मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वनामध्ये अतिक्रमण करुन वन्यजीवांच्या जागा व्याप्त केल्यानंतर मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटना घडत आहेत (forest minister ganesh naik). भविष्यात मानव आणि वन्यजीव यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आजवर राबवण्यात आलेल्या धोरणांमध्ये सुधारणा करणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी चंद्रपूरात केले (forest minister ganesh naik). वन विभागाने चंद्रपूर येथे आय़ोजित केलेल्या वाईल्डकाॅन-२५ या परिषेदेला त्यांनी गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी उपस्थिती लावली होती. (forest minister ganesh naik)
संरक्षित वनक्षेत्राच्या बााहेरील वन्यजीवांच्या वाढत्या संख्येवर संवेदनशील उपाययोजना राबविण्यासाठी वन विभागाकडून ८ आणि ९ जानेवारी रोजी वाईल्डकाॅन-२०२५ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरातील वन अकादमी येथे ही परिषद पार पडली. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थिती लावली होती. माणसाने प्राण्यांच्या जागेत अतिक्रमाण केले, की प्राण्यांनी आपल्या जागेत अतिक्रमण केले, हा संशोधनाचा विषय आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे, हे सत्य असून वनांची जागा मात्र मर्यादित आहे, असे प्रतिपादन गणेश नाईक यांनी केले. मानव-वन्यजीव संघर्षावर इतर देशांनी काय उपाययोजना केल्या आहेत, यावर वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास म्हणाल्या की, "वाईल्डकाॅनच्या या दोन दिवसात महत्त्वाची चर्चा झाली आहे. स्थानिक स्थरावर वनविभागाला वनरक्षकांची गरज असल्याने विभागाला नवीन मनुष्यबळ आवश्यक आहे." मानव-वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन करणे, संघर्ष कमी करुन दोघांनाही वाचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या परिषदेच्या माध्यमातून पहिले पाऊल चंद्रपुरात टाकण्यात आले आहे. तसेच २० जिल्ह्यात रॅपीड रेस्क्यू टीमची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), विवेक खांडेकर यांनी सांगितले.