मुंबई : (Fatima Shaikh) आधुनिक काळात स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेणार्यांत सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रणी आहे. त्यासाठी सर्व समाज कृतज्ञ आहे. सावित्रीबाई आणि जोतिराव यांना यासाठी सहकार्य करणार्या अनेकांची नावे ब्रिटिश कागदपत्रांमुळे लोकांना माहीत झाली आहेत.
दि. १० ऑक्टोबर १८५६ रोजी सावित्रीबाई फुले यांनी आपण आजारी असल्याबाबत त्याविषयी कळवताना जोतिबा फुले यांना लिहिलेल्या एका पत्रात ’फातिमास त्रास पडत असेल, पण ती कुरकुर करणार नाही’ ही एक ओळ लिहिली आहे. यातून फातिमा कोण, त्या नेमके काय करतात, त्या शिकल्या आहेत की नाही, त्या कुठून आल्या, किती काळ तिथे होत्या, त्यांनी किती मुस्लीम मुलींना शिकण्यासाठी शाळेत आणले याबाबत माहिती उपलब्ध नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की, या एका ओळीवरून फातिमा यांचे आडनाव शेख होते. ती मुस्लीम समाजातील पहिली स्त्री शिक्षिका असून त्या सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरीने शाळेत शिकवत होत्या. तसा प्रचार करण्याकरिता कल्पोकल्पित वर्णनानुसार फातिमा शेखचे छायाचित्र रेखाटले. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक बनावट पात्राबाबत अभ्यासकांनी मुद्दे उपस्थित केले आहेत. परंतु, गेल्या काही काळापासून सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका म्हणून फातिमा शेख हे नाव पुढे येऊ लागले आहे.
फातिमा शेख महिला शिक्षिका असल्याची नोंद नाही
फातिमा शेख नावाचे पात्र उभे करण्यासाठी ज्या काही पुस्तकांतील उल्लेखांचे संदर्भ दिले जाते, त्या पुस्तकांना तथाकथित पुरोगामी फुले साहित्याचा संदर्भ देत आहेत. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे सर्व साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केले आहेत. तामिळनाडू सरकारने फातिमा शेखच्या नावे पुरस्कार सुरू केला, भिडे वाड्यावर स्थलदर्शक म्हणून लावलेल्या पाटीवर फातिमा शेखचा उल्लेख आला, सावित्रीबाईंच्या तसबिरीत फातिमा शेखचा समावेश झाला. शाळा सुरू करण्यासाठी जोतिबा फुले यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारसोबत कागदोपत्री व्यवहार केले, त्यात नमूद केलेल्या शिक्षकांच्या यादीत फातिमा शेख या महिला शिक्षिका असल्याची नोंद नाही. त्यामुळे भविष्यात फातिमा शेख ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना झाकोळून काही तरी वेगळे रुप धारण करून बसेल.
- तुषार दामगुडे, इतिहास अभ्यासक पुणे
आधार नसलेले पात्र माथी मारण्याचा प्रयत्न
वस्तुतः फातिमा शेख या नावाला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. जोतिराव फुलेंच्या एका पत्रात ’फातिमा कुरकुर करणार नाही’ एवढ्या एकमेव ओझरत्या उल्लेखावरून इतिहासाचे विद्रुपीकरण करणारे लोक हे पात्र इतिहासात रूढ करू पाहात आहेत. जोतिरावांच्या पत्रातील फातिमा ही शेख असल्याचा कोणताही खुलासा नाही. फातिमा हे एक मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू इत्यादीमध्ये समाईक असलेले नाव आहे. पत्रातील एका ओझरत्या उल्लेखा व्यतिरिक्त कोणत्याही अन्य कागदपत्रांत तिचा उल्लेख नाही. मदारी मेहतर प्रमाणेच फातिमा शेख हे काल्पनिक पात्र तथाकथित पुरोगामी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठेही उल्लेख न सापडलेली दि. ९ जानेवारी ही फातिमा शेख यांची जन्मदिनांक म्हणून बळेच प्रस्थापित करू पाहात आहेत. मुसलमानांमध्ये पुरोगामी चळवळीची परंपरा फारशी नाही. म्हणून हे आधार नसलेले ऐतिहासिक पात्र समाजाच्या माथी मारण्याचा हा प्रयत्न चालू आहे.
- चंद्रशेखर साने, इतिहास अभ्यासक पुणे
सागर देवरे