॥श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र॥

    09-Jan-2025
Total Views |
 
mahishasuramardini
 
आई जगदंबेबरोबर असूरनिर्दालनाच्या युद्धामध्ये सर्वांनीच सहकार्य केले. आदिवासी स्त्रियांनी भगवती बरोबर युद्धात सक्रिय सहभाग घेऊन, त्यांच्या युद्धकलांनी साक्षात भवानीला देखील मुग्ध केले. युद्धानंतर रानातील अनेक फुले या आदिवासी स्त्रियांनी जगदंबेला अर्पण केली. त्यामुळे जगदंबेचे रुप अतिशय मनमोहक असे शोभले. आदिवासी स्रियांच्या विशुद्ध भक्ती, शौर्याची आणि आई जगदंबेच्या रुपाचे वर्णन करणार्‍या श्लोकांचा भावाानुवाद...
 
श्लोक क्रमांक १२
 
सहितमहाहवमल्लमतल्लिकवल्लितरल्लितभल्लिरते
विरचितवल्लिकपालिकपल्लिकझिल्लिकभिल्लिकर्गवृते।
श्रुतकृतफुल्लसमुल्लसितारुणतल्लजपल्लवसल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि
रम्यकपर्दिनि शैलसुते॥१२॥
 
पदच्छेद :
महित=गौरवपूर्ण, महान, महाहव=महायुद्ध, मल्ल=योद्धा, मतल्लिक=सर्वश्रेष्ठ, वल्लि=गोलाकार फिरवणे, तरल्लित=अत्यंत वेगाने, गतिशील, भल्लिरते=भाला चालवताना पाहून आनंदित होणारी.
विरचित=तयार करणे, वल्लिक=लता, वेली, पालिक=पालन, संवर्धन करणारी, पल्लिक=लतागृह, पर्णकुटी, झिल्लिक=एक आदिवासी वाद्य, भिल्लिक=भिल्ल, वर्गवृते=हा लोकसमूह
श्रुत=कानांवर, कृतफुल्ल=पूर्णउन्मीलित, समुल्लसित=अत्यंत तेजस्वी, अरुण=रक्तवर्णी, तल्लज=सर्वश्रेष्ठ, पल्लव=पानांचा समूह, सल्ललिते=श्रीललिता देवी.
जय जय हे=तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनि=महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य=सुंदर, कपर्दिनि=जटाधारी, शैलसुते=हिमालयाची कन्या.
 
शब्दार्थ :
दैत्यांशी होणार्‍या महासंग्रामात भिल्ल स्त्री योद्ध्यांकडून भाले फिरवत शत्रूवर केला जाणारा हल्ला कौतुकाने पाहणारी, वृक्ष, लता, वेली यांचे संवर्धन व वापर करणार्‍या, झिल्लिक या वाद्याचा नाद करणार्‍या आदिवासी स्त्रियांनी जिचे नेतृत्व प्रेमाने स्वीकारले आहे आणि जे तिच्या सभोवताली युद्धसज्ज आहेत, जिने त्या आदिवासी स्त्रियांप्रमाणे आपल्या कानांवर अत्यंत तेजस्वी आणि रक्तवर्णी फुले माळली आहेत, अशा महिषासुराचे निर्दालन करणार्‍या आणि रम्य केशसंभार असणार्‍या देवी, तुझा सतत विजय असो.
 
भावार्थ :
या श्लोकात कवीने देवीच्या साहाय्यार्थ भिल्ल आणि अन्य आदिवासी जनजाती कशा आल्या याचे वर्णन केले आहे. भिल्ल या आदिवासी जमातीच्या स्त्रिया रणकुशल आहेत. त्या भालाफेकीमध्ये अत्यंत निष्णात आहेत. राक्षसांशी चालू असलेल्या महायुद्धात या योद्ध्या स्त्रिया, हातातले भाले परजत आणि फिरवत राक्षसांना फेकून मारण्यास सुरुवात करतात. त्यांच्या उत्तम नेमबाजीमुळे राक्षस मृत्युमुखी पडू लागतात. या स्त्री योद्ध्यांचे हे कौशल्य देवी भगवती अत्यंत कौतुकाने पहात आहे. हे आदिवासी वृक्ष, लता, वेली यांचे संरक्षण आणि संवर्धन करतात. याच लता-वेलींचा वापर करून ते आपल्या झोपड्या, पर्णकुटी बनवतात. झिल्लिक हे या वनवासी मंडळींचे पारंपरिक वाद्य आहे. युद्धभूमीवर ते या वाद्याचा गजर करत, देवीच्या सभोवती कडे करून लढत आहेत.
आदिवासी स्त्रिया त्यांच्या कानांत अत्यंत तेजस्वी रक्तवर्णी (अरुण वर्णी) फुले, आभूषण म्हणून धारण करतात. भोळ्या भक्तीभावाने त्या स्त्रिया देवीला ती आभूषणे अर्पण करतात आणि देवी त्यांच्या भोळ्या प्रेमाचा आदराने स्वीकार करत, ही आभूषणे आपल्या कानांवर धारण करते. देवीच्या मनोहर सौंदर्याला, या रक्तवर्णी पुष्पआभूषणांचा शृंगार अत्यंत खुलून दिसत आहे. रम्यकपर्दिनि अर्थात तिच्या मस्तकी असलेला केशसंभार हा जटास्वरुप आहे. जटारुप शिवाचेसुद्धा आहे. त्या अर्थाने या पतीपत्नींचे ऐक्य दाखवले आहे. हा केशसंभार अत्यंत रमणीय आहे. उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन, निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले अशा जगदंबे, तुझा सतत जय असो.
 
श्लोक क्रमांक १३
 
अयिसुदतीजनलालसमानसमोहनमन्मथराजसुते
अविरलगण्डगलन्मदमेदुरमत्तमतंगगजराजगते।
त्रिभुवनभूषणभूतकलानिधिरूपपयोनिधिराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते॥१३॥
 
पदच्छेद :
अयि=हे, सुदतीजन= सुंदर दंतपंक्ती आणि चेहरा असणारी, लालस=आसक्त, अनुरागी, मानस=मन, मनोव्यापार, मोहन=मोहित करणारी, मन्मथराज=कामदेव, सुते=कामदेवाच्या कन्येप्रमाणे गुण धारण करणारी. अविरल=सतत, गण्ड=हत्तीचे गंडस्थळ, गलन=गळणारा, मद=कामसलील, मेदुर=स्निग्ध, मत्त=मदमस्त, मतंग=हत्ती, गजराजगते=अशा लक्षणांनी युक्त हत्तीसमान चाल असणारी त्रिभुवन=तिन्ही लोक, भूषणभूत=आभूषणस्वरुप, कलानिधि=चंद्र, रुप=रुप, सुंदर,न पयोनिधिराज=समुद्र, सुते=कन्या जय जय हे=तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनी=महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य=सुंदर, कपर्दिनी=जटाधारी, शैलसुते=हिमालयाची कन्या.
 
शब्दार्थ :
कामदेवाची लीला आहे की, सुंदर मुखकमल आणि दंतपंक्ती असणार्‍या स्त्रियांचा मोह पडतो. अशा कामदेवाच्या पुत्रीसम गुण असणार्‍या, गंडस्थळातून पाझरणार्‍या मदाच्या गंधाने मस्त झालेल्या हत्तीच्या समान चाल असणार्‍या, त्रिभुवनाला भूषण असणार्‍या, चंद्राच्या कलांप्रमाणे सुंदर, सागरकन्या लक्ष्मी, महिषासुराचे निर्दालन करणार्‍या आणि रम्य केशसंभार असणार्‍या हे देवी, तुझा सतत विजय असो.
 
भावार्थ :
कामदेव अर्थात मन्मथ हा जीवांमध्ये कामभावना जागृत करतो. ही मन्मथाची लीला असते की, सुंदर मुखकमल आणि सुंदर दंतपंक्ती असणार्‍या स्त्रियांचा पुरुषांना मोह पडतो. अशा मन्मथाच्या पुत्रीसमान गुण असणारी, अर्थात जिचे मुखकमल अत्यंत सुंदर आहे आणि जिची दंतपंक्तीसुद्धा अत्यंत सुंदर आहे, अशी स्त्री म्हणजे देवी भगवती आहे. हे भगवतीच्या कामेश्वरी रुपाचे वर्णन आहे. कामेश्वरी भगवती ही कामेश्वर शिवाची पत्नी आहे. अत्यंत सुंदर लावण्य आणि त्याच जोडीला, तिच्या अत्यंत सुंदर अशा मनाचासुद्धा उल्लेख केला आहे. या नामात एक भेद आहे. हा श्लोक मन्मथाच्या गुणांनी युक्त असे भगवती स्वरुप, म्हणून तिला ‘मन्मथ कन्या’ असे संबोधले आहे. परंतु, श्रीविद्या उपासनेमध्ये थोडासा भिन्न अर्थ आहे. तोसुद्धा इथे मांडत आहे.
 
शंकराच्या तृतीय अग्नीने भस्म झालेला कामदेव, भगवतीकृपेने पुनरुज्जीवित होतो. कारण विश्वातील पुनर्निर्मिती कार्यार्थ त्याची आवश्यकता असते. परंतु, त्याचा देह भस्मीभूत झाल्याने, देवी भगवती त्याला अनंग असूनही अत्यंत शक्तिशाली बनवते आणि ज्या बळावर तो एक प्रकारे जगावर राज्य करतो. त्या दृष्टीने पाहिले, तर मन्मथ अर्थात कामदेव हा भगवतीचा पुत्र, साहाय्यक किंवा सेवक होतो. अर्थात साक्षात कामदेवाची जी स्वामिनी असेल, ती अनुपम आणि अत्यंत मनमोहक सौंदर्याने नटलेली असेल, त्यात नवल ते काय? अशा अत्यंत सुंदर कामेश्वरी भगवतीच्या सौंदर्याने, कामेश्वर शिव विद्ध होतात.
 
कामभावनेने उद्दीपित झालेल्या हत्तीच्या गंडस्थळातून जो चिक पाझरतो, त्याला ‘मद’ असे म्हणतात. या मदाचा गंध हत्तीला, अधिक उत्तेजित करत असतो. असा मदमस्त हत्ती, अत्यंत लयबद्ध आणि मंद चालीने भ्रमण करतो. भगवतीच्या चालीला या मदमस्त हत्तीच्या चालीची उपमा दिली आहे. यातही एक श्लेष आहे. ज्याप्रमाणे हत्तीची चाल मनमोहक असते, त्याचप्रमाणे हत्ती हा अत्यंत शक्तिशालीसुद्धा असतो. भगवतीसुद्धा सौंदर्याची परिसीमा असल्याने अत्यंत मोहक चालीने भ्रमण करत असली, तरीही ती जगन्माता या स्वरुपात अत्यंत शक्तिशाली आहे. त्रिभुवनाचे भूषण असणारा चंद्र हा कलेच्या रुपाने, आपल्या सौंदर्याचे दर्शन जगाला घडवतो. चंद्रकला ही नित्य बदलते आणि त्या कलेचे नित्य नूतन स्वरुप हे जणू चंद्राचे आभूषणस्वरुप आहे. अशा चंद्राला आभूषण म्हणून, जिने आपल्या कपाळी धारण केले आहे अशा सागरकन्या श्री लक्ष्मीचे सौंदर्य या चंद्रकलेने अधिक सुशोभित आणि आल्हाददायक दिसत आहे.
 
रम्यकपर्दिनि अर्थात तिच्या मस्तकी असलेला केशसंभार हा जटास्वरुप आहे. जटारुप शिवाचेसुद्धा आहे. त्या अर्थाने या पतीपत्नींचे ऐक्य दाखवले आहे. हा केशसंभार अत्यंत रमणीय आहे. उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले अशा जगदंबे, तुझा सतत जय असो.
(क्रमशः)
 
सुजीत भोगले
 
९३७००४३९०