प्रत्येक क्षण सार्थकी लावावा

    09-Jan-2025
Total Views |
 
SAMARTH RAMDAS SWAMI
 
मनाच्या श्लोकांतील श्लोक क्रमांक १६३ पासूनच्या पुढील काही श्लोकांची शेवटची ओळ ‘सदा संगती सज्जनाची धरावी’ अशी आहे.
 
पुढील श्लोक हा या श्लोक गटातील शेवटचा श्लोक आहे.
 
बरा निश्चयो शाश्वताचा करावा।
म्हणे दास संदेह तो वीसरावा ।
घडीने घडी सार्थकाची करावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥
 
अहंभाव व देहबुद्धी दृढ असल्याने, माणसाला प्रपंचातील विविधतेचे विलक्षण आकर्षण असते. प्रपंच मुळात अशाश्वत आहे. प्रपंचातील गोष्टी विघटनशील असल्याने, कायम टिकणार्‍या नसतात. त्यातून समाधान प्राप्त होत नाही. हे माणसाला अनुभवाने कळून चुकते. काही प्रसंगी सांसारिक अशाश्वत गोष्टींतून आनंद मिळतो. पण, एकतर तो फार अल्पकालीन असतो. शिवाय, त्या अनुषंगाने दुःखेही त्याबरोबर भोगावी लागत असल्याने, तो आनंद निर्भेळ नसतो. शाश्वत समाधानाच्या शोधासाठी मानवाला शाश्वताची बैठक शोधावी लागते. त्या शोधकार्यात अहंभाव व देहबुद्धी अडथळे निर्माण करतात. संतांनी, सज्जनांनी अभ्यासाने, साधनेने अहंभाव व देहबुद्धी यांवर विजय मिळवून, शाश्वत म्हणजे कायम टिकणार्‍या स्वानंदाचा मार्ग शोधलेला असतो. म्हणून अशा जाणत्या सज्जनांच्या संगतीत राहून आपण तो मार्ग शिकून घ्यावा, असे समर्थ या श्लोकगटातून सांगत आहेत. तथापि, आपल्याला या अशाश्वत प्रापंचिक जगात राहूनच आपले जीवन व्यतीत करावे लागते. मानवी जीवनातून अशाश्वतता वेगळी काढता येत नाही. अशा वेळी स्वानंद शोधण्यासाठी, माणसाने प्रथम शाश्वत परब्रह्म, परमेश्वरतत्त्व याचा निश्चय मनात करावा. हा अतींद्रियज्ञानाचा विषय असल्याने, मनातील निश्चय दृढ व्हायला एकाग्र चित्ताने अभ्यास करावा लागतो. त्याला परमार्थाच्या भाषेत साधना करणे, असे म्हणतात. अतींद्रिय सद्वस्तूचा अनुभव येण्यासाठी, वेळ लागतो. त्या काळात शाश्वत सद्वस्तू खरी आहे, की ती नुसती कल्पना आहे याबद्दल मन साशंक असते. मनाला वाटते की, सद्वस्तू, परब्रह्म वास्तवात खरे नसेल तर आपली साधना, आपला अभ्यास फुटक जाईल. ही मनाची दोलायमान स्थिती म्हणजे साशंकता. अर्थात ही साशंकता अथवा संदेह दूर केल्याशिवाय, परमार्थ साधनेत प्रगती संभवत नाही. यासाठी शाश्वताचा नुसता निश्चय करून चालणार नाही. तर त्यासंबंधीचा संदेह, संशय आपण दूर सारला पाहिजे. संशय दूर करणे इतके सोपे नसते.
 
हा संदेह अर्थात संशय कसा दूर करायचा, यासाठी स्वामी एक उपाय सूचवत आहेत. आपण कितीही नको म्हटले, तरी संदेह आपल्या मनात येतोच. तथापि, आपण त्यावर आणखी विचार करून त्याला खतपाणी घालण्यापेक्षा, त्या संदेहाला साशंकतेला विसरून जाण्याचा प्रयत्न करावा. ही साशंकता आपण भूतकाळात नेऊन सोडावी. वर्तमानात संदेहाला स्थान नाही हे एकदा ठरल्यावर, वर्तमानातील प्रत्येक क्षण आपण सद्वस्तूचा विचार दृढ करण्यात घालवू शकतो. त्यात वेळेचे सार्थक होईल. अर्थात, हे सारे सज्जनांच्या संगतीत लवकर साधते. म्हणून नेहमी सज्जनाच्या संगतीत आपल्या जीवनाचे सार्थक करावे. समर्थांनी जगोजाग सत्संगतीचे महात्म्य गायले आहे. मागे श्लोक क्र. १४१ मध्ये समर्थ, ‘जनीं जाणता पाय त्याचे धरावे’ असे म्हणतात. आता हा जाणता संतसज्जन असतो तरी कसा? याची काही लक्षणे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
 
करी वृत्ति जो संत तो संत जाणा।
दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा।
उपाधी देहेबुधिते वाढवीते।
परी सज्जना केवि बाधूं शके ते॥१६८॥
 
संताच्या अंगी असलेला गुणविशेष सांगून, समर्थांनी संतसज्जनाची सोपी व्याख्या वरील श्लोकात मांडली आहे. मानवी मन चंचल असल्याने, त्या मनात सदोदित विचारांच्या, कल्पनेच्या, भावनांच्या, स्वप्नांच्या लाटा निर्माण होत असतात. तथापि, ज्याच्या मनात सद्वस्तूचे विचार भरलेले आहेत आणि ज्याची वृत्ती आत्मस्वरुपमय झाली आहे, त्याला ‘संत’ म्हणता येईल. संताची वृत्ती ब्रह्ममय झालेली असल्याने तेथे अशाश्वततेला, भौतिकतेला स्थान उरत नाही. त्यामुळे संताची वृत्ती शांत (संत) असते. ‘करी वृत्ति जो संत तो संत जाणा’ असे स्वामी म्हणतात. शब्दांतून स्वामींना सांगायचे आहे की, ज्याच्या मनातील भावभावना, विकार, चांचल्य इ. सारे शांत झाले आहे, ते कधी उसळून वर येत नाही, त्याला ‘संत’ म्हणावे. भौतिक इच्छाआकांक्षा तृप्त व्हाव्या, अशी इच्छा त्याच्या ठिकाणी उरत नाही. याचा अर्थ असा नाही की, दुराशा गुणामुळे तो दैन्यवाणा झाला आहे. स्वानंदाला त्याने जाणले असल्याने, तो तृप्त असतो. म्हणून भौतिक इच्छाआकांक्षा त्याला क्षूद्र वाटतात. नीट विचार केला तर प्रापंचिक उपाधी, फुकटचे मानसन्मान, मनाचे चांचल्य हे सारे देहबुद्धी वाढवत असतात. परंतु, संतांनी प्रापंचिक भावभावना उपाधी यांना मनातून काढून टाकल्यामुळे व त्यांच्या वृत्ती शांत झाल्याने, त्यांना देहबुद्धीची बाधा कशी बरे होणार? अर्थात, देहबुद्धीची बाधा त्यांना होणार नाही. अशा संताची, सज्जनाची संगत लाभली, तर ‘परमात्मस्वरुप’ या विषयावर त्यांना विचारता येईल, असे स्वामींनी पुढील श्लोकात सांगितले आहे.
 
नसे अंत आनंत संता पुसावा।
अहंकार विस्तार हा नीरसावा।
गुणेंवीण निर्गूण तो आठवावा।
देहेबुधिचा आठऊं नाठवावा॥१६९॥
 
ज्ञानानुभवी संतांची संगती लाभली, तर त्यांच्याकडून अनेक पारमार्थिक आत्मानुभवाच्या गोष्टी जाणून घ्याव्यात, असे समर्थांचे सांगणे आहे. तथापि, सर्वसामान्य माणसांना वाटत असते की, संतसज्जनाच्या सहवासात राहिल्यावर आपल्याला आपोआप ज्ञानप्राप्ती होईल. त्या अभ्यासासाठी करावे लागणारे आपले श्रम वाचतील! पण तसे होत नाही. आत्मज्ञान मिळवण्यासाठी आध्यात्मिक साधना, अभ्यास आवश्यक असतो. ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतले, अशा संतांकडून तो मार्ग जाणून घ्यावा. अनंत आत्मस्वरुप कसे असते, ते त्यांच्याकडून समजून घ्यावे. त्यांच्या ज्ञानानुभवाचा आपण फायदा करून घ्यावा. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, अशा अनंताची लक्षणे संतांना विचारावी. आपला अहंकार सतत वाढत जाणारा आहे. हा अहंकार, अहंभाव ज्ञानार्जनात अडथळे आणतो. म्हणून या अहंकाराचे निराकरण कसे करावे, हे संतांना विचारून घ्यावे. परब्रह्म त्रिगुणांच्या पलीकडे आहे. या गुणातीत निर्गुण परब्रह्माला जाणणे हा अतींद्रिय अनुभव असल्याने,ज्यांनी तो अनुभव मिळवला आहे अशा संतांना त्यांचे मर्म विचारावे. आत्मज्ञानप्राप्तीसाठी देहबुद्धीचा त्याग केला पाहिजे, म्हणजे त्याची आठवणही उरली न पाहिजे. त्याने देहबुद्धी क्षीण होत जाऊन, नाहीशी होते आणि उरते ती आत्मबुद्धी. मी देह नसून अविनाशी आत्मस्वरुप आहे, ही जाणीव मागे श्लोक क्रमांक १६३ मध्ये स्वामींनी सांगितले आहे की,
 
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥
थोडक्यात अंत नसलेले ब्रह्म, अहंकाराला आवर, गुणांच्या पलीकडील निर्गुण तत्त्व आणि देहबुद्धीचा निरास, हे सारे संतांकडून समजून घ्यावे.
 
सुरेश जाखडी
७७३८७७८३२२