तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी! ६ भाविकांचा मृत्यू, ३० गंभीर जखमी
09-Jan-2025
Total Views |
अमरावती (Tirupati Stampede): आंध्रप्रदेशच्या तिरुपती देवस्थानाला हजारोंच्या संख्येने भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. अशातच बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी संध्याकाळी तिरूपती बालाजी मंदिरात, चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून, किमान ३० जणं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टोकन वाटप करीत असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवार ८ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास तिरुपती देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी दर्शनासाठीचे टोकनचे वाटायला सुरूवात केली. विष्णु निवास, पद्मावती पार्क या ठिकाणी टोकन वाटप सुरू झाले. विष्णू निवास मंदिराजवळच्या काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले. तिरुपती देवस्थानमचे प्रमुख बी. आर. नायडू याबद्दल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की " काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. आतली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गेट काही काळ बंद ठेवण्यात आलं होतं. पण आत एका महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे सदर महिलेला बाहेर जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी गेट उघडण्यात आलं. पण नेमक्या त्याचवेळी गेटबाहेर उभे असलेले सर्व भाविक एकाचवेळी आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. यातून तिथे गडबड झाली आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडला" जखमी झालेल्या भाविकांना नजीकच्या रूईया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये दुर्देवाने तीघांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे पीडीत भाविकांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेणार असून, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थीक मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेववर शोक व्यक्त केले असून आपल्या X हँडलवरून त्यांनी परिस्थीतीचा आढावा घेत म्हणाले की " तिरूपतीमध्ये झालेल्या या घटनेमुळे मला दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे, आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. आंध्रप्रदेशचे सरकार शक्य त्या मार्गाने भाविकांना मदत करीत आहे"