मुंबई (विशेष प्रतिनिधी) : "मंदिरातील पूजा-पाठ ही परमेश्वराची सेवा आहेच, परंतु समाजात उतरून जी व्यक्ती निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करते तिच खऱ्याअर्थाने परमेश्वराची सेवा आहे.", असे प्रतिपादन अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरिजी महाराज यांनी केले. 'हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थान'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्या'त ते बोलत होते.
गोविंददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, मनुष्य जीवनात सेवेचे स्थान सर्वोच्च आहे. जीवन मुल्यांचे शिखरच मुळात सेवा आहे. समाजाची सेवा करता करता परमात्म्याची सेवा करण्यात स्वतःला समर्पित करणे, हेच आपल्याला आपल्या अध्यात्माने शिकवले. सेवारूपी योग्य बनायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःला तन-मन-धन पूर्वक सक्षम व्हावे लागेल. शीख बांधव गुरुद्वारांमध्ये लंगर भरवतात. हीच त्यांची एकप्रकारे ईश्वरसेवाच आहे."
हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्याविषयी बोलताना ते म्हणाले, प्रयागराज येथे महाकुंभ होत आहे. परंतु हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्यासारखे छोटे छोटे मेळे हे कुंभचेच कार्य करतात, जिथे साधनेते दर्शन आपल्याला घेता येते. हिंदूंच्या आत्मविश्वासाचे जागरण या माध्यमातून होत आहे. आई-वडील जेव्हा आपल्या मुलांना अशा मेळ्यांमध्ये घेऊन जातील तेव्हा त्यांच्यात हिंदू धर्माप्रती सेवाभाव जागृत होईल. ज्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून होईल. मग हळू हळू सारा समाज, सारा देश जागृत होईल आणि एके दिवशी संपूर्ण जगासाठी भारत सर्वश्रेष्ठ होईल."
महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प) याठिकाणी सलग चार दिवस (दि. ९ ते १२ जानेवारी) हा मेळावा होत आहे. गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी मेळाव्याचा उद्घाटन सोहळा मैदानातील स्वामी विवेकानंद मंडप डोममध्ये संपन्न झाला. यावेळी मंचावर मैत्रीबोध परिवाराचे मैत्रेय दादाश्री, देवेंद्र ब्रह्मचारीजी, महामंडलेश्वर श्री सुखदेव महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया, प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. श्याम अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
मैत्रीबोध परिवारचे मैत्रेय दादाश्री उपस्थितांना संबोधत म्हणाले की, "प्रभू श्रीराम, आदी शंकराचार्य, भगवान गौतम बुद्ध, यांसारख्या अनेकांच्या संस्कृतीचे आपण वंशज आहोत. संपूर्ण विश्वाला आज भारताकडून अनेक अपेक्षा आहेत. भारत देश विश्वगुरु म्हणून जगाला मार्गदर्शन करेल हे विधिलिखीत आहे. ते कदापी बदलणार नाही. त्यामुळे जातीजातीत न विभागता आपण एक आहोत हे समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांना भारतीय संस्कृतीचे पुनर्जागरण करायचे आहे. तरच आपला भारत देश परम् वैभवाला जाईल. त्यासाठी आधी राष्ट्र सर्वप्रथम या भावनेने सेवा करणे आवश्यक आहे."
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात गिरीश शाह म्हणाले, "समाजमाध्यमांवर हिंदूंबाबत जे फेक नरेटीव्ह चालवले जातात, त्याला जोरदार चपराक देणारा हा हिंदू अध्यात्मिक सेवा मेळावा आहे. हिंदूंच्या डीएनए मध्येच सेवा करणे लिहिले आहे. चार दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात सेवा संबंधित विविध स्टॉल्स पाहता येणार आहेत. मुंबईकरांना आवाहन आहे की, चार दिवसांत किमान एकदा या मेळ्यास भेट द्या. समाजाची आपण चिंता करतो म्हणून आपण हिंदू आहोत, हे सांगणारा हा मेळावा आहे."
हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थानचे अखिल भारतीय संयोजक गुणवंतसिंह कोठारी म्हणाले की, हिंदू अध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे कार्य चेन्नई येथून २००९ मध्ये सुरू झाले. हिंदू समाज आणि मठ मंदिरे करत असलेल्या सेवा कार्याशी सर्वसामान्य समाजाला जोडणे आणि हिंदू जीवनपद्धतीचे अविभाज्य भाग असलेल्या निसर्ग, कुटुंब आणि देश यांच्याबद्दल कर्तव्य आणि आदराची भावना दृढ करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. तर स्वेच्छेने मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे हे कार्याचे ध्येय आहे. याकरीता वन आणि वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संतुलन, कौटुंबिक आणि मानवी मूल्यांचे संवर्धन, महिलांचा आदर आणि देशभक्तीची बीजे रोवणे अशा एकूण सहा थीम निश्चित करण्यात आल्या आहेत. मठ-मंदिर, सामाजिक संस्था (जात-समुदाय), सेवा कार्य करणाऱ्या संस्था, शाळा, महाविद्यालय, कॉर्पोरेट, प्रबुद्ध जनसंपर्क, मीडिया, महिला, शासकीय संस्था, कार्यालय, मेळा प्रबंध, प्री-फेअर एक्टिविटी असे एकूण १३ कार्यविभाग सक्रिय आहेत. प्रत्येक विभागाचे कार्य हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थानच्या नावाखाली केले जात असल्याचे गुणवंतसिंह कोठारी यांनी सांगितले.
मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, संगीत स्पर्धा तसेच संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान संस्थेतर्फे श्री गणपती अथर्वशीर्ष पठण त्यानंतर गंगा आरती आणि मनोज मुन्तशीर यांचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. या मेळाव्यामध्ये एकूण १८० विविध स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील. सोबतच याठिकाणी एक 'जैन दर्शन गॅलरी' सुद्धा आहे जिथे जैन धर्माविषयी, त्यांच्या संस्कृतीविषयी आणि राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या योगदानाविषयी माहिती दिली आहे. खवैय्यांसाठी विविध फूड स्टॉल्ससुद्धा याठिकाणी आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका मंडपामध्ये आपल्याला देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची, हुतात्मा झालेल्या शूर वीरांची माहिती मिळेल.