भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये १८ व्या प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) निमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्याचे उद्घाटन केले. प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी ओडीशा येथे दाखल झाले. विमानतळावर दाखल होताच मोदी यांचे स्वागत ओडिशाचे राज्यपाल हरी बाबू कंभमपती, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. प्रवासी भारतीय दिवस केंद्र सरकारकडून ओडिशा राज्य सरकारच्या सहकार्याने ८ ते १० जानेवारी दरम्यान आयोजित केला जात आहे.
प्रवासी भारतीय दिवसाच्या याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी प्रवासी भारतीय एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. प्रवासी भारतीय एक्सप्रेस ही तीन आठवड्यांची खास टूर असून, यामध्ये प्रवाशांना, भारतातील निवडक प्रतिष्ठित पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देता येईल. या ट्रेनची प्रवासीक्षमता १५६ असून, प्रवासी तीर्थ दर्शन योजनेच्या अंतर्गत हा प्रवास पर्यटकांना अनुभवता येणार आहे. प्रवाशांच्या पर्यटन स्थळांमध्ये अयोध्या, पटना, गया, वाराणसी, महाबलीपुरम, रामेश्वरम, मदुराई, कोची, गोवा, एकता नगर (केवडिया), अजमेर, पुष्कर आणि आग्रा यांचा समावेश आहे. परदेशस्थ भारतीयांना त्यांच्या मुळांशी पुन्हा जोडण्यास आणि भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी ही सहल आखली गेली आहे.