'वक्फ’च्या कब्जातील इंच न् इंच जमीन परत घेणार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा

09 Jan 2025 15:06:23

Yogi Adityanath
 
नवी दिल्ली : (Waqf Board) “उत्तर प्रदेशात ‘वक्फ बोर्डा’च्या कब्जात असलेली इंच न् इंज जमीन परत घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘वक्फ’ कायद्यात सुधारणा केली असून सर्व जमिनींची सक्रियपणे चौकशी सुरू आहे,” असा थेट इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातून बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिला आहे.
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “वक्फ’ आणि त्यांचे दावे हे दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. या मंडळींचा दररोज नवा बुरखा फाटत आहे. यापेक्षा जास्त बुरखे फाटले, तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. ‘वक्फ बोर्ड’ हे ‘माफिया बोर्ड’ असल्याची शंका उत्पन्न होते. मात्र, उत्तर प्रदेशात हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. राज्य सरकारने ‘वक्फ कायद्या’त सुधारणा केली असून १३९७ पासून आतापर्यंतच्या प्रत्येक महसुली रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. ‘वक्फ’च्या नावावर घेतलेली प्रत्येक इंच जमीन आम्ही परत घेऊ आणि त्याचा उपयोग गरिबांसाठी घरे, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये बांधण्यासाठी केला जाईल,” असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
 
संभलविषयी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जुन्या जखमेवर उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, “जखम कितीही जुनी असली त्यावर एकदाच शस्त्रक्रिया करून उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे अशा उपायांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संभलमध्ये श्रीहरीचे मंदिर पाडून येथे एक वास्तू बांधण्यात आली आहे, हे ‘आईन-ए-अकबरी’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
संभलचे नियोजनबद्ध पद्धतीने इस्लामीकरण कसे झाले, हे आता स्पष्ट झाले आहे. तेथील प्रत्येक प्रतीक कसे पूर्णपणे नष्ट करण्यात आले. तेथील मंदिरांना टाळे लावण्यात आले, कुप बुजवण्यात आले, त्यावर घरे बांधण्यात आली. संभलमध्ये सातत्याने होणार्‍या दंगलींविषयी यापूर्वीचे सरकार गप्प बसले होते. तेथे १९४७ ते २०१७ पर्यंत २०९ हिंदूंची हत्या झाली. १९७६ मध्ये आठ हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली आणि १९७८ मध्ये १८४ हिंदूंची कत्तल करण्यात आली. मात्र, असे असतानाही काही लोक शांततेचा संदेश देण्याची भाषा करत असतील, तर ते ऐकून घेतले जाणार नाही,” असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ठणकावले आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0