मृत्यूचे रहस्य

    09-Jan-2025
Total Views |

mrutyuche rahasya
 
भाग २२
 
जीवात्म्याच्या वासना वा कर्म अयोग्य असल्यास, लिंगदेही प्रेतात्म्याची पलीकडील दिव्यगती निरुद्ध होऊन असले जीवात्मे पिशाच्च, राक्षस, वेताळ, कुष्मांड, यक्ष व गंधर्व असल्या अवस्थेत राहू शकतात. पिशाच्च कोणताही व केवढाही आकार घेऊ शकतात. त्यांना वास नसतो, पण प्रबल वासनेमुळे ते बहुतांशी अतृप्त व तापदायक असतात. ते कोणाची तरी हानी करणारच. काही पिशाच्चे उपकारक असतात. पण, त्यांच्या वृत्तीत बदल झाल्यामुळे, त्यांच्या या अवस्थेला धरून ते त्या दुर्धर योनीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतात. एखादा महान सत्पुरुष त्यांना भेटल्यास, ते त्या योनीतून मुक्त होऊ शकतात. लिंगभेदाची जाणीव पिशाच्चात सदैव असते. परंतु, ते भोग घेऊ शकत नसल्याने, त्यांना इतर जडदेहींना झोंबून आश्रय घ्यावा लागतो.
 
विभूती वा वस्तू काढणे
 
काही वाममार्गी साधक असल्या पिशाच्चांना साधनेद्वारे वश करून, त्यांच्याद्वारे बाजारात वा कोणाच्या घरी असलेल्या वस्तू आणू शकतात. पिशाच्च देशकाल आणि कर्षणशक्तीच्या वर असल्यामुळे , ते आपल्या जडदृष्टीला दिसत नाहीत. ते ज्या जडवस्तूला हात लावतील, ती वस्तूसुध्दा त्यांच्याप्रमाणे त्यांच्या स्पर्शापर्यंत सूक्ष्म अवस्थेत जाऊन, इतरांना दिसत नाही आणि पिशाच्चाप्रमाणे तत्काल कोणत्याही स्थानी जाऊ शकते. पिशाच्चांनी त्याचा आश्रय सोडल्यास ती वस्तू पुनः दृश्यमान होऊन, इतरांना दिसू शकते व हातात येऊ शकते. या योनी नवीन वस्तू उत्पन्न करू शकत नाहीत. इतरत्र जी वस्तू ठेवली असेल, ती वस्तू पिशाच्च साधनेने वामसाधक कोणाच्याही हातात वा कोठेही नेऊ शकतो. वस्तूची यातायात पिशाच्च करतात, वामाचारी साधक नव्हे. तो वामविद्या साधक त्या पिशाच्चाला सिद्ध करून, आपल्या इच्छेप्रमाणे राबवितो एवढेच. मिठाई काढणे, विभूती काढणे याच पिशाच्च साधनेत बसतात. लेखकाने याचा अनुभव घेतल्यावर या विद्येचा मनाने त्याग केला. अतिशय घाणेरड्या विद्या आहेत या! जी पिशाच्चे त्या वामाचारी साधकाची सेवा करतात, त्या साधकाला ती मरणोत्तर आपल्या नीच योनीत घेऊन जातात. मग असल्या अघोर साधकाला एखादा सत्पुरुष भेटल्याशिवाय मुक्ती नाही.
 
असल्या अनेक वामपंथी साधकांच्या भेटी, लेखकाशी झाल्या आहेत. त्यांपैकी बर्‍याचजणांनी ती वामविद्या लेखकाच्या सांगण्यावरून सोडली आहे. काही काळ लेखक स्वतः मिठाई, खडीसाखर, काजू, किसमिस, टॉफी इत्यादी इतरांच्या हातात काढू शकत असे. आता ती किमया लेखकाजवळ नाही. बर्‍याच वर्षांपूर्वी असेच एक वाममार्गी साधक अशा वस्तू काढून, इतरांना चकित करतात व पाहणार्‍यास आपल्या भजनी लावतात असे समजले होते. एका उघड पत्राद्वारे लेखक म्हणेल ती वस्तू काढण्यास, त्या महाराजांना लेखकाने पाचारण केले होते. पण, लेखकाचे ते आव्हान त्या महाराजाने स्वीकारले नाही. त्यात त्या महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तर असल्या चमत्कारिक किमयांनी भक्तजन परमेश्वराकडे न जाता, केवळ त्या चमत्कृतीजन्य महाराजांच्या नादी लागतात आणि खर्‍या आत्मज्ञानाचा त्यांना विसर पडतो, असे लेखकाचे म्हणणे आहे. नादी लागलेल्या आपल्या भक्तांना हे भगवान जर खर्‍या आत्मज्ञानाकडे घेऊन जात असतील, तर असल्या चमत्कारांची त्यांच्या सत्कर्माला जोडच होईल. पण, असे घडताना दिसत नाही. भगवान कोण होतो? जो सर्वांच्या अंतरात्म्यात भगवान पाहील, तोच भगवान होऊ शकेल. मग असले महाराजच केवळ एकटे भगवान आणि त्यांचे शिष्य मात्र अभगवान असे का? ही अज्ञानावस्था आत्मज्ञान दर्शविते की अहंकार? तुकाराम महाराज सर्वांच्या पाया पडत असत. कारण, त्यांनी सर्वत्र भगवंत पाहिला होता व त्यामुळे ते न म्हणता, स्वयं भगवान बनले होते. पण, त्यांनी मात्र स्वतःला नेहमी ‘पायीची वहाण पायीच बरी’ असे स्वतःबद्दलचे नम्रपणे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी तीच भगवंत परंपरा आपल्या भागवत धर्मांत राखली आहे. भागवत धर्मांत कोणी उच्च वा नीच नाही, सगळे समान. म्हणून संकीर्तनाअगोदर वा नंतर सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, सर्व भगवान, सर्वत्र भक्त! पुंडलीकवरदे हरी विठ्ठल!!
 
राक्षस अवस्था
 
पिशाच्चांपेक्षा दुर्धर शक्तिशाली, कोणाला न मानणारे, जिद्दी आणि आपल्या गतजन्मींच्या इच्छा, संस्कार, अतृप्त वासना यांना घट्ट धरून असणारे जीवात्मे म्हणजे राक्षस होत. त्यांनाही लिंगभेदाची जाणीव असते. यांना ब्रह्मराक्षस अथवा जिंद असे म्हणतात. हे झोंबल्यास भयंकर तापदायी असतात, सुटता सुटत नाहीत. उलट त्यांना काढणार्‍यांनाच विलक्षण त्रास देतात. मामुली वामविद्या जाणकारास ते मानीत नाहीत. त्यांची शक्ती प्रबल असते. बद्ध जीवात्म्याची ही राक्षस अवस्था, पिशाच्च अवस्थेपेक्षा अधिक काळ टिकते. त्यामुळे राक्षसांना त्या अवस्थेतून लवकर मुक्ती मिळत नसते.
 
यक्षःयक्षिणी
 
पिशाच्च व राक्षस अवस्थेपेक्षा लिंगदेहाची यक्ष अवस्था अधिक उच्च व उपकारक असते. यक्ष व यक्षिणी स्वस्थ शरीराचे सुडौल आणि गौर वर्णाचे असतात. त्यांना विशेषतः दागिन्यांचा बराच शौक असतो. ज्यांच्यावर हे प्रसन्न होतात, त्यांना धनधान्य व भौतिक भोगाने समृद्ध करतात. ही यक्ष योनी त्यांना त्यांच्या भोगप्रणव वृत्तीमुळे मिळालेली असते. जीवंतपणी काही लोक भरपूर भोग घेतात. इतरांना त्यांच्यापासून तसा त्रास नसतो, पण भोगेच्छा कायम असल्याने मृत्यूनंतर असले जीवात्मे लिंगशरीराने यक्ष योनीत राहतात. यक्षयक्षिणी कोणाला झोंबल्याचे लेखकाचे ऐकिवात नाही.
 
(क्रमशः)

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
 
योगिराज हरकरे 
९७०२९३७३५७
 
(विशेष सूचना : वरील लेखाचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात नसून, अशा वाममार्गी साधना, भोंदूबाबा, चमत्कृतीजन्य महाराजांच्या कदापि नादी न लागता, साधकांनी भगवंताच्या भक्तीतूनच आत्मज्ञानाचा मार्ग प्रशस्त होतो, हे लक्षात घ्यावे.)