाली. शाखेत लाठी किंवा दंडाचा वापर सुरू झाला. तसेच ‘दक्ष’ आणि ‘आरम’ अशा आज्ञा प्रथम दिल्या गेल्या. त्याच वष पहिले पथसंचलन आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये 30 स्वयंसेवक सहभागी झाले.
1927 मध्ये अधिकारी प्रशिक्षण शिबीर (ओटीसी) सुरू झाले. पुढे या शिबिरांतून हजारो कार्यकर्ते घडले.
1928 मध्ये प्रथमच गुरुदक्षिणा उत्सव पार पडला. त्याच वष शपथविधी (प्रतिज्ञा) पद्धत सुरू झाली.
1929 मध्ये डॉ. हेडगेवार औपचारिकरित्या सरसंघचालक झाले. पुढे बालाजी हुद्दार (सरकार्यवाह) व मार्तंडराव जोग (सरसेनापती) यांच्यावर कार्यभार सोपवण्यात आला.
1930-1940 : स्वातंत्र्यलढ्यात सहभाग आणि संक्रमण
1930 मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्य ठराव स्वीकारला. डॉ. हेडगेवारांनी सर्व शाखांना दि. 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले. यवतमाळच्या जंगल सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला. ते सत्याग्रहात भाग घेण्यापूव लक्ष्मणराव परांजपे यांच्याकडे सरसंघचालकपदाची सूत्रे सोपवली होती.
या काळात संघ जलद गतीने वाढू लागला. शाखांची संख्या शेकड्यांत पोहोचली. नवा गणवेश, टोपी, लाठी (दंड) यांमुळे शिस्तबद्ध संघटनेची ओळख निर्माण झाली.
1939 सिंदी येथे प्रदीर्घ बैठक झाली. संघाच्या कार्यपद्धतीवर सखोल चिंतन, बदल या बैठकीत निश्चित झाले. उदाहरणार्थ संघाची प्रार्थना.
1940 वीर सावरकरांनी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘प्रांतिक बैठक’ला भेट दिली. पुढे भारतीय जनसंघाची स्थापना करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखज यांनी नागपूरमध्ये डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ. मुखज यांनी बंगालमधील हिंदूंच्या हालअपेष्टांबद्दल चिंता व्यक्त केली.
ब्रिटिश सरकारने संघाचे गणवेश (गणवेश) व परेड (संचालन) यांवर बंदी घातली. याचवष संघाची संस्कृत प्रार्थना ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे इंग्रजी आज्ञांऐवजी संस्कृत आज्ञांचा अवलंब सुरू करण्यात आला.
दि. 20 जून रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी डॉ. हेडगेवार यांची नागपूर येथे त्यांच्या अखेरच्या क्षणी भेट घेतली. दुसऱ्या दिवशी दि. 21 जून 1940 रोजी सकाळी 9.27 वाजता डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले. त्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना ‘श्रीगुरुजी’ म्हणून ओळखले जाते, यांची दुसरे सरसंघचालक म्हणून नियुक्ती झाली.
1942-1949 : स्वातंत्र्य, विभाजन आणि बंदी 1942च्या ‘भारत छोडो आंदोलना’त अनेक स्वयंसेवक सहभागी झाले. चिमूर-आष्टी भागात काहींनी बलिदान दिले. 1947 मध्ये देशाचे विभाजन झाले. लाखो हिंदूंचे प्राण गेले. त्यावेळी तीन हजारांहून अधिक मदतछावण्या उभारून संघाने विस्थापितांसाठी कार्य केले. त्यानंतर दि. 14 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी यांनी दिल्लीतल्या वाल्मिकी कॉलनी येथे 500 स्वयंसेवकांना संबोधित केले. जम्मू-काश्मीर प्रश्नावर श्रीगुरुजी थेट महाराजांना भेटले. त्याच काळात ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ ही नियतकालिके सुरू झाली.
1948 : दि. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. संघावर चुकीचा आरोप ठेवून दि. 4 फेब्रुवारी रोजी बंदी घालण्यात आली. सुमारे 17 हजार स्वयंसेवक तुरुंगात गेले. श्रीगुरुजींनाही कैद झाली. अखेर 1949 मध्ये सरकारने सर्व आरोप फेटाळून बंदी उठवली. त्याचवेळी संघाचे संविधान तयार झाले. स्वातंत्र्यानंतरच्या अस्थिर वातावरणात विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीकडे वळवण्यासाठी ‘अखिल भारतीय विद्याथ परिषदे’ची (अभाविप) स्थापना झाली. 1948 मध्ये तिची सुरुवात झाली, 1949 साली तिची विधिवत नोंदणी करण्यात आली.
1950-1965 : सेवा, नवनिर्मिती आणि व्यापक विस्तार
1950 : दि. 26 जानेवारी रोजी भारत प्रजासत्ताक झाला. या ऐतिहासिक क्षणाचे स्वयंसेवकांनी उत्सव साजरे करावेत, असा संदेश श्रीगुरुजींनी दिला. पहिली अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (BPS) भरली आणि त्यात भैय्याजी दाणी यांची सरकार्यवाह म्हणून निवड झाली. पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या हिंदू निर्वासितांच्या मदतीसाठी ‘वास्तुहरा साहाय्यता समिती’ स्थापन करण्यात आली.
1952 मध्ये गोरक्षा आंदोलन झाले. 1 कोटी, 75 लाख साहाय्य गोळा करून राष्ट्रपतींना सादर करण्यात आल्या. त्याचवष ‘वनवासी कल्याण आश्रम’ व ‘भारतीय जनसंघ’ या संस्थांची निर्मिती झाली.
1954 मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील दादरा-नगरहवेली मुक्त करण्यात स्वयंसेवकांनी मोलाचा वाटा उचलला.
1955 - पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याच्या मुक्तीसाठी झालेल्या सर्वपक्षीय संघर्षात मोठ्या संख्येने स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग नोंदविला.
23 जुलै 1955 : ‘भारतीय मजदूर संघ’ स्थापना
1963 मध्ये चीन युद्धानंतर दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात तीन हजार स्वयंसेवक सहभागी झाले. याच काळात विवेकानंद स्मारक उभारणीचे कार्य हाती घेण्यात आले.
1964 मध्ये ‘विश्व हिंदू परिषद’ स्थापन झाली. प्रयाग येथे पहिल्या अधिवेशनाला 12 देशांतील 25 हजार प्रतिनिधी उपस्थित होते.
1965च्या भारत-पाक युद्धकाळात लढणाऱ्या सैनिकांसाठी मदतकार्य, रक्तदान, धान्यसंकलन असे अनेक उपक्रम झाले.
1966-1977 : समाजकार्य ते आपत्कालीन संघर्ष
1966 मध्ये बिहार दुष्काळात स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्यांनी संघकार्याची दखल घेतली.
1972 मध्ये विवेकानंद स्मारकाचे कन्याकुमारी येथे उद्घाटन झाले. स्मारकाच्या उभारणीचे कार्य एकनाथ रानडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे यशस्वी झाले.
1973 मध्ये श्रीगुरुजींचे निधन झाले आणि माधवराव दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस हे तिसरे सरसंघचालक झाले.
1975 : दि. 25 जून रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर दि. 4 जुलै रोजी संघावर दुसऱ्यांदा बंदी घालण्यात आली. आणीबाणीविरुद्ध लढा देण्यासाठी ‘अखिल भारतीय लोकसंघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासह हजारो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक संघ कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून कार्य चालू ठेवले.
1977 मध्ये जनता पक्ष सरकार स्थापन झाले आणि बंदी उठवली गेली. जयप्रकाश नारायण यांनी सार्वजनिक सभेत संघाच्या कार्याचा गौरव केला.
1980-1992 : जागरूकता, आघाडी आणि संघर्ष 1980 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘जनसंपर्क अभियान’ राबवून 95 हजार खेड्यांतील एक कोटी कुटुंबांपर्यंत संपर्क साधला. त्याच वर्षात भारतीय जनता पक्ष स्थापन झाला.
1981 मध्ये मीनाक्षीपुरम धर्मांतर प्रकरणाने जनमत ढवळून निघाले. संघाने जागृती मोहीम चालवली. 1983 मध्ये एकात्मता यज्ञ अभियान झाले.
1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखविरोधी दंग्यांत स्वयंसेवकांनी शेकडो शीख कुटुंबांचे रक्षण केले.
1985 मध्ये संघाच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली. 1989 मध्ये पंजाबमधील मोगा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 स्वयंसेवक हुतात्मा झाले.
1990-1992 मध्ये रामजन्मभूमी आंदोलनाने निर्णायक टप्पा गाठला. दि. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी ढांचा पतनानंतर संघावर तिसऱ्यांदा बंदी आली.
1993-2000 : नव्या दिशा आणि सेवा
1993 मध्ये बंदी उठवली गेली. ‘अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद’, ‘लघु उद्योग भारती’ अशा अनेक आघाड्या उभ्या राहिल्या. 1994 मध्ये प्रो. राजेंद्रसिंह रज्जुभैय्या हे चौथे सरसंघचालक झाले.
1999 त्रिपुरामध्ये ‘नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा’ या दहशतवाद्यांनी दिनेंद्रनाथ दय, श्यामलकांत सेन, शुभांकर चक्रवत आणि सुधयमय दत्ता या चार प्रचारकांचे अपहरण केले. दहशतवाद्यांनी त्यावेळी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली; परंतु नंतर या चारही प्रचारकांना निर्दयीपणे मारले. त्याच वष ओडिशातील चक्रीवादळात संघ स्वयंसेवकांचे पुनर्वसनकार्य उल्लेखनीय ठरले.
2000-2010 : शतकाकडे वाटचाल 2007 मध्ये 1857च्या स्वातंत्र्यसमराचा 150वे स्मृतिवर्ष मोठ्या प्रमाणावर साजरे केले. 2009 मध्ये पू. कुप्प. सुदर्शन यांनी डॉ. मोहनजी भागवत यांना पाचवे सरसंघचालक घोषित केले.
प्रमुख संतांच्या पुढाकाराने ‘विश्व मंगल गौ ग्राम यात्रा’ सुरू झाली, ज्याला जनतेमध्ये गो-रक्षण करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी संघाने सक्रिय सहकार्य केले. या मोहिमेत 8.34 कोटी लोकांनी गो-रक्षणासाठी सह्या केल्या, ज्यात 75 हजार, 668 ख्रिश्चन आणि 10 लाख, 73 हजार, 142 मुस्लिमांचा समावेश होता. 23 हजार, 300 खेड्यांमध्ये कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्यात 11 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले. यासोबतच, 201 लोकसभा व 867 विधानसभा सदस्यांनी गो-रक्षणासाठी सह्या केल्या. 1 लाख, 23 हजार, 796 ठिकाणी मिरवणुका काढल्या गेल्या, ज्यात सुमारे 1.50 कोटी लोक सहभागी झाले. जनजागृतीसाठी एक विशेष यात्राही काढली गेली. 9 हजार, 271 पूर्णवेळ स्वयंसेवक आणि सुमारे 1.40 लाख कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे ही यात्रा यशस्वी ठरली आणि यात 15 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले. 2010 मध्ये उत्तर कर्नाटकमध्ये महापुरात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य झाले. संघाने 1 हजार, 680 घरे बांधून दिली.
2011-2025 : सामाजिक जागरण ते शतकपूत 2011 मध्ये माँ नर्मदा सामाजिक कुंभ झाला. दलित, आदिवासी, विविध समाजघटक यात सहभागी झाले. 2013 मध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त देशव्यापी कार्यक्रम घेण्यात आले. उत्तराखंड आपत्तीमध्ये स्वयंसेवक पहिल्यांदा पोहोचले. 2016 मध्ये नवा गणवेश - अर्ध्या विजारीऐवजी पूर्ण विजार स्वीकारण्यात आली. 2018-2020च्या काळात सेवा भारती, शिक्षा, पर्यावरण, गोसेवा, ग्रामविकास अशा क्षेत्रांत हजारो प्रकल्प उभे राहिले. 2020 मध्ये ‘कोविड’ महामारीच्या काळात लाखो स्वयंसेवकांनी रुग्णसेवा, अन्नधान्य वितरण, औषध मदत, मृतदेहवहन यांसारखे कठीण कार्य केले.
2024 : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आंदोलनापासून ते भव्य प्राणप्रतिष्ठेपर्यंतचा प्रवास संघाच्या अखंड प्रयत्नांचे फलित आहे. 2025 मध्ये संघशताब्दी साजरी करत आहे. ‘पंच परिवर्तन’, ‘विकसित भारत 2047’, पर्यावरणपूरक जीवनशैली, महिलांचा सन्मान, कुटुंबसंवर्धन, तंत्रज्ञानाचा विधायक वापर या नव्या संकल्पनांसह संघ समाजजीवनातील नवनिर्मितीचे ध्येय समोर ठेवत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती ही एक व्यवस्थित, संघटित आणि परिणामकारक यंत्रणेवर आधारित आहे, ज्यामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमध्ये एकात्म मानवतावादाच्या तत्त्वांवर आधारित सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले जाते. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या, गरजा आणि आव्हाने ओळखून संघस्वयंसेवकांच्या माध्यमातून त्वरित आणि ठोस उपाययोजना राबवतो. यामध्ये शिक्षण, आरोग्य, शुद्ध पेयजल, स्वच्छता, आर्थिक उन्नती तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक जागरूकता यांसारख्या उपक्रमांचा समावेश असतो, ज्यामुळे स्थानिक समाजासोबतच राष्ट्रीय स्तरावरही दीर्घकालीन आणि संतुलित विकास साधला जातो.
100 वर्षांच्या कालावधीत संघाने सामाजिक एकात्मतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. विविध जाती, समुदाय आणि धर्म यांच्यात सहकार्य व समन्वय वाढवण्याचे उपक्रम सतत राबवले गेले आहेत. सामाजिक भिन्नतांना पूरकतेने सामोरे जाणे आणि सहजीवनाची भावना रुजवणे, हे संघाचे दीर्घकालीन ध्येय राहिले आहे. या सततच्या प्रयत्नांमुळे समाजात एकात्मतेची मानसिकता निर्माण झाली असून स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर स्थिरतेची भावना दृढ झाली आहे.
तसंच, ‘स्व’बोध आधारित जीवन आणि त्याच्या जागरूकतेच्या क्षेत्रात संघाने गेली अनेक दशके विविध उपक्रम राबवले आहेत. भारतीय संस्कृती, भाषा, कला, परंपरा आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करण्यासाठी विद्याथ, युवक, ग्रामिक, नागरिक यांना सतत मार्गदर्शन केले. या प्रक्रियेत सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकास कसा घडवता येईल; जागरूक नागरिक आणि सक्षम समाज कसा बनवता येईल, याकडे सतत प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षणातून तयार होणारे स्वयंसेवक समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. ते ग्रामीण, शहरी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यास मार्गदर्शन करतात. समाजाच्या प्रत्येक स्तरावर परिवर्तन घडवितात आणि लोकांमध्ये सेवा आणि जबाबदारीची भावना रुजवितात.
संघाचा विस्तार आज संपूर्ण देशभर झाला आहे. या वटवृक्षाच्या छत्राखालून सुरू केलेल्या समाजसेवा आणि विकासात्मक उपक्रमांमुळे एक अनुकूल परिस्थिती दिसत आहे. राष्ट्रीय विचारसरणीबद्दलची जागरूकता, सांस्कृतिक जाणीव, एकात्मतेची भावना, समाजाच्या विविध स्तरांमध्ये समन्वय आणि स्थिरता येणे आवश्यक आहे. आणि संघाच्या याच कार्याच्या आधारे शताब्दीवर्षातील हे गीत संघाच्या कार्याचा विश्वास दर्शवते-
श्रद्धामय विश्वास बढ़ाकर,
सामाजिक सद्भाव जगायें|
अपने प्रेम परिश्रम के बल,
भारत में नव सूर्य उगायें॥
जाग रहा है जन-गण-मन!
निश्चित होगा परिवर्तन॥
- राजेश कोरडे